Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीची AI मॉर्फ छायाचित्रे धक्कादायक; हायकोर्टाचे तातडीचे आदेश; डीपफेक कंटेंट तात्काळ हटवण्याचे निर्देश
Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीने तिच्या व्यक्तिमत्त्व हक्कांचे संरक्षण, प्रतिमेचा कथित गैरवापर आणि डीपफेक मजकुराविरोधात अंतरिम अर्ज दाखल केला होता.

Mumbai: अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या (Shilpa Shetty) नावाने समाज माध्यमांवर व्हायरल झालेली मॉर्फ्ड छायाचित्रे, व्हिडिओ आणि इतर डीपफेक कंटेंट तात्काळ हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससोबतच एआय लिंकद्वारे प्रसारित होणारा हा कंटेंट हटवण्याचे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत. हा आदेश न्यायमूर्ती अद्वैत एम. सेठना यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने दिला आहे. हे प्रकरण प्रथमदर्शनी अत्यंत धक्कादायक असून, कोणत्याही व्यक्तीला विशेषतः महिलेलातिच्या गोपनीयतेच्या मूलभूत हक्कावर परिणाम होईल अशा पद्धतीने चित्रित करता येत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
नेमकं प्रकरण काय?
शिल्पा शेट्टीने तिच्या व्यक्तिमत्त्व हक्कांचे संरक्षण, प्रतिमेचा कथित गैरवापर आणि डीपफेक मजकुराविरोधात अंतरिम अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने प्रथमदर्शनी हा प्रकार अत्यंत धक्कादायक असल्याचं नमूद केलं. कोणत्याही व्यक्तीला, विशेषतः महिलेला, तिच्या संमतीशिवाय आणि तिच्या मूलभूत गोपनीयतेच्या हक्कावर गदा येईल अशा पद्धतीने चित्रित करता येत नाही, असं स्पष्ट मत न्यायालयाने व्यक्त केलं.
याचिकेत शिल्पा शेट्टीने म्हटलं आहे की कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून तिचा आवाज, हावभाव आणि प्रतिमा नक्कल करण्यात आली. तिच्या परवानगीशिवाय मॉर्फ केलेल्या छायाचित्रांपासून पुस्तके आणि इतर वस्तू (मर्चंडाईज) तयार करण्यात आल्या. यामुळे तिला अश्लील विनोद, बदनामी आणि मानसिक त्रास सहन करण्याची वेळ येऊ शकते, असा धोका तिने याचिकेत व्यक्त केला आहे.
न्यायालयाचा शिल्पा शेट्टीला दिलासा
न्यायालयाने हे सर्व मॉर्फ्ड छायाचित्रे, व्हिडिओ आणि डीपफेक कंटेंट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स तसेच एआय लिंकवरून तात्काळ हटवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणी संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, पुढील सुनावणीपर्यंत कोणताही अशा स्वरूपाचा कंटेंट प्रसारित करू नये, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
नुकसानभरपाईची मागणी
शिल्पा शेट्टीने याचिकेत संबंधित व्यक्तींकडून पाच लाख रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणीही केली आहे. तिच्या प्रतिमेचा गैरवापर करून आर्थिक फायदा मिळवण्याचा प्रयत्न झाला असल्याचा आरोप तिने केला आहे. न्यायालयाने या प्रकरणात पुढील सुनावणीपर्यंत अंतरिम दिलासा देत संबंधित कंटेंट हटवण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या आदेशामुळे डिपफेक आणि एआयच्या गैरवापराविरोधात न्यायालयीन पातळीवर कठोर संदेश दिला गेला असून, सेलिब्रिटींसह सर्वसामान्यांच्या गोपनीयतेच्या हक्कांबाबत हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.























