(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Har Har Mahadev Trailer Out: छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाची गाथा! ‘हर हर महदेव’चा जबरदस्त ट्रेलर रिलीज
Har Har Mahadev Trailer: अभिनेते सुबोध भावे (Subodh Bhave) यांनी ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा ट्रेलर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.
Har Har Mahadev Trailer Out: महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्यकथेवर आधारित 'हर हर महादेव' (Har Har Mahadev) या चित्रपटाची चर्चा सर्वत्र रंगली आहे. या चित्रपटातील काही दमदार गाणी आधीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. तर, चित्रपटाची एक छोटीशी झलक देखील प्रेक्षकांनी पहिली होती. चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता वाढली होती. आता या चित्रपटाचा ट्रेलर देखील रिलीज करण्यात आला आहे. ‘स्वराज्यात सामील व्हा, नाहीतर मरा..’, अशा जबरदस्त संवादासह चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात होते.
या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारे अभिनेते सुबोध भावे (Subodh Bhave) यांनी ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा ट्रेलर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. ‘स्वराज्य उभं राहतं ते कर्तव्याच्या तकलादू भितींवर नाही तर त्यासाठी लागतो इमानाचा काळा दगड!’ सादर करत आहोत स्वराज्याच्या निष्ठेची, बलाढ्य शक्तीची, छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमांच्या गाथेची झलक....येतोय 'हर हर महादेव' 25 ऑक्टोबरपासून मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड या 5 भाषांमधून आपल्या भेटीला, असं खास कॅप्शन देत सुबोध भावे यांनी चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे.
पाहा ट्रेलर :
एक-दोन नव्हे तब्बल 5 भाषांमध्ये रिलीज होणार चित्रपट!
मराठी चित्रपटसृष्टीत नेहमीच नवनवीन प्रयोग होत राहिले आहेत. या चित्रपटाच्या निमित्तानेही असाच एक आगळावेगळा प्रयोग पाहायला मिळणार आहे. 'हर हर महादेव' हा चित्रपट फक्त मराठीतच नाही, तर तब्बल पाच भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सुलतानी अंधार पसरलेला असताना मा जिजाऊंनी स्वातंत्र्यतेचे पाहिलेले स्वप्न, बारा हजार शत्रूंवर विजय मिळवणारे आपले तीनशे मावळे आणि बाजीप्रभूंच्या रणझुंजार कर्तृत्वावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. हा चित्रपट खास दिवाळीच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अमृता खानविलकर साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका!
नुकतीच ‘चंद्रमुखी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री अमृता खानविलकर या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. अमृता खानविलकर 'हर हर महादेव' या चित्रपटात शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पत्नीची अर्थात सोनाबाई देशपांडे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. 'हर हर महादेव' हा अमृताचा पहिला ऐतिहासिक चित्रपट असून, ती मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच ऐतिहासिक भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट येत्या 25 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.
संबंधित बातम्या