Salman Khan च्या घरात मध्यरात्री का घुसलेली महिला? पोलीस चौकशीत ईशा छाबडाचा धक्कादायक खुलासा
Salman Khan Security Breach: सलमान खानच्या घरात नुकतीच मध्यरात्री एका महिलेनं घुसण्याचा प्रयत्न केलेला. आता या महिलेनं पोलीस चौकशीत खळबळजनक खुलासा केला आहे.

Salman Khan Security Breach: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये एका अज्ञात महिलेनं घुसखोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नजर चुकवत कारच्या मागे लपून या महिलेनं सलमान खानच्या इमारतीत प्रवेश केला. संबंधित महिलेला वांद्रे पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तिची कसून चौकशी करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईशा छाब्रा असं या महिलेचं नाव असून ती खार पश्चिमेतील रहिवाशी आहे. ही महिला सलमानच्या घरात नेमकी का घुसली?, याबाबतचा तपास पोलीस करतायत.
अलिकडेच, सलमान खानच्या सुरक्षेचं उल्लंघन करून दोन जणांनी त्याच्या घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या दोन आरोपींपैकी एक 32 वर्षीय महिला ईशा छाबरा आहे. पोलिस चौकशीदरम्यान, ईशानं अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. तसेच, तिनं सुपरस्टारच्या घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न का केला? हेसुद्धा सांगितलं आहे.
ईशा छाब्रानं सलमानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न का केला?
पोलीस चौकशीदरम्यान, ईशा छाब्रानं सलमान खानच्या घरात प्रवेश कसा केला? याबद्दल संपूर्ण माहिती दिली. तिनं सांगितलं की, 21 मे रोजी पहाटे 3.30 वाजता ती अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या गेटवर पोहोचली. जिथे तिनं सुरक्षा रक्षकाला सांगितलं की, तिला इमारतीच्या चौथ्या मजल्यावर जायचं आहे. ईशा इमारतीच्या आत गेल्यावर तिनं लिफ्ट घेतली आणि थेट तिसऱ्या मजल्यावर गेली, तिथून ती पहिल्या मजल्यावर लिफ्टनं पुन्हा आली, तिथे तिने सलमान खानच्या दाराची बेल वाजवली, पण कोणीच दार उघडलं नाही.
दरम्यान, जेव्हा दुसरा सुरक्षा रक्षक पहिल्या मजल्यावर गेला आणि त्यानं ईशाला पाहिलं, तेव्हा ईशा ओळखीची नसल्यानं त्यानं तिला विचारलं की, तू इथे काय करत आहेस आणि तू कोण आहेस? ईशानं त्याला सांगितलं की, सलमान खाननं तिला भेटायला बोलावलं होतं आणि लिफ्ट घेऊन बाहेर गेली. चौकशीदरम्यान ईशानं पोलिसांना सांगितलं की, ती सलमान खानची चाहती आहे आणि म्हणूनच ती त्याला भेटण्यासाठी गपचूप घरापर्यंत आली होती.
सलमानच्या घरात घुसलेली ईशा छाब्रा कोण आहे?
ईशा 2016 पासून मुंबईत राहत आहे आणि 6 महिन्यांपूर्वी ती वांद्रे इथे स्थलांतरित झाली आहे. तिनं कन्नड चित्रपटांमध्ये साईड रोल केले आहेत. ती व्यावसायिक जाहिरातींमध्येही काम करते. पोलीस सूत्रांनी सांगितलं की, आतापर्यंतच्या तपासात त्यांना काहीही संशयास्पद आढळलं नाही.























