चार महिन्यांपूर्वी पहिल्या मुलीचा जन्म, देबिना आणि गुरमीत दुसऱ्या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज!
Debina-Gurmeet Annouce Second Pregnancy : अभिनेत्री देबिना बॅनर्जी आणि अभिनेता गुरमीत चौधरी यांच्या घरात पुन्हा एकदा छोट्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. विशेष म्हणजे एप्रिल महिन्यातच देबिनाने पहिल्या मुलीला जन्म दिला होता.
Debina-Gurmeet Annouce Second Pregnancy : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कपल देबिना बॅनर्जी (Debina Bonnerjee) आणि गुरमीत चौधरी (Gurmeet Choudhary) यांच्या घरात पुन्हा एकदा छोट्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. देबिना दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी यांनी ही गोड बातमी आजचा चाहत्यांसोबत शेअर केली. विशेष म्हणजे देबिना नुकतीच आई बनली आहे. एप्रिल महिन्यातच तिने मुलीला जन्म दिला होता. हे बाळ चार महिन्यांचं असून देबिन आणि गुरमीत काही महिन्यातच दुसऱ्या बाळाचं स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
देबिना-गुरमीतच्या घरी लवकरच दुसऱ्या पाहुण्याचं आगमन
या कपलने फॅमिली फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांची चार महिन्यांची मुलगी लियाना देखील गुरमीत आणि देबिनासोबत दिसत आहे. या परफेक्ट फॅमिली फोटोमध्ये या जोडप्याने चौथ्या सदस्याच्या आगमनाची घोषणा केली आहे. देबिनाने सोनोग्राफीचा फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये गुरमीतने मुलगी लियानाला उचलून घेतल्याचं दिसत असून त्याची फोटोकडे पाठ आहे. तर देबिना गुरमीतकडे पाहत असून तिच्या हातात सोनोग्राफीचा फोटो आहे. या फोटोमध्ये त्यांची मुलगी लियानाचा निरागसपणा पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
देबिना आणि गुरमीतने शेअर केली गोड बातमी
ही गोड बातमी शेअर करताना देबिना आणि गुरमीतने लिहिलं आहे की, "काही निर्णयांची योग्य वेळ ठरलेली असते, जे कोणीही बदलू शकत नाही. हा त्या आशीर्वादांपैकी एक आहे. आमचं कुटुंब पूर्ण करण्यासाठी लवकरच येत आहे." या फोटोखाली तिने #babyno2 #mommieagain #daddyagain असे हॅशटॅग दिले आहेत.
ही गुडन्यूज शेअर करताच अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी या जोडप्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. युविका चौधरी, रश्मी देसाई, माही विज, टीना दत्ता यांच्यासह अनेक स्टार्सनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
गर्भधारणेसाठी देबिनाने केला अनेक अडचणींचा सामना
दरम्यान, देबिनाने या वर्षी 3 एप्रिल रोजी पहिल्या मुलीला जन्म दिला. या मुलीचं नाव त्यांनी लियाना ठेवलं. महत्त्वाचं म्हणजे देबिना अनेक वर्षांपासून प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करत होती. पहिल्या बाळासाठी देबिनाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पहिल्या गर्भधारणेसाठी ती पाच वर्षे प्रयत्न करत होती. पण तिला अनेक गुंतागुंतीतून जावं लागलं. पाच वेळा ती या प्रक्रियेत अपयशी ठरली.
तिने दोन IVF आणि आणि IUI उपचार घेतले होते. देबिनाच्या अनेक थेरपी देखील झाल्या होत्या. यामुळे ती निराश देखील झाली होती. अखेर लग्नाच्या 11 वर्षानंतर देबिनाला आई होण्याचं सुख मिळालं. 3 एप्रिल 2022 रोजी ती पहिल्यांदा आई बनली. पण म्हणतात ना देनेवाला जब भी देता देता छप्पर फाड के, असंच काहीसं देबिना आणि गुरमीतच्या आयुष्यात घडलं आहे. पहिल्या अपत्याच्या जन्माच्या चार महिन्यांनंतरच देबिनाला दुसऱ्यांदा आई होण्याची संधी मिळाली आहे.