Marathi Directors : अखेर मराठी माणूस एक झाला, ओम राऊतच्या पुढाकाराने बॉलीवूड गाजवणाऱ्या मराठी दिग्दर्शकांचं गेट टू गेदर
Marathi Directors : ओम राऊतच्या पुढाकारने बॉलीवूड गाजवणाऱ्या मराठी दिग्दर्शकांनी आदित्य सरपोतदारची पाठ थोपटली आहे.
Marathi Directors : बॉक्स ऑफिसवर सध्या एका सिनेमाची तुफान हवा आहे. मुंज्या या सिनेमाने बॉलीवूडच्या मोठ्या मोठ्या सिनेमांना मागे सारलं. त्यात मराठी सिनेसृष्टीसाठी कौतुकाची बाब म्हणजे या सिनेमाचं दिग्दर्शन मराठमोळा दिग्दर्शक आदित्य सरपोतदारने (Aditya Sarpotdar) केलं आहे. मागील काही काळामध्ये अनेक मोठ्या सिनेमांची धुरा मराठी दिग्दर्शकांनी अगदी सहज सांभाळली आहे. त्यातच कौतुक या सगळ्या दिग्दर्शकांनी एकत्र येऊन केलं आहे.
सत्य प्रेम की कथा, रामायण, मुंज्या यांसारखे सिनेमे असो किंवा पाताल लोक, ताली यांसारख्या गाजलेल्या वेब सिरिज असो. या सगळ्यांचं दिग्दर्शन केलं ते मराठी माणसांनी. पण अनेकदा मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय खेचतो, अशी भावना अनेकांची असते. पण हाच मराठी माणूस जेव्हा पुढे जातो, तेव्हा चार मराठी माणसं एकत्र मिळून त्याचं कौतुकही करतात, हे या दिग्दर्शकांनी दाखवून दिलंय. बॉलीवूडवर अधिराज्य गाजवाणाऱ्या या मराठी दिग्दर्शकांचं नुकतच गेट टू गेदर झालं आणि त्याचं कारण होतं, बॉक्स ऑफिसवर आदित्य सरपोतदारला मिळालेलं यश. दिग्दर्शक रवी जाधव यांनी या संदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे.
रवी जाधव यांची पोस्ट काय?
रवी जाधव यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये अविनाश अरुण, आदित्य सरपोतदार, समीर विद्वंस, निपुण धर्माधिकारी, लक्ष्मण उतेकर, ओम राऊत, निखिल महाजन, राजेश म्हापुसरकर,तेजस,देऊस्कर, ज्ञानेश झोटिंग, जयप्राद देसाई, रवी जाधव ही मंडळी दिसत आहे. या सगळ्यांनीच बॉलीवूडमध्ये तोडीस तोड काम केलं आहे. या फोटोला कॅप्शन देत रवी जाधव यांनी म्हटलं की, काल मराठी सिनेमात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या आणि आता हिंदी चित्रपट, वेब सिरीजमध्येही उत्तम कामगिरी करणाऱ्या मराठी दिग्दर्शकांनी एकत्र येऊन आदित्य सरपोतदार यांचे त्यांच्या तुफान हिट चित्रपट ‘मुंज्या’साठी अभिनंदन केले. युनायटेड कलर्स ऑफ मराठी डिरेक्टर्स’ ची ही केवळ सुरूवात आहे! ओम राऊत धन्यवाद या initiative साठी. नागराज मिस यू.
View this post on Instagram
मराठी दिग्दर्शकांची बॉलीवूडवर पकड
सध्याच्या काळात बॉलीवूडमध्ये रिमेकचा जमाना पाहायला मिळतोय. त्याच वेळी एक वेगळी गोष्ट मराठी दिग्दर्शक बॉलीवूडमध्ये घेऊन जातायत आणि त्यांच्या या गोष्टीचं प्रेक्षकही कौतुक करत आहेत. अगदी तीस कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेला मुंज्या या सिनेमाने समोर कार्तिक आर्यनचा सिनेमा असूनची 70 कोटींचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे ओम राऊतने पुढाकार घेत या मराठी दिग्दर्शकांनी आदित्यचं सक्सेस सेलिब्रेट केलं आहे. यावर अनेकांनी कमेंट्स करत या सगळ्या दिग्दर्शकांचं कौतुक केलं.