Asha Bage : ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांना जनस्थान पुरस्कार जाहीर; साहित्य क्षेत्रातील अमूल्य कामगिरीनिमित्त सन्मान
Asha Bage : आशा बगे या मराठी भाषेत लिहिणाऱ्या भारतीय कादंबरीकार आणि लेखिका आहेत.
Asha Bage : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने 2023 चा जनस्थान पुरस्कार (Jansthan Award) ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांना जाहीर करण्यात आला आहे. दर दोन वर्षांनी जनस्थान पुरस्कार जाहीर करण्यात येतो. आशा बगे यांना 10 मार्च रोजी कालिदास कला मंदिरात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
एबीपी माझाच्या टीमने आशाताई बगे यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. यावेळी आशाताई म्हणाल्या, 'कृमाग्रजांच्या नावाचा हा सन्मान मिळणे हे माझे भाग्य आहे.'
आशा बगे या मराठी भाषेत लिहिणाऱ्या भारतीय कादंबरीकार आणि लेखिका आहेत. त्यांच्या 'भूमी' या कादंबरीला 2006 चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.
आशा बगे यांचं बालपण
आशा बगे यांचे बालपण नागपूर येथे गेले. त्यांचे वडील वकील होते. बगे यांचे मराठी साहित्य आणि संगीतात पदव्युत्तर शिक्षण झाले आहे. त्यांनी नोकरी न करता घरसंसार सांभाळून लेखनाचा छंद जोपासला. आशा बगे यांच्या लेखनाची सुरुवात ‘सत्यकथे’पासून झाली. त्यांची गाजलेली कथा ‘रुक्मिणी’ 1980 साली प्रसिद्ध झाली. मौजचे श्री.पु. भागवत आणि राम पटवर्धन यांनी मग आशा बगेंच्या लेखनशैलीला आकार दिला आणि नंतर मौज आणि बगे असे समीकरण जुळून गेले. मौजच्या दिवाळी अंकात नेमाने लेखन करणाऱ्या आशा बगे यांचा 2018 सालापर्यंतचा प्रकाशित ग्रंथसंभार 13 लघुकथासंग्रह, सात कादंबऱ्या, ललितलेखांची दोन पुस्तके असा व्यापक आहे.
आशा बगे यांचं साहित्य
आशा बगे यांचा ‘मारवा’ हा कथासंग्रह विशेष प्रसिद्ध आहे, तर ‘भूमी’ आणि ‘त्रिदल’ या कादंबऱ्यांना अनेक सन्मान मिळाले आहेत. ‘भूमी’ ला 2007 चा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. यात त्यांनी प्रथमच एका तमिळ मुलीचे भावविश्व रेखाटले आहे. ‘दर्पण’ हा त्यांचा गाजलेला कथासंग्रह आहे. या पुस्तकासाठी केशवराव कोठावळे पुरस्कार त्यांना मिळाला.
आशाताईंना संगीताची खूप आवड आहे. संगीतावर त्यांनी अनेकदा लिहिलेही आहे. त्यांच्या लेखनातसुद्धा संगीताचा संदर्भ हमखास येतोच. त्यांचे आयुष्य मोठ्या आणि एकत्रित कुटुंबात गेले. त्यामुळेही असेल, पण अशा कुटुंबांत होणारी स्त्रियांची घुसमट अनेक कथांमधून त्यांनी समर्थपणे मांडली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :