Priya Bapat : नाटकाच्या प्रयोगादरम्यान लघुशंका आली अन्...; 'बस बाई बस'च्या मंचावर प्रिया बापटने शेअर केला भन्नाट किस्सा
Priya Bapat : 'बस बाई बस'च्या आगामी भागात अभिनेत्री प्रिया बापट सहभागी होणार आहे.
Priya Bapat : 'बस बाई बस' (Bus Bai Bus) हा छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांचा लाडका कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात दर आठवड्याला वेगवेगळे सेलिब्रिटी सहभागी होत असतात. या कार्यक्रमाच्या आगामी भागात मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) सहभागी होणार आहे. या कार्यक्रमात प्रिया अनेक किस्से चाहत्यांसोबत शेअर करणार आहे. त्यामुळे चांगलाच हशा पिकणार आहे.
नुकताच 'बस बाई बस' या कार्यक्रमातील आगामी भागाचा प्रोमो आऊट झाला आहे. प्रोमोमध्ये नाटक कसं लांबू शकतं हे प्रिया चाहत्यांसोबत शेअर करताना दिसणार आहे. प्रोमोमध्ये सुबोध प्रियाला विचारतोय,"कलाकार वाक्य विसल्यामुळे किंवा जास्तीची वाक्य घेतल्यामुळे नाटक लांबतं. पण या व्यतिरिक्तदेखील काही कारणामुळे नाटक लांबलेलं मी ऐकलं आहे.". सुबोधच्या या प्रश्नावर प्रिया मजेशीर किस्सा शेअर करताना दिसत आहे.
View this post on Instagram
प्रिया म्हणाली," 'नवा गडी नवं राज्य' हे नाटक मी उमेश आणि हेमंत ढोमेसोबत करायचे. पण पुण्यातील एका प्रयोगादरम्यान एक चांगलाच किस्सा घडला. नाटतील एका सीनमध्ये मी रंगमंचावरून बाहेर गेल्यावर हेमंत-उमेशचे संवाद होते. त्यानंतर माझी पुन्हा एन्ट्री होते. पण प्रयोगादरम्यान नाटकातील त्या सीनला मी विंगेत गेले आणि माझ्या लक्षात आलं की मला लघुशंका आली आहे. पण मला पूर्ण नाटक पण करायचं होतं. त्यामुळे मी उमेश आणि हेमंतला खुणावलं की, तुमचं बोलणं सुरूच ठेवा. मी पटकन जाऊन येते".
किस्सा शेअर करत प्रिया पुढे म्हणाली,"हेंमत आणि उमेशने मी येईपर्यंत बोलणं सुरू ठेवलं होतं. मी पटकन धावत गेले आणि आल्यानंतर त्यांना विंगेतून खुणावलं. मी आले आहे. आता तुम्ही शेवटचं वाक्य घ्या. म्हणजे मला पुन्हा रंगमंचावर एन्ट्री घेता येईल".
नाटकाच्या प्रयोगादरम्यानचा प्रियाचा हा किस्सा ऐकून सुबोध भावेलादेखील हसू आवरलं नाही. प्रियाच्या किस्स्यानंतर सुबोध म्हणाला,"बरेचसे कलाकार असे असतात जे नाटकाची तिसरी घंटा व्हायची आधी बाथरूमजवळ सापडतात. नाटक सुरू व्हायच्या आधी त्यांना प्रेशर आलेलं असतं. पण यावरूनच कलाकारांची त्यांच्या कामावर, नाटकावर असलेली श्रद्धा दिसून येते".
संबंधित बातम्या