Singer Zubeen Garg Death: लाईफ जॅकेटशिवाय स्कूबासाठी पाण्यात उतरला, काही सेकंदातच खेळ खल्लास; समुद्रात तरंगताना आढळला गायक जुबिन गर्गचा मृतदेह
Singer Zubeen Garg Death: डॉक्टरांच्या सर्वोत्तम प्रयत्नांनंतरही जुबिनला वाचवता आलं नाही आणि अखेर बॉलिवूडचा फेमस सिंगर जुबिन गर्गचा अपघाती मृत्यू झाला.

Singer Zubeen Garg Death: प्रसिद्ध आसामी गायक (Assamese Singer) आणि बॉलिवूड (Bollywood) आयकॉन जुबिन गर्ग (Zubeen Garg) यानं वयाच्या 52 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करत असताना गायकाचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, जुबिनला सिंगापूर पोलिसांनी समुद्रातून वाचवलं आणि जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. पण, तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांच्या सर्वोत्तम प्रयत्नांनंतरही जुबिनला वाचवता आलं नाही आणि अखेर बॉलिवूडचा फेमस सिंगर जुबिन गर्गचा अपघाती मृत्यू झाला. दरम्यान, जुबिन नॉर्थईस्ट फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म करण्यासाठी सिंगापूरला पोहोचला होता.
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंगापूरमधील भारताचे उच्चायुक्त शिल्पक अंबुले यांनी त्यांना माहिती दिली की, सुप्रसिद्ध गायक जुबिन गर्ग याचा मृत्यू लाईफ जॅकेटशिवाय समुद्रात पोहताना झाला. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, गर्ग याचं शवविच्छेदन शनिवारी केलं जाईल आणि त्याचा मृतदेह संध्याकाळपर्यंत आसामला आणला जाईल.
जुबिन गर्ग लाईफ जॅकेटशिवाय समुद्रात पोहायला गेलेला... : मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा
मुख्यमंत्री सरमा म्हणाले की, गर्ग लाईफ जॅकेटशिवाय पोहायला गेला होता. त्यावेळी लाईफगार्डनं त्याला रोखलं आणि लाईफ जॅकेट घालायला सांगितलं होतं, पण तरीसुद्धा जुबिननं लाईफ जॅकेट घातलं नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, गर्गसह 18 लोक बोट ट्रिप आणि पोहण्यासाठी गेले होते. पण, त्यानंतर काही वेळातच गायक नंतर समुद्रात तरंगताना आढळला. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, "उच्चायुक्तांनी मला गर्गसोबत असलेल्यांची यादी पाठवली आहे. यामध्ये सिंगापूरमध्ये राहणाऱ्या आसामी समुदायाच्या 11 सदस्यांचा समावेश आहे, ज्यामध्ये बोट बुक करणारे अभिमन्यू तालुकदार यांचाही समावेश आहे. याव्यतिरिक्त, त्यात गायकाच्या टीमचे चार सदस्य आणि दोन क्रू मेंबर्सचा समावेश आहे."
मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, गर्ग समुद्रात तरंगताना आढळला, त्यानंतर जीवरक्षकांनी ताबडतोब सीपीआर केले आणि त्यांना सिंगापूर जनरल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. ते म्हणाले की, सिंगापूरचे अधिकारी गायकासोबत असलेल्यांची चौकशी करत आहेत.
शवविच्छेदन केल्यानंतरच जुबिनचा मृतदेह भारतात आणला जाणार : मुख्यमंत्री सरमा
मुख्यमंत्री सरमा म्हणाले, "उच्चायुक्तांनी असंही कळवलं की, 20 सप्टेंबर रोजी शवविच्छेदन केलं जाईल आणि आम्हाला आशा आहे की, गर्ग यांचं पार्थिव शनिवारी संध्याकाळपर्यंत त्यांच्या मायदेशी परत आणलं जाईल. गर्गसोबत आलेले सर्व सदस्य भारतीय नागरिक असल्यानं, आम्ही केंद्रीय गृह मंत्रालयाशी देखील संपर्क साधू जेणेकरून आमचे अधिकारी त्यांची चौकशी करू शकतील आणि राज्यातील लोकांना त्यांच्या सांस्कृतिक प्रतिमेच्या शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं? हे जाणून घेण्याचा अधिकार आहे."
दरम्यान, सिंगापूरमधील भारतीय उच्चायुक्त अंबुले यांनी सांगितलं की, गर्ग यांच्या निधनामुळे सिंगापूरमध्ये शनिवारी होणाऱ्या नॉर्थ ईस्ट फेस्टिव्हलशी संबंधित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. ते म्हणाले की, "आम्हाला कळवताना दुःख होत आहे की, सनटेक कन्व्हेन्शन अँड एक्झिबिशन सेंटरमध्ये शनिवारी होणारा आगामी बी2बी ट्रेड अँड टुरिझम कन्व्हेन्शन देखील अपरिहार्य परिस्थितीमुळे रद्द करण्यात आला आहे..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :























