Rakhi Sawant: 'नितीशजी मी सर्वांसमोर तुमचं धोतर खेचलं तर...'; 'तो' व्हिडीओ पाहून राखी सावंत संतापली, नेमकं काय म्हणाली?
या घटनेवर मनोरंजन सृष्टीतीलही अनेकांच्या प्रतिक्रिया आल्यानंतर आता आपल्या वादग्रस्त विधानांनी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री राखी सावंत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर संतापल्याचे दिसलं.

Rakhi Sawant: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर सध्या सर्व स्तरांतून टीका होत आहे. ती पाटणामध्ये झालेल्या कार्यक्रमातील एका प्रकारामुळे. बिहारची राजधानी पाटणा येथे आयोजित एका सरकारी सन्मान सोहळ्याने अचानक मोठा राजकीय आणि सामाजिक वाद निर्माण केला. राज्य सचिवालयात झालेल्या या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित असताना, मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी महिला डॉक्टर महिलेचा हिजाब हटवल्याचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आणि त्यानंतर या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. या घटनेवर मनोरंजन सृष्टीतीलही अनेकांच्या प्रतिक्रिया आल्यानंतर आता आपल्या वादग्रस्त विधानांनी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री राखी सावंत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर संतापल्याचे दिसलं.
काय म्हणाली राखी सावंत?
" नमस्कार नितीश कुमारजी. चरण स्पर्श. तुमचा हात आशीर्वादासाठी कायम माझ्या डोक्यावर असू देत. मी तुमचा आदर करते तुमच्यावर प्रेम करते. तुम्ही खूप चांगले नेते आहात. चांगले पिता आणि पती आहात. पण, तुम्ही हे काय करून बसलात नितीशजी? तुम्ही हे काय केलं? एका मुस्लिम महिलेला तुम्ही बोलवून अवॉर्ड देत आहात, तिला सन्मानित करत आहात, तिला आदर देताय पण तुम्हाला पाच पैशाचं ज्ञान नाही की मुस्लिम धर्मात एखादी महिला घालून जेव्हा जाते तेव्हा तिच्या नकाबला कुणी हात लावू शकत नाही.
इतके दिग्गज नेते आहात तुम्ही. तुम्ही इतके माननीय आहात. मी तुमचा आदर करते. हे तुम्ही काय करून बसलात? तुम्ही एका महिलेचा, एका मुस्लिम महिलेचा नकाब ओढताय. किती चुकीची गोष्ट आहे ही नितीशजी. मी तुमचा इतका आदर करते. तुमच्यावर प्रेम करते. तुम्ही असे प्रकार करत आहात. जर मी तुमच्यापाशी आले आणि सगळ्यांसमोर तुमचं धोतर खेचलं, तुमच्या पॅन्टचा नाडा ओढला तर चालेल का? तुम्ही एका महिलेला इज्जत देता आणि लगेच तिची इज्जत काढून घेता. तुम्हाला लाज वाटत नाही का? तुम्ही माझे फेवरेट नेते आहात. पण तुम्ही काय वागून बसलात मुस्लिम महिलेसोबत. ही चुकीची गोष्ट आहे.तुम्ही त्या महिलेची माफी मागितली पाहिजे. मीडियासमोर त्या महिलेला बहिणीच्या नात्याने बोलवून तिची माफी मागा. मी तुमचा आदर करते. मी यूपी बिहारचाही आदर करते. पण एखादा महिलेसोबत होणारा अत्याचार अन्याय, खास करून तिच्या बुरख्यासोबत केली जाणारी छेडछाड मी कदापि सहन करणार नाही. तुम्ही आधी माफी मागा." असं राखी सावंत म्हणाली आहे.
View this post on Instagram
'त्या' व्हिडीओवर दंगल गर्ल संतापली
अभिनेत्री झायरा वसीम आता चित्रपटसृष्टीपासून दूर असली, तरी सामाजिक मुद्द्यांवर ती सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकत्याच घडलेल्या एका घटनेवरून तिने तीव्र नाराजी व्यक्त केली असून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी संबंधित महिलेची बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी करत संताप व्यक्त केलाय. या घटनेवर प्रतिक्रिया देताना झायरा वसीमने स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. तिने लिहिले की, कोणत्याही महिलेच्या प्रतिष्ठेशी किंवा विनम्रतेशी खेळ केला जाऊ नये, विशेषतः सार्वजनिक मंचावर तर अजिबातच नाही. एक मुस्लिम महिला म्हणून, दुसऱ्या महिलेचा नकाब अशा प्रकारे ओढला जाताना पाहणं अत्यंत संतापजनक असल्याचं तिने नमूद केलं. सत्तेत असणं म्हणजे मर्यादा ओलांडण्याचा अधिकार नसतो, असं सांगत तिने नितीश कुमार यांनी त्या महिलेची बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी केली.
बिहारमध्ये सामाजिक सलोखा आणि महिला सक्षमीकरणाबाबत सातत्याने दावे केले जात असताना, हा वाद त्या दाव्यांची कसोटी ठरत आहे. येत्या काळात सरकार आणि संबंधित घटक या प्रकरणावर कोणती भूमिका घेतात, तसेच या घटनेची औपचारिक चौकशी किंवा सार्वजनिक स्पष्टीकरण* होतं का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.























