Louise Fletcher Death: ऑस्कर विजेत्या अभिनेत्री लुईस फ्लेचर यांचे निधन, 88व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Louise Fletcher Death: ऑस्कर विजेत्या अभिनेत्री लुईस फ्लेचर यांचे वयाच्या 88व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे.
Louise Fletcher Death: ऑस्कर विजेत्या अभिनेत्री लुईस फ्लेचर (Louise Fletcher) यांचे वयाच्या 88व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे. लुईस फ्लेचर यांनी त्यांच्या राहत्या घरीच अखेरचा श्वास घेतला. 1975 मध्ये मिलोस फोरमन दिग्दर्शित ‘वन फ्लू ओव्हर द कुकूज नेस्ट’ या चित्रपटात साकारलेल्या नर्स रॅचेडच्या भूमिकेसाठी लुईस फ्लेचर प्रसिद्ध होत्या. या चित्रपटात अभिनेते जॅक निकोल्सन यांनीही काम केले होते.
1975 मध्ये आलेल्या 'वन फ्लू ओव्हर द कुकूज नेस्ट' या चित्रपटात त्यांनी साकारलेली नर्स ही चित्रपटाची खलनायिका होती. लुईस फ्लेचर यांनी 23 सप्टेंबर रोजी फ्रान्समधील मॉन्टदुरास येथील त्यांच्या घरी अखेरचा श्वास घेतला. लुईस फ्लेचर यांनी झोपेतच या जगाचा निरोप घेतला.
टीव्ही मालिकांपासून केली करिअरची सुरुवात
'वन फ्लू ओव्हर द कुकूज नेस्ट' या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना 1976मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. लुईस यांचा (Louise Fletcher) जन्म 22 जुलै 1934 रोजी बर्मिंगहॅम, अलाबामा, यूएसए येथे झाला होता. लुईस यांनी 1950च्या उत्तरार्धात आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. ‘लॉमन’, ‘बॅट मास्टरसन’, ‘मॅव्हरिक’, ‘द अनटचेबल्स’ आणि ‘77 सनसेट स्ट्रिप’ यांसारख्या टीव्ही मालिकांमध्येही त्या झळकल्या होत्या. लुईस यांनी त्यांच्या 6 दशकांच्या अभिनय कारकिर्दीत अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले होते.
नेटफ्लिक्सच्या शोमध्येही झळकल्या
लुईस फ्लेचर (Louise Fletcher) या अखेर नेटफ्लिक्सच्या कॉमेडी टीव्ही शो ‘गर्लबॉस’मध्ये झळकल्या होत्या. ही सीरिज 2017मध्ये प्रदर्शित झाली होती. त्यांनी 1958 मध्ये 'लॉमन' या टीव्ही मालिकेतून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. यानंतर त्या टीव्ही मालिका ‘Maverick’ मध्ये झळकल्या. करिअरसोबतच लुईस फ्लेचरचे वैयक्तिक आयुष्यही चर्चेत आले होते. लुईस फ्लेचर यांनी 1960 मध्ये साहित्यिक आणि निर्माता बेरी झिक यांच्याशी लग्न केले. परंतु, 1977मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. लुईस फ्लेचर यांना दोन मुले देखील आहे. घटस्फोट झाल्यानंतर त्यांनी मुलांचा सांभाळ करण्यासाठी अभिनयातून तब्बल 11 वर्षांचा ब्रेक घेतला होता.
ऑस्कर जिंकल्यानंतर सांकेतिक भाषेमध्ये दिले भाषण!
लुईस यांचे आई-वडील मुकबधीर होते. यामुळे त्यांनी लहानपणापासून सांकेतिक भाषा शिकून घेतली होती. लुईस फ्लेचर यांनी ऑस्कर जिंकल्यानंतर दिलेल्या भाषणात देखील सांकेतिक भाषा वापरली होती. हा ऑस्करच्या अविस्मरणीय क्षणांपैकी एक क्षण मानला जातो. ऑस्कर, बाफ्टा आणि गोल्डन ग्लोब हे तिन्ही पुरस्कार जिंकणाऱ्या लुईस फ्लेचर या तिसऱ्या अभिनेत्री होत्या.
हेही वाचा :