Tabla Maestro Ustad Zakir Hussain Died: उस्ताद झाकीर हुसैन कालवश; अमेरिकेतील रुग्णालयात अखेरचा श्वास, कुटुंबीयांची माहिती
Tabla Maestro Ustad Zakir Hussain Died: तबला वादक झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात निधन झालं, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.
Ustad Zakir Hussain Passes Away: जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन (Ustad Zakir Hussain) यांचं निधन झालंय. ते 73 वर्षांचे होते. कालपासूनच त्यांच्या निधनाचं वृत्त समोर आलं होतं. पण, त्यांच्या कुटुंबीयांनी वृत्त फेटाळत त्यांची प्रकृती नाजूक असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं सांगितलं होतं. पण, आज (सोमवारी) सकाळी अमेरिकेतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचं त्यांच्या कुटुंबियांनी ABP माझाला दिली आहे. दरम्यान, अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्कोमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही वर्षांपासून हृदयाशी संबंधित आजाराशी झाकीर हुसैन झुंज देत होते. 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2023 मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानं उस्ताद झाकीर हुसैन यांना सन्मानित करण्यात आलं होतं. झाकीर हुसेन यांना तीन ग्रॅमी पुरस्कारही मिळाले होते.
कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, उस्ताद झाकीर हुसैन इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिसमुळे त्रस्त होते आणि गेल्या दोन आठवड्यांपासून ते रुग्णालयात दाखल होते. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांची प्रकृती नाजूक होती. अखेर त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
उस्ताद झाकीर हुसैन यांच्या कुटुंबियांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, "मार्गदर्शक आणि शिक्षक म्हणून त्यांच्या विपुल कार्यानं असंख्य संगीतकारांवर अमिट छाप सोडली. पुढच्या पिढीला आणखी पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. सांस्कृतिक दूत आणि आजवरच्या महान संगीतकारांपैकी एक म्हणून त्यांनी अतुलनीय वारसा मागे ठेवला आहे."
कोण आहेत उस्ताद झाकीर हुसैन?
जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन प्रसिद्ध तबलावादक अल्ला रखा खाँ यांचे पुत्र. जाकिर हुसैन यांनी वयाच्या सातव्या वर्षी तबल्यावर पहिली थाप मारली आणि तिथूनच त्यांच्या प्रशिक्षणाची सुरुवात झाली. त्यानंतर वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी त्यांनी देशभरात आपली कला सादर करण्यास सुरुवात केली. झाकीर हुसैन यांना 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2023 मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. झाकीर हुसेन यांना तीन ग्रॅमी पुरस्कारही मिळाले होते.
झाकीर हुसेन यांना 1990 मध्ये संगीताचा सर्वोच्च सन्मान 'संगीत नाटक अकादमी पुरस्कार'ही मिळाला आहे. उस्ताद झाकीर हुसेन यांना त्यांच्या कारकिर्दीत 7 वेळा ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाली, त्यापैकी त्यांनी चार वेळा पुरस्कारावर नाव कोरलं.