Myra Vaikul: 'हिचं लहानपण हरवलंय', अवघ्या 7 वर्षांच्या चिमुकलीचं बोलणं ऐकून नेटकरी बरसले; मायरा वायकुळचे आईवडिल झाले ट्रोल
Myra Vaikul : बालकलाकार मायरा वायकुळ ही आता नाच गं घुमा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण सध्या मायरासह तिचे आईवडिल एका मुद्द्यावरुन बरेच ट्रोल होतायत.
Myra Vaikul Parents trolled : 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून भेटीला आलेली छोटी परी म्हणजेच मायरा वायकुळ (Myra Vaikul) प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. त्यानंतर मायरा हिंदी मालिकांमध्ये झळकायची देखील संधी मिळाली. त्यानंतर आता या चिमुकलीने छोट्या पडद्यावर पाऊल ठेवलं आहे. मायरा ही परेश मोकाशीच्या नाच गं घुमा या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या मायरा ही तिच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून अनेक मुलाखती देखील ती देत आहे. पण सध्या तिच्या आईवडिलांना बरच ट्रोल केलं जातंय.
अवघ्या सात वर्षांची असलेली ही चिमुकली तिच्या प्रत्येक गोष्टी अगदी मोठ्या माणसांप्रमाणे सांगते, असं अनेकांचं म्हणणं आहे. यामध्ये सगळा दोष हा तिच्या आईवडिलांचा असल्याचंही अनेकांचं मत आहे. मायरा ही सर्वात आधी तिच्या व्लॉगमुळे आणि रिल्समुळे प्रसिद्ध झाली होती. तिच्या सोशल मीडियावरील तिचे अकाऊंट्स ही तिची आई म्हणजेच श्वेता वायकुळ या हँडल करतात.
मायराचे आईवडिल का होतायत ट्रोल?
मायराचा तारांगण या वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये मायराला विचारण्यात आलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं तिने अगदी मोठ्या माणसांप्रमाणे दिली असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे अवघ्या सात वर्षांच्या या चिमुकलीला ट्रोलिंगला सामोरं जावं लागत आहे. या मुलाखतीमध्ये मायरला तिच्या भविष्यातील प्लॅन्सविषयी विचारण्यात आलं. त्यावर तिने म्हटलं की, मला माझ्या आईवडिलांचा व्यवसाय सांभाळायचा आहे. मला माहित नाही, पुढे जाऊन काय होणार, ते फक्त देवाला माहित आहे. मी सिनेमे, मालिका करणारच आहे, पण ते सगळं त्यालाच माहित मी कसं करणार आहे, असं उत्तर या अवघ्या सात वर्षांच्या चिमुकलीने दिलं.
नेटकऱ्यांनी काय म्हटलं?
यावर एकाने कमेंट करत म्हटलं की, ती विसरली आहे की ती फक्त सात वर्षांची आहे, तिचं बोलणं हे अगदी मोठ्या बाईसारखं आहे. एकाने म्हटलं की, मुलगी खूपच मोठ्या माणसांप्रमाणे बोलतील हिच्या वयाला हे शोभत नाही आणि बरही वाटत नाही की लहान मुलांसारखा हवं आणि आणि लहानांसारखं जगावं हे बालपण परत येत नाही. आणखी एकाने म्हटलं की, वयाच्या मानाने अति बोलते, तिच्या आईवडिलांना कळत नाही.यामध्ये तिचा दोष नाही. पैश्यांपुढे कसले आले बालपण. सगळं पढवून, पाठ करुन तिला बोलायला लावतात. नंतर आईवडिलच पस्तावणार.
दरम्यान मायरा ही तिच्या रिल्समुळे विशेष प्रसिद्ध आहे. त्यानंतर मायराने आता छोट्या पडद्यावरुन मोठ्या पड्यावर उडी घेतली आहे. त्यामुळे तिचं सर्वत्र कौतुक देखील केलं जातंय. तसेच मायरा आता कोणत्या तिच्या नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची देखील अनेकांना उत्सुकता आहे.