(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Badlapur Case : ''प्लीज आता आरोपींना "निबंध" लिहायला सांगू नका', बदलापूर प्रकरणावर मराठी अभिनेत्याचं व्यवस्थेच्या अवस्थेला पत्र
Badlapur Case : बदलापूर प्रकरणावर महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याने व्यवस्थेच्या अवस्थेला पत्र लिहिलं आहे.
Shramesh Betkar post on Badlapur Case : बदलापूरमधील (Badlapur Case) एका नामांकित शाळेत घडलेल्या प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला. शाळेतील दोन चिमुकल्यांचं शाळेतीलच कंत्राटी पद्धतीने रुजू झालेल्या कर्मचाऱ्याने लैंगिक शोषण केलं. बदलापूरमधील या घटनेचे पडसाद सध्या संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत. दरम्यान 12 तास उलटूनही या घटनेची पोलिसांनी दखल घेतली नसल्याने नागरिकांनी रस्त्यावर उतरुन तीव्र संतापही व्यवस्थेच्या विरोधात व्यक्त केला. त्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली.
दरम्यान या प्रकरणावर सध्या सगळ्या स्तरावरुनच तीव्र रोष व्यक्त केला जातोय. अक्षय शिंदे असं या आरोपीचं नाव असून त्याला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारवरही संताप व्यक्त केलाय. दरम्यान महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता श्रमेश बेटकर याची देखील पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.
व्यवस्थेच्या अवस्थेला श्रमेशचं पत्र
श्रमशेने त्याच्या सोशल मीडियावरुन व्यवस्थेच्या अवस्थेला पत्र लिहिलं आहे. यामध्ये श्रमेशने म्हटलं की, 'अप्रिय व्यवस्था , तुला माहीतच असेल की रेप हा ‘गुन्हा’आहे , पण काही पुरुषांना ते ‘कर्तव्य’ वाटू लागलंय . म्हणूनच रेप ही फॅशन होण्याअगोदर व्यवस्थेने जागं व्हावं .‘बाईचा जन्म नको गं बाई’ इथपासुन सुरु झालेला प्रवास “या देशात जन्म नको गं बाई “ इथे आणून ठेवू नका .. कायदे हे कायदे वाटले पाहिजेत ते चेष्टा वाटू लागली कि मग संपतं सगळं .. ‘अंमलबजावणी’ नावाचा एक मराठी शब्द आहे , व्यवस्थेने तो वाचावा , त्याचा अर्थ मस्त आहे . विकृतांना धाक बसेल अशी पावलं उचलावीत.'
'असे ‘निबंध’ लिहायला सांगू नका'
पुढे श्रमेशने म्हटलं की, 'स्त्रीचा जन्म सन्मानासाठी आहे. तो तिला मिळालाच पाहिजे आणि त्या सन्मानाचं रक्षण झालं पाहिजे , ती जबाबदारी जितकी समाजाची तितकीच व्यवस्थेची आहे .कारण जबरदस्तीने कपडे स्त्रीचे काढले जातात पण व्यवस्था ‘नग्न’ होते . आणि प्लीज आता आरोपीना ‘मी स्त्री असतो तर’ , ‘स्त्री तुझा जन्म कसा’ असे ‘निबंध’ लिहायला सांगू नका. '