तापसी पन्नूला रियाबद्दल सहानुभूती, कायद्यावर विश्वास ठेवण्याचं केलं आवाहन
कायद्यावर विश्वास ठेवून तपास यंत्रणांनी तपास करावा आणि त्याची बातमीदारी माध्यमांनी करावी. स्वत: तपास करण्याचा प्रयत्न करू नये असं अनेक कलाकारअनौपचारिक गप्पांमध्ये बोलताना सांगतात.
मुंबई : सुशांतसिंग मृत्यूचा पेच अजून उलगडलेला नाही. गेल्या दोन महिन्यांपासून सुशांतचं हे प्रकरण चालू आहे. त्यासोबत सातत्याने नाव येतं आहे ते रिया चक्रवर्तीचं. आधी सुशांतची गर्लफ्रेंड म्हणून.. आणि त्यानंतर सुशांतच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर. त्या तक्रारीनुसार रियाने सुशांतचा ताबा पूर्णत: घेतला होता आणि आपल्या स्वार्थासाठी रिया सुशांतला वापरून घेत होती असा एक सूर आला. यावर रिया काहीच बोलली नव्हती.
काही दिवसांपूर्वी रियाने दिलेल्या एका मुलाखतीनंतर मात्र तिची बाजूही लोकांना कळली आहे. त्या एका मुलाखतीने या संपूर्ण प्रकरणाचा रंग बदलला आहे. यातच आता काही कलाकारही रियाच्या बाजूने म्हणता येणार नाही. पण तिला सहानुभूती दर्शवताना दिसतायत. यात पहिलं नाव आलं आहे ते अभिनेत्री तापसी पन्नूचं. ट्विटरवरून व्यक्त होताना ती म्हणले, मी सुशांतला व्यक्तिश: ओळखत नव्हते. मी रियालाही ओळखत नाही. पण अद्याप तिच्यावरचे आरोप सिद्ध झालेले नाहीत. मीडियानेही जरा सबुरीने घ्यावं. त्यांनी मीडियाने ट्रायल करू नये. भारतीय न्याय व्यवस्थेवर आपण विश्वास ठेवूया असंही ती सांगते.
मीडियाने गेल्या काही दिवसांपासून सुरू केलेल्या कव्हरेजबद्दलही अनेक कलाकारांनी नापसंती दर्शवली आहे. अनेकांना आतल्या गोष्टी कळूनही ते बाहेर बोलत नसलेले दिसतात. आता हळूहळू कलाकारही बोलू लागले आहेत. कायद्यावर विश्वास ठेवून तपास यंत्रणांनी तपास करावा आणि त्याची बातमीदारी माध्यमांनी करावी. स्वत: तपास करण्याचा प्रयत्न करू नये असं अनेक कलाकारअनौपचारिक गप्पांमध्ये बोलताना सांगतात.