ED Questioned Karan-Krystle: करण वाही आणि क्रिस्टल डिसूझाला ईडीचं समन्स, मनी लाँड्रींग प्रकरणात झाली चौकशी
ED Questioned Karan-Krystle: बॉलीवूड अभिनेता करण वाही आणि क्रिस्टल डीसूझा यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं होतं. मनी लॉन्ड्रींग प्रकरणात त्यांची चौकशी करण्यात आली आहे.
ED Questioned Karan-Krystle: अभिनेता करण वाही (Karan Wahi) आणि अभिनेत्री क्रिस्टल डिसूझा (Krystle D'Souza) ईडीच्या कचाट्यात सापडले आहेत. मनी लॉन्ड्रींग प्रकरणात दोन्ही कलाकारांना ईडीकडून समन्स पाठवण्यात आलं आहे. या प्रकरणात ईडीने करण आणि क्रिस्टल यांची 3 जुलै रोजी चौकशी देखील केली. याच प्रकरणात अभिनेत्री निया शर्मालाही याआधी समन्स बजावण्यात आल्याचं वृत्त समोर आलं होतं. अभिनेता करण वाही आणि अभिनेत्री क्रिस्टल डिसूझाला आंतरराष्ट्रीय एजंटद्वारे अवैध ऑनलाइन विदेशी ट्रेडिंगशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात समन्स बजावण्यात आले होते. याच प्रकरणात आता त्यांची चौकशी करण्यात आली आहे.
'क हजारों में मेरी बहना है' या मालिकेतून क्रिस्टल घराघरात पोहचली. याच मालिकेत तिच्यासोबत अभिनेत्री निया शर्मा आणि कुशल टंडन यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. तसेच करण वाही हा दिल मिल गये आणि चन्ना मेरे यांसारख्या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आला. सध्या तो रायसिंघानी vs रायसिंघानी या सिरिजमुळे चर्चेत आला आहे.
ईडीच्या छापेमारीत बँकेतील रक्कम गोठवली
याच संदर्भात याच वर्षी 20 एप्रिल रोजी ईडीने मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि दिल्लीतील अनेक ठिकाणी छापे टाकले होते.या काळात ईडीने सुमारे अडीच कोटी रुपयांचे बँक फंडही गोठवले होते. एजन्सीला या प्रकरणाशी संबंधित डिजिटल पुरावे आणि कागदपत्रेही मिळाली होती. तसेच सगळ्यात आधी या प्रकरणात पुणे पोलिसांनी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. ज्याचा ताबा कालांतराने ईडीने घेतला आणि पीएमएलए अंतर्गत तपास सुरू केला.आंतरराष्ट्रीय ब्रोकर octaFX ट्रेडिंग ॲपद्वारे भारतात अवैध ऑनलाइन फॉरेक्स ट्रेडिंग होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासाठी आरबीआयकडून परवानगी घेण्यात आली नव्हती, त्यामुळेच ईडीने पीएमएलए अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
करण वाही आणि क्रिस्टल डिसूझाला मिळाली होती मोठी रक्कम
Octafx ऑनलाइन ट्रेडिंग ॲप आणि त्याच्याशी संबंधित वेबसाइट त्याच्या OctaFX इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या भारतीय संस्थेच्या मदतीने चालवली जात होती. या ॲपने आतापर्यंत भारतात 500 कोटी रुपयांचा व्यापार केला आहे. यामध्ये लोकांना कमी पैसे गुंतवून मोठा नफा मिळवून दिला जात होता.सोशल मीडियावर या अवैध ट्रेडिंग फॉरेक्स ॲपच्या प्रमोशनसाठी करण वाही आणि क्रिस्टल डिसूझा यांना निवडण्यात आलं होतं. ॲपकडे अधिकाधिक लोकांचे लक्ष वेधून घेणे आणि त्यांना मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवणे हा त्याचा उद्देश होता. यामाध्यमातून त्यांना मोठी रक्कम मिळाली असल्याची माहिती समोर आलीये.
ही बातमी वाचा :
Namrata Sambherao : 'आमचं शेतीघर...', निसर्गाच्या सानिध्यात तयार झालं नम्रताचं नवं घर