दिग्गज अभिनेते Arvind Trivedi आणि Ghanshyam Nayak यांचं निधन, पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
अरविंद त्रिवेदी यांनी रामानंद सागर कृत 'रामायण' मालिकेत रावणाची भूमिका साकारली होती. तर घनश्याम नायक यांनी 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या लोकप्रिय कार्यक्रमात नट्टू काकांची भूमिका साकारली होती
Pm Modi Expressed Grief : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजविणाऱ्या अरविंद त्रिवेदी आणि घनश्याम नायक यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. मोदींनी ट्वीट करत दोन्ही अभिनेत्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान, अरविंद त्रिवेदी यांनी रामानंद सागर कृत 'रामायण' मालिकेत रावणाची भूमिका साकारली होती. तर घनश्याम नायक यांनी 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या लोकप्रिय कार्यक्रमात नट्टू काकांची भूमिका साकारली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत म्हटले आहे की, "मागील काही दिवसांत आपण अभिनयातील दिग्गज कलाकार गमावलेत. घनश्याम नायक 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेतील त्यांच्या भूमिकेमुळे नेहमीच प्रेक्षकांच्या स्मरणात राहतील. अभिनेता असूनही अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असं त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं."
पंतप्रधानांनी आणखी ट्वीट करत म्हटले आहे की, "आपण गमावलेले अरविंद त्रिवेदी फक्त उत्तम कलाकारच नव्हते, तर त्यांनी अनेक समाजउपयोगी कामेदेखील केली आहेत. 'रामायण' मालिकेतील त्यांची रावणाची भूमिका येणाऱ्या पिढीलादेखील आवडेल. दोन्ही कलाकारांच्या चाहत्यांच्या वतीने मी सद्भावना व्यक्त करतो."
अरविंद त्रिवेदींचं निधन
'रामायण'मधील रावणाची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचं मंगळवारी रात्री निधन झालं. वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झाला. अरविंद त्रिवेदी गेल्या बऱ्याच काळापासून प्रकृतीच्या समस्यांचा सामना करत होते. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते.
अरविंद त्रिवेदींनी रामायणात साकारलेली भूमिका आयुष्याला कलाटणी देणारी
रामानंद सागर कृत 'रामायण' या लोकप्रिय मालिकेपासूनच अरविंद त्रिवेदी यांच्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली. त्यांनी साकारलेली रावणाची भूमिका लोकांच्या मनात इतकी ठसली होती की, त्यांना खऱ्या आयुष्यातही त्यांच्या भूमिकेवरुन ओळखू लागले होते. 'रामायण'मध्ये काम करण्यापूर्वी गुजरातीत त्यांनी शेकडो नाटकं आणि चित्रपटांमधून अभिनय केला होता. अरविंद त्रिवेदी यांना कल्पना नव्हती की, रामायणातील त्यांची भूमिका इतकी लोकप्रिय होईल.
नट्टू काकांनी रविवारी घेतला अखेरचा श्वास
नट्टू काका घशाच्या कॅन्सरने पीडित होते. मागील वर्षी त्यांचे त्यासाठी ऑपरेशनदेखील झाले होते. पण त्यांना कॅन्सरच्या आजारातून बाहेर यश आले नाही. त्यांचे मुंबईतल्या मालाडमधील एका रुग्णालयात निधन झाले.