Suraj Chavan Majha Katta : 'अन् तेव्हा वाटलं आता आपण आपल्याला मारुन घ्यावं...', सूरजने माझा कट्टावर सांगितला वेदनादायी काळ
Suraj Chavan Majha Katta : सूरजने माझा कट्टावर त्याच्या आयुष्यातल्या वेदनादायी प्रवासाविषयी माझा कट्टावर भाष्य केलं आहे.
Suraj Chavan Majha Katta : बिग बॉसच्या मराठीचा (Bigg Boss Marathi Season 5) विजेता झाला आणि सूरज चव्हाणला (Suraj Chavan) संपूर्ण महाराष्ट्राने दाद दिली. त्याच्या निरागस वागण्याचं, बिनधास्त बोलण्याचं साऱ्यांनीच भरभरुन कौतुक केलं. त्यामुळे सोशल मीडियावरही सध्या सूरज चव्हाण हे नवा बरंच गाजतंय. पण असं असलं तरीही सूरजचा बारामती ते बिग बॉसचं घर हा प्रवास तसा बराच खाचखळग्यांनी भरलेला आहे. त्याचा हाच प्रवास त्याने माझा कट्टावर सांगितला.
सूरजने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी माझा कट्टाला विशेष मुलाखत दिली. तसेच त्याचा वाढदिवसही माझा कट्टावर त्याचा वाढदिवसही साजरा करण्यात आला. सूरजने बिग बॉसच्या घरात कायमच त्याच्या आईवडिलांच्या आठवण काढली. सूरजचे आईवडिल या जगात नाही. पण सूरजने त्याची बिग बॉसची ट्रॉफीही त्याच्या आईवडिलांना समर्पित केली.
सूरजचा वेदनादायी प्रवास
सूरजने त्याच्या प्रवासाविषयी सांगताना म्हटलं की, आईचं माझ्यावर खूप प्रेम होती. माझ्या आईने वडिलांच्या जाण्याचा खूप ताण घेतला होता. त्यानंतर तिला वेड लागलं. तेव्हा लोकं म्हणायचे की, सूरज तुझी आई बघं असं करते. एकदा तर ती शेळ्यांना घेऊन गेली शेळ्या घरी आल्या पण आई तिथेच बसली. पहाटे ती घरी आली. आई घरी आल्यानंतर बहिणीने विचारलं की, आई तू कुठे गेली होतीस? पण तिला तेव्हा काहीच कळत नव्हतं.
पुढे तिने म्हटलं की, पण मला वाईट तेव्हा वाटलं की, जेव्हा चुकून माझ्याकडून आईच्या पायावर वरवंटा पडला. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मन भरुन आलं. असं वाटलं की आता आपण आपल्यालाच मारुन घ्यावं... खूप वाईट वाटलं. पण काय करणार देवाने आता माझं कुणी ठेवलं नाही. आजोबा गेले, आज्जी गेले, आई-वडिलही गेले. कुणीच राहिलं नाही.
'आता माझा गुलीगत बंगला होणार'
सूरजने बिग बॉसची ट्रॉफी उचलल्यानंतर त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. इतकच नव्हे तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीच्या या लेकाची पुण्यात विशेष भेटही घेतली. याचवेळी अजित पवारांनी सूरजच्या घराविषयी सूचना देत त्याला नवं घर बांधून देणार असल्याचं जाहीर केलं. यावर सूरजने माझा कट्टावर बोलताना म्हटलं की, 'आमचं घर नव्हतं. आता माझं नवीन घर होणार आहे. माझा गुलीगत बंगला होणार आहे.'