Pankaj Tripathi Mother Passed Away: अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्यावर दुःखाचा डोंगर, 89 व्या वर्षी आईचं निधन
त्यांनी अनेकदा मुलाखतींमध्ये सांगितलं आहे की त्यांच्या आयुष्यातील संस्कार, संयम आणि साधेपणा आईकडूनच मिळाला. त्यामुळे त्यांच्या निधनानं संपूर्ण चाहतावर्ग आणि चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

Pankaj Tripathi: बॉलीवूडमधील गुणी अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या आई हेमवंती देवी यांचं 89 व्या वर्षी निधन झालं आहे. पंकज त्रिपाठी यांच्या कडून जारी केलेल्या निवेदनाद्वारे ही दु:खद बातमी समोर आली आहे. जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे, “आम्हाला हे सांगताना अतिशय दु:ख होत आहे की श्री पंकज त्रिपाठी यांच्या प्रिय माता श्रीमती हेमवंती देवी यांचं शुक्रवारी बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील बेलसंड येथील त्यांच्या राहत्या घरी शांतपणे निधन झालं. त्या काही काळापासून आजारी होत्या आणि आपल्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत, आपल्या खाटेवरच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.” (Actor Pankaj Tripathi Mother Passed away)
या कठीण क्षणी पंकज त्रिपाठी स्वतः आईसोबत उपस्थित होते. त्यांच्या आईचं अंत्यसंस्कार शनिवारी बेलसंड येथे कुटुंबीय, नातेवाईक आणि काही जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत पार पडले.त्रिपाठी कुटुंब सध्या या शोकात बुडालं आहे. त्यांनी सर्वांना विनंती केली आहे की, “कृपया श्रीमती हेमवंती देवी यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करा आणि या शोककाळात कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करा.” पंकज त्रिपाठींचं आपल्या आईशी अतिशय जिव्हाळ्याचं नातं होतं. त्यांनी अनेकदा मुलाखतींमध्ये सांगितलं आहे की त्यांच्या आयुष्यातील संस्कार, संयम आणि साधेपणा आईकडूनच मिळाला. त्यामुळे त्यांच्या निधनानं संपूर्ण चाहतावर्ग आणि चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
Pankaj Tripathi:दोन वर्षांपूर्वी वडील वारले
यापूर्वी, अभिनेत्याचे वडील पंडित बनारस त्रिपाठी यांचे 21ऑगस्ट 2023रोजी त्यांच्या मूळ गावी निधन झाले. त्यावेळी पंकज त्रिपाठी मुंबईत 'ओएमजी 2' चे प्रमोशन करत होते आणि ही बातमी मिळताच ते अंत्यसंस्कारासाठी लगेच बिहारला परतले.
पंकज त्रिपाठी यांनी आपल्या वडिलांकडूनच साधेपणा आणि कष्टाची शिस्त शिकली होती. त्यांचे वडील एक पुजारी आणि शेतकरी होते, आणि पंकजही लहानपणी शेतीकामात वडिलांना हातभार लावत असत. पुढे पटना येथील नाट्यमहाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) मधून पदवी घेतली आणि अभिनयाच्या आवडीला करिअरमध्ये रूपांतरित करण्यासाठी मुंबई गाठली.
'या' चित्रपटांमध्ये केलंय काम
मुंबईत सुरुवातीला संघर्षाचा काळ होता, पण अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटातून त्यांना मोठी झेप मिळाली. या चित्रपटानंतर त्यांच्या अभिनयाला नवी ओळख मिळाली. प्रामाणिक अभिनय, सहज संवादशैली आणि जमिनीशी जोडलेली व्यक्तिरेखा साकारण्यात पंकज त्रिपाठी हे नाव आज विश्वासार्ह ठरले आहे.
त्यांनी ‘मसान’, ‘न्यूटन’, ‘स्त्री’, ‘मिर्झापूर’, ‘मिमी’ आणि ‘ओएमजी 2’ अशा अनेक लोकप्रिय चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. त्यांच्या अप्रतिम अभिनयासाठी पंकज त्रिपाठी यांना 2023 मध्ये ‘मिमी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. जो त्यांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला.























