'सखे गं साजणी' चित्रपटाचं पोस्टर समोर, कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात
अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि दिग्दर्शक अभिषेक जावकरच्या रेडबल्ब स्टुडिओ प्रस्तुत 'सखे गं साजणी'च्या समोर आलेल्या पोस्टरमध्ये दिसणारे कलाकार नेमके कोण? लवकरच उलगडणार..

सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगलीय ती म्हणजे 'सखे गं साजनी' या नव्या चित्रपटाच्या पोस्टरची. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि निर्माते, दिग्दर्शक अभिषेक जावकर यांच्या ‘रेडबल्ब प्रॉडक्शन’ हाऊस मार्फत हा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने यापूर्वी या चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. हे फोटो शेअर करत तिने त्यांच्या 'रेडबल्ब प्रॉडक्शन' हाऊसचा नवा चित्रपट येणार असल्याचं सांगितलं होतं. यानंतर आता अभिनेत्रीने चित्रपटाचे पोस्टर आणि टिझर शेअर करत चित्रपटाची अधिकची माहिती दिली आहे. समोर आलेल्या पोस्टरवरील पाठमोऱ्या उभ्या असलेल्या कलाकारांनी अर्थातच चित्रपटाची उत्सुकता वाढविली आहे. नेमका हा चित्रपट काय आहे, यात कोणते कलाकार असतील, हे मात्र अद्याप समोर आलेल्या पोस्टरवरून स्पष्ट होत नाहीये. त्यामुळे साऱ्या प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
'सखे गं साजणी' चित्रपटाच्या या नवीन पोस्टरने खरंतर चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढविली आहे. समुद्र किनारी पाठमोरे उभे असलेले हे तीन मित्र पोस्टरमध्ये हाताने हार्ट ईमोजी केलेले पाहायला मिळत आहे. चित्रपटातील हे तीनही कलाकार पाठमोरे असल्याने त्यांचे चेहरे दिसत नाहीत. त्यामुळे चित्रपटात नेमकं कोण दिसणार आहे याची उत्सुकता साऱ्यांना लागून राहिली आहे. याशिवाय चित्रपटाची कथा नेमकी काय आहे, हे देखील गुलदस्त्यात आहे.
हा चित्रपट दिग्दर्शक अभिषेक जावकर दिग्दर्शित आहे. चित्रपटाच्या निर्मितीची धुरा अभिषेक जावकर, आदित्य वासुदेव घरत यांनी सांभाळली आहे. तर, सहनिर्माते अभिजीत खांडकेकर आणि अभिषेक दिलीप वाकचौरे आहेत. या चित्रपटास संगीतकार विजय भटे यांनी संगीत दिले आहे.
आता समोर आलेल्या या पोस्टरवरून चित्रपटात कोणते कलाकार दिसणार आणि चित्रपटाची कथा नेमकी काय असणार याची उत्सुकता आहे .आता लवकरच या उत्सुकतेला पूर्णविरामही मिळणार आहे.
























