प्रसिद्ध अभिनेता अन् दिग्दर्शकाचा मृत्यू; हृदयाच्या आजारामुळे झाले होते त्रस्त, 72 व्या वर्षी निधन
Director and Actor Mohammad Bakri Passes Away: पॅलेस्टिनी दिग्दर्शक व अभिनेता मोहम्मद बकरी यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन. अरब आणि हिब्रू चित्रपटांमध्ये उल्लेखनीय कामगिरी.

Director and Actor Mohammad Bakri Passes Away: सिनेविश्वातून एक दुख:द बातमी समोर येत आहे. पॅलेस्टिनी दिग्दर्शक आणि अभिनेता मोहम्मद बकरी यांचे निधन झाले आहे. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मोहम्मद बकरी यांनी आपल्या कारकिर्दीत अरबी आणि हिब्रू या दोन्ही भाषांमध्ये काम केले आहे. दरम्यान, मोहम्मद बकरी यांच्या निधनाची कुटुंबाने अधिकृत माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बकरी यांना 2003 साली रिलीज झालेल्या 'जेनिन,जेनिन' या डॉक्यूमेंट्रीमुळे प्रसिध्दी मिळाली होती. या डॉक्यूमेंट्रीचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. दरम्यान, या डॉक्यूमेंट्रीवर इस्रायलने बंदी घातली होती. मोहम्मद बकरी यांच्या निधनाची बातमी पसरताच चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोहम्मद बकरी यांचा जन्म 27 डिसेंबर 1953 रोजी इस्रायलमध्ये झाला होता. त्यांनी 2025मध्ये प्रदर्शित झालेल्या 'ऑल दॅट्स लेफ्ट ऑफ यू' या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट एका पॅलेस्टिनी कुटुंबाच्या कथेवर आधारीत होता. या चित्रपटात मोहम्मद बकरी यांची २ मुलं, एडम आणि सालेह बकरी यांनी देखील मुख्य भूमिका साकारली होती. त्यांच्या अभिनयाचं प्रेक्षकवर्गाकडून कौतुकही करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे अकादमी अवॉर्ड्सने या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट आतंरराष्ट्रीय फीचर फिल्मसाठी शॉर्टलिस्ट केले आहे.
तेल अवीव विद्यापीठातून शिक्षण घेतले
गेल्या काही वर्षांत, त्यांनी पॅलेस्टिनी लोकांच्या अनुभवांचे वेगवेगळे पैलू दर्शविणारे अनेक चित्रपट तयार केले आहेत. बकरी यांनी आपल्या कारकिर्दीत हिब्रू भाषेतही काम केलंय. 1980 आणि 1990 या काळात त्यांनी अनेक प्रसिद्ध इस्रायल चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी तेल अवीव विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. मोहम्मद बकरी यांनी चित्रपट आणि रंगभूमी दोन्ही माध्यमात उत्तम काम केले. त्यांनी अभिनय क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केली. लेखक एमिल हबीबी यांच्या लेखनावर आधारीत 1986 साली वन मॅन शो 'द पेसोप्टिमिस्ट' प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारली होती. दरम्यान, मोहम्मद बकरी यांच्या निधनामुळे सिनेविश्व तसेच चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बुधवारी त्यांचे हृदय आणि फुफ्फुसांच्या गंभीर आजारांमुळे निधन झाले. त्यांचे चुलत भाऊ रफिक बकरी यांनी अरबी वृत्तसंस्था अल जरमकला सांगितले की, मोहम्मद बकरी यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून लोकांसाठी आवाज उठवला. मोहम्मद बकरी यांनी त्यांच्या कारकिर्दीत, विविध पैलूंचे चित्रण करून असंख्य चित्रपटांची निर्मिती केली. तसेच अभिनयही केला. त्यांनी आपल्या कारकिर्दीत हिब्रू भाषेतही अभिनयही केला. त्यांनी तेल अवीवमधील इस्रायलच्या राष्ट्रीय नाट्यगृहात रंगमंचावर सादरीकरण केले.























