Gunaratna Sadavarte : मोठी बातमी : मराठा आरक्षणाची इतकी महत्त्वाची सुनावणी, तुम्ही बिग बॉसमध्ये जाऊन बसलात? हायकोर्टाने गुणरत्न सदावर्तेंना सुनावलं
Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांच्या बिग बॉसमधील एन्ट्रीवर हायकोर्टाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी बिग बॉसमध्ये (Bigg Boss 18) एन्ट्री घेतल्यानंतर एकच चर्चा सुरु झाली. सदावर्ते हे बिग बॉसच्या घरातून बरेच मोठे गौप्यस्फोटही करत आहेत. पण असं सगळं असताना हायकोर्टाने मात्र सदावर्तेंवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कारण गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका हायकोर्टात दाखल होती. या याचिकेवर सुनावणी सुरु असतानाच सदावर्ते बिग बॉसच्या घरात जाऊन बसले आहेत.
या सगळ्यावर हायकोर्टाने गुणरत्न सदावर्तेंना सुनावलं असून आता या याचिकेवर युक्तिवाद करण्याची कुणालाही संधी मिळणार नसल्याचं हायकोर्टाने स्पष्ट केलं आहे. दरम्यान हायकोर्टाने या याचिकेवरील सुनावणी 19 नोव्हेंबरपर्यंत तहकूबही केली आहे.
गुणरत्न सदावर्तेंच्या एन्ट्रीवर हायकोर्टाची नाराजी
डॉ. गुणरत्न सदावर्तेंच्या वर्तनावर हायकोर्टाची तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "मराठा आरक्षणाची इतकी महत्त्वपूर्ण सुनावणी सुरू असताना सदावर्ते बिग बॉसमध्ये जाऊन बसलेत", अशी माहिती इतर वकिलांकडून हायकोर्टाला देण्यात आलीये. या प्रकरणातील मूळ याचिकाकर्त्यांना प्रकरणाचं गांभीर्यचं नाही का? असा सवाल उपस्थित करत आपली याचिका सर्वात आधी घ्या म्हणून सदावर्ते आमच्यापुढे विनंती करत होते असं हायकोर्टाने म्हटलं आहे. आता युक्तिवाद करण्याची वेळ आली तर तेच गायब झाले? असाही सवाल हायकोर्टाने केलाय.
मराठा आरक्षणाला विरोध करणा-या सर्व याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद संपला, आता कुणालाही युक्तिवाद करण्याची संधी मिळणार नाही, असं हायकोर्टाने म्हटलं आहे. पुढील सुनावणीत राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता डॉ. बीरेंद्र सराफ युक्तिवाद करणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील प्रकरणाची हायकोर्टातील पूर्णपीठापुढील सुनावणी 19 नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आलीये.
गुणरत्न सदावर्तेंची बिग बॉसमध्ये एन्ट्री
ते आले, त्यांनी पाहिलं आणि त्यांच्याच नावाची चर्चा... अशी काही परिस्थिती झाली ज्या वेळी अॅड. गुणरत्न सदावर्ते हे हिंदी बिग बॉसच्या घरात पोहोचले. 'ना पेशी होगी, ना गवाही होगी' असा डॉयलॉग सदावर्तेंनी मारला. 'डंके की चोट पे हम सदावर्ते है' असं सांगत त्यांनी आपली ओळख करून दिली. ज्यावेळी सलमान म्हणाला की, सदावर्तेंना संपूर्ण देश ओळखतो, त्यावेळी सदावर्तेंनी आणखी एक डॉयलॉग मारला. 'माझे नाव आधी पोहोचते, मग आवाज पोहोचतो' असं हिंदीमध्ये त्यांनी सांगितलं आणि शोचा होस्ट सलमान खान खळखळून हसायला लागला.