Sania Mirza on Motherhood: सानियाने ब्रेस्ट फिडिंगचा अनुभव सांगितला, म्हणाली, 3 वेळा प्रेग्नंट राहीन, पण ते तेव्हढं नको!
Sania Mirza on Motherhood: सानियानं तिच्या निवृत्तीघेण्यामागचं कारण स्पष्ट केलं. सानिया म्हणाली की, माझ्या शरीरानं मला न खेळण्याचे संकेत दिले होतेच, पण त्याव्यतिरिक्त मला माझ्या मुलासोबत जास्त वेळ घालवायचा होता.

Sania Mirza on Motherhood: स्टार टेनिसपटू सानिया मिर्झानं नुकतंच मातृत्त्वाबाबत भाष्य केलं आहे. एका मुलाखतीत बोलताना सानियानं तिचं गरोदरपण, स्तनपान करतानाचा संघर्ष आणि तिच्या निवृत्तीसंदर्भातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.टेनिस आयकॉन सानिया मिर्झानं पॉडकास्टर मासूम मीनावालासोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी सानियानं तिच्या निवृत्तीघेण्यामागचं कारण स्पष्ट केलं. सानिया म्हणाली की, माझ्या शरीरानं मला न खेळण्याचे संकेत दिले होतेच, पण त्याव्यतिरिक्त मला माझ्या मुलासोबत जास्त वेळ घालवायचा होता.
"माझ्यासाठी माझ्या मुलासोबत जास्तीत जास्त वेळ घालवणं ही प्रायॉरिटी होती. कारण मला वाटतं की, सध्या तो अशा वयात आहे की, त्याला आई-वडिलांची जास्त गरज आहे. तसेच, आपल्या पालकांसोबत सुरक्षित वाटण्याची गरज आहे. मला ते चुकवायचं नव्हतं. मला असं वाटतंय की, मी खूप काही केलंय. मी माझ्या स्वप्नांचा खूपच पाठलाग केलाय. आणि मुलासोबत वेळ घालवणं हेदेखील माझ्या स्वप्नांचाच भाग होता.", असं सानिया मिर्झा म्हणाली.
सानिया मिर्झानं तिच्या बाळंतपणाचा अनुभवही शेअर केला. तिनं सांगितलं की, एकदा एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तिला तिच्या सहा आठवड्यांच्या बाळाला सोडून जावं लागलं होतं. ती म्हणाली की, "मी ज्यावेळी पहिल्यांदा इज़हानला सोडून बाहेर पडले, त्यावेळी तो फक्त सहा आठवड्यांचा होता. मला वाटतं की, मी आतापर्यंत केलेला तो सर्वात कठीण विमान प्रवास होता. मला एका कार्यक्रमासाठी दिल्लीला जावं लागलं आणि मी त्यावेळी म्हटलं की, मी असं करू शकत नाही. आम्ही याबद्दल स्वतःला दोष देत असतो, कारण आम्ही स्वतःला आईसारखा अपराधीपणा देत असतो."
सानिया मिर्झानं सांगितलं की, मी सकाळची फ्लाईट घेतली आणि त्यावेळीही मी त्याला ब्रेस्टफिडिंग करत होते. त्यामुळे मला विमानातच दूध काढावं लागलं. हा सर्वात मोठा संघर्ष होता. आणि मी ती फ्लाईट घेतली. पण, आज मला फार आनंद होतोय की, मी ती फ्लाईट घेतली. कारण जर त्यावेळी मी माझा निर्णय बदलला असता, तर मला नाही वाटत की, मी माझ्या बाळाला सोडून कधी कोणतंही काम केलं असतं. मी हैदराबादहून दिल्लीला सकाळ-संध्याकाळची फ्लाईट घेतली. मी परत आले. माझं बाळ पूर्णपणे ठीक होतं. त्यावेळी मला खरंच रडू आलं.
सानिया मिर्झानं यावेळी तिच्या आईचंही कौतुक केलं. ती म्हणाली की, "खरं तर मला माझ्या आईनं जायला भाग पाडलं. ती मला म्हणाली, तुला काय झालंय? त्याला कळणारंही नाही की, तू त्याच्याजवळ नाहीस. तो फक्त सहाच आठवड्याचा आहे.
'मी आणखी तीन मुलं जन्माला घालीन, पण...'
सानिया मिर्झा पुढे बोलताना म्हणाली की, "मी अडीच ते तीन महिने स्तनपान केलं. माझ्यासाठी, तो गरोदरपणाचा सर्वात कठीण काळ होता. मला वाटतं, मी आणखी तीन वेळा गर्भवती होईन, पण स्तनपान करताना, मला माहीत नव्हतं की, मी ते करू शकेन की नाही. माझ्यासाठी, हा शारीरिक पैलू नव्हता तर भावनिक आणि मानसिक पैलू होता. जो पूर्णपणे थकवून टाकत होता. वर्किंग वुमन म्हणून, ते तुम्हाला बांधून ठेवतं. लहान मुलं त्यावर खूप अवलंबून असतात, वेळ पाळावी लागते, पुरेशी झोप नसते आणि तुमची सर्व कामं ब्रेस्टफिडिंगच्या टाईमटेबलभोवती केंद्रीत असतात."























