एक्स्प्लोर
Advertisement
निर्मात्याकडून शय्यासोबतीची मागणी, अभिनेता राहुल राजचा आरोप
निर्माता मुष्ताक शेखने मला 'ब्रेक' देण्यासाठी त्याच्याशी शय्यासोबत करण्याची मागणी केली होती, असा आरोप अभिनेता राहुल राज सिंगने केला आहे
मुंबई : 'मी टू' चळवळी अंतर्गत विविध क्षेत्रातील महिला आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचारांचा पाढा वाचत आहेत. त्यानंतर साकिब सालेमसारख्या काही पुरुष कलाकारांनीही आपल्याला आलेले कटू अनुभव सांगितले. दिवंगत अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीचा एक्स बॉयफ्रेण्ड आणि अभिनेता राहुल राज सिंग यानेही आपला लैंगिक छळ झाल्याचा दावा केला आहे.
पटकथाकार आणि निर्माते मुष्ताक शेख यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप राहुल राज सिंग याने केला आहे. मुष्ताकने मला 'ब्रेक' देण्यासाठी त्याच्याशी शय्यासोबत करण्याची मागणी केली. त्याच्या घाणेरड्या मागण्या मी धुडकावून लावल्यामुळे त्याने माझं करिअर उद्ध्वस्त केलं, असं राहुलचं म्हणणं आहे.
'बालिका वधू' फेम टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने 1 एप्रिल 2016 रोजी आत्महत्या केली होती. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक्स बॉयफ्रेण्ड राहुल राज सिंग विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो सध्या जामिनावर बाहेर आहे.
'मी 2004 मध्ये 19 वर्षांचा असताना ग्रासिम मिस्टर इंडियाचा मॉडेल होतो. 2006 मध्ये माझी भेट मुष्ताकशी झाली. त्यावेळी बॉलिवूडमध्ये त्याचा वरचष्मा होता. शाहरुख-सलमानसोबत त्याची उठबस होती. त्याने माझ्यावर इम्प्रेस असल्याचं दाखवलं. मलाही मोठ्या कलाकारांसोबत काम करायला मिळेल, असं वाटल्याने मी खुश होतो' असं राहुलने 'मिड डे'ला सांगितलं.
'मुष्ताक मला कुठल्याही वेळी फोन करायचा. एकदा रात्री 11 वाजता त्याने मला घराजवळ बोलवलं. तो मला घरी घेऊन गेला. घरात एकच खोली आणि एक बेड होता. तो म्हणाला - आता तुझ्यासोबत मी जे करणार आहे, ते तुला खूप आवडेल. मी खूप घाबरलो.' असं राहुल सांगतो. मुष्ताकची मागणी धुडकावल्याने मुक्ता आर्ट्सचा एक चित्रपटही गमवावा लागल्याचा दावा राहुलने केला.
'मुष्ताकमुळे मला अनेक टीव्ही शो गमवावे लागले. माझी निवड 'अंबर धरा' नावाच्या मालिकेसाठी झाली. मी टीव्हीवरचा पहिला अंध अभिनेता म्हणून प्रसिद्ध झालो. अचानक एकदा मला मुष्ताकचा फोन आला त्याने त्याच्यामुळे मला हे यश मिळाल्याचा दावा केला. त्यामुळे माझा आत्मविश्वासच गेला. मला 'माता की चौकी' नावाची मालिका मिळाली. त्याने पुन्हा मला त्याच्यासोबत झोपण्याची ऑफर दिली. मी ती पुन्हा नाकारली. त्यामुळे माझी व्यक्तिरेखा रातोरात मालिकेतून संपवण्यात आली' असा आरोपही राहुलने केला आहे.
'त्या काळी मला तीन ते चार लाख रुपये दर महिन्याला कमवायचो. मी दहा वर्षांपूर्वी टीव्ही इंडस्ट्री का सोडली, याचं उत्तर मी माझ्या मित्रांना आणि चाहत्यांना देणं लागतो. याचं कारण म्हणजे मुष्ताक शेख. मी त्यावेळी आई-वडिलांनाही सांगितलं होतं. मी हे करु शकत नाही, याचं कारण मला कोणासोबततरी झोपावं लागणार होतं.' अशी खंत राहुलने व्यक्त केली. मुष्ताक शेख यांनी अद्याप आरोपांना उत्तर दिलेलं नाही.
#MeToo चं वादळ
अभिनेत्री तनुश्री दत्ता ने नाना पाटेकरांविरोधात आरोप केल्यानंतर #MeToo या चळवळीअंतर्गत देशभरातील विविध क्षेत्रातल्या महिलांनी आपल्यावर झालेले लैंगिक अत्याचार, गैरवर्तन यांच्याविषयी आवाज उठवायला सुरुवात केली आहे.
ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ यांनी 20 वर्षांपूर्वी बलात्कार केल्याचा गंभीर आरोप 'तारा' मालिकेच्या लेखिका-दिग्दर्शिका विनिता नंदा यांनी केला. अभिनेत्री कंगना रनौत, गायिका सोना मोहापात्रा, ज्येष्ठ अभिनेत्री हिमानी शिवपुरी, अभिनेत्री संध्या मृदुल, अभिनेत्री सिमरन कौर सुरी, अभिनेत्री पूजा भट्ट, अभिनेत्री फ्लोरा सैनी, गायिका श्वेता पंडित, बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा यासारख्या अनेक महिला कलाकारांनीही आपली आपबिती मीडियासमोर सांगितली होती.
दिग्गज अभिनेते नाना पाटेकर, संस्कारी बाबूजी अलोकनाथ, साजिद खान, गायक कैलाश खेर, शोमॅन सुभाष घई, दिग्दर्शक विकास बहल, अभिनेता विकी कौशलचे वडील म्हणजेच अॅक्शन दिग्दर्शक श्याम कौशल, नंदिता दासचे वडील आणि चित्रकार जतीन दास, संगीतकार अनू मलिक, अभिनेते रजत कपूर, अभिनेते पियुष मिश्रा, लेखक चेतन भगत, निर्माता गौरांग दोषी, पार्श्वगायक अभिजीत, ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ, कॉमेडिअन गुरसिमरन खंबा, कानन गिल, उत्सव चक्रवर्ती, यशराज फिल्म्सचा क्रिएटिव्ह हेड आशिष पाटील अशा अनेक जणांवर आरोप झाले आहेत.
अगदी कॉमेडियन अदिती मित्तलवरही महिला कॉमेडियनने गैरवर्तनाचे आरोप केले. तर अभिनेता साकिब सालेमने आपल्याशी झालेल्या गैरवर्तनाची आठवण सांगितली. शक्ती कपूर, राहुल रॉय , सैफ अली खान यासारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांनीही मीटू चळवळीवर मत व्यक्त केलं.
बॉलिवूडमधील लैंगिक शोषणाच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी 'सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन' (सिन्टा) लवकरच लैंगिक शोषणविरोधी समितीची स्थापना करणार असून त्यामध्ये अभिनेत्री रवीना टंडन, रेणुका शहाणे, स्वरा भास्कर यांचा समावेश असेल.
#MeToo चं वादळ त्यानंतर नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातही दाखल झालं. पत्रकार प्रिया रमानी यांनी लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यमंत्री एम जे अकबर यांनी राजीनामा दिला. तर बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांच्यावरही लैंगिक शोषणाचा आरोप झाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement