Sanjay Mone on Raj Thackeray : 'शिवतीर्थावर येणाऱ्या लोकांच्या मनात असेल तेच राज ठाकरे बोलतील', अभिनेते संजय मोनेंचं सूचक वक्तव्य
Sanjay Mone on Raj Thackeray : संजय मोने यांनी एबीपी माझासोबत बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. तसेच राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्याला देखील त्यांनी उपस्थिती लावली.
Sanjay Mone on Raj Thackeray : दिग्गज अभिनेते संजय मोने (Sanjay Mone) यांनी मनसेकडून (MNS) आयोजित करण्यात आलेल्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे शिवतीर्थावरुन जनतेला संबोधित करणार आहेत. याआधी मनसेकडून जारी करण्यात आलेल्या टीझरमध्येही राज ठाकरेंनी सूचक वक्तव्य केली होती. त्याचप्रमाणे मला तुमच्याशी बोलायचं आहे, असा आशय या टीझरमधून देण्यात आला होता. त्यावर आता अभिनेते संजय मोने यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
लोकसभेच्या रिंगणात मनसेची आणि राज ठाकरेंची नेमकी भूमिका काय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्याचप्रमाणे मागील अनेक दिवसांपासून राज ठाकरेंच्या भाजप नेत्यांसोबत सुरु असलेल्या बैठकांच्या सत्रांमुळे राजकीय वर्तुळातील भुवया चांगल्याच उंचावल्या आहेत. त्यातच राज ठाकरे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार अशा देखील चर्चा होत्या. यावर आता राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात भाष्य करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या या गुढीपाडव्या मेळाव्याकडे सगळ्यांचचं लक्ष लागून राहिलं आहे.
संजय मोने यांनी काय म्हटलं?
संजय मोने यांनी एबीपी माझासोबत बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. तसेच राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्याला देखील त्यांनी उपस्थिती लावली. यावेळी बोलताना संजय मोने यांनी म्हटलं की, 'राज ठाकरे हे एक उत्तम वक्ते आहेत. त्यांच्या सर्व सभांना मी आवर्जून येतो त्यांना ऐकतो. म्हणून आज ते काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्र सारखं मला देखील उत्सुकता आहे. पण एक गोष्ट नक्की जे इथे येणाऱ्या लोकांच्या मनात असेल तेच राज ठाकरे बोलतील.'
राज ठाकरेंचा लोकसभा निवडणुकीतील पुढचा टप्पा काय ?
गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर पार पडणार आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरून (शिवतीर्थ)राज्यभरातील जनतेशी संवाद साधतात. राज ठाकरेंच्या या पाडवा मेळाव्याकडे अवघ्या राज्याचं लक्ष असतं. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे सध्या चर्चेत आहेत. मध्यंतरी ते महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चा होत्या. त्याकरता त्यांनी भाजपा नेते अमित शाह यांचीही भेट घेतली होती. परंतु, या भेटीत काय चर्चा झाली, हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. दरम्यान, या सर्व बाबींवर मेळाव्यातून राज ठाकरे संवाद साधण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंचा लोकसभा निवडणुकीतील पुढचा टप्पा काय, ते कोणाला साथ देणार, त्यांची रणनीती काय हेही आज राज ठाकरेंच्या भाषणात स्पष्ट होईल.