Aai Tuljabhavani: ‘आई तुळजाभवानी’मध्ये दिव्य आवर्तन योग; जगदंबा, महिपती आणि शिवच्या आयुष्याला निर्णायक वळण
आगामी भागांमध्ये मालिकेत दाखवला जाणारा ‘दिव्य आवर्तन योग’ हा केवळ एक ज्योतिषीय संयोग नसून, तो प्रमुख पात्रांच्या आयुष्याला पूर्णपणे नवं वळण देणारा ठरणार आहे.

Marathi Serial: कलर्स मराठीवरील लोकप्रिय आणि चर्चेत असलेली मालिका ‘आई तुळजाभवानी’ (Aai Tuljabhavani) सध्या कथानकाच्या अत्यंत निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. आतापर्यंत भावनिक संघर्ष, नात्यांमधील तणाव, लपलेली सत्यं आणि मनात दडलेले हेतू यांभोवती फिरणारी कथा आता थेट नियतीच्या खेळाकडे वळताना दिसते आहे. आगामी भागांमध्ये मालिकेत दाखवला जाणारा ‘दिव्य आवर्तन योग’ हा केवळ एक ज्योतिषीय संयोग नसून, तो प्रमुख पात्रांच्या आयुष्याला पूर्णपणे नवं वळण देणारा ठरणार आहे.
महिपतीने आखलेले डाव आता अधिक तीव्र
जगदंबा, महिपती आणि शिव या तिघांच्याही आयुष्याचा प्रवास या टप्प्यावर एकमेकांशी अधिक घट्टपणे गुंफला जातो आहे. महादेवांच्या भक्तीत तल्लीन असलेल्या जगदंबाला त्या मार्गापासून रोखण्यासाठी महिपतीने आखलेले डाव आता अधिक तीव्र होत चालले आहेत. तिच्या भक्तीमध्ये अडथळे आणणं, तिच्या निर्णयांवर प्रभाव टाकणं आणि तिच्या आयुष्यावर नियंत्रण मिळवण्याची महिपतीची घाई या सगळ्यामुळे कथानकात तणाव शिगेला पोहोचला आहे.
या सगळ्या घडामोडींच्या केंद्रस्थानी असलेला दिव्य आवर्तन योग जगदंबासाठी आत्मचिंतनाचा आणि अंतर्मुख करणारा काळ ठरणार आहे. तिला मिळणारे संकेत, मनात निर्माण होणारी अस्वस्थता आणि नियतीकडून मिळणाऱ्या खुणा यामुळे तिच्या आयुष्यात मोठा बदल घडण्याची चाहूल लागते आहे. दुसरीकडे, शिवसाठी हा योग स्वतःच्या निर्णयांकडे नव्यानं पाहण्याचा आणि बदल स्वीकारण्याचा टप्पा ठरणार आहे. आजवर घेतलेल्या निर्णयांचा परिणाम आता त्याला स्पष्टपणे जाणवू लागणार आहे.
जगदंबाची दैवी शक्ती करतेय महिपतीला अस्वस्थ
महिपतीसाठी मात्र हा काळ अधिक अस्वस्थ करणारा ठरणार आहे. जगदंबाला मिळणारी दैवी शक्ती आणि तिच्या आयुष्यात होणारे परिवर्तन पाहून महिपतीची घाई आणि असुरक्षितता वाढताना दिसणार आहे. त्यामुळे तो आणखी धोकादायक निर्णय घेणार का, की नियतीपुढे त्याचे डाव कोसळणार, हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण करतो आहे.
‘आई तुळजाभवानी’मधील हा दिव्य आवर्तन योग कर्म, नियती आणि मानवी निर्णय यांचं समीकरण नव्यानं मांडणार आहे. या टप्प्यानंतर नात्यांची दिशा बदलेल का, विश्वासाला तडा जाईल का, आणि आजवर ठरलेला प्रवास अचानक उलटेल का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मात्र एक गोष्ट नक्की, या आवर्तनानंतर जगदंबा, शिव आणि महिपती यांचं आयुष्य पूर्वीसारखं राहणार नाही. हा गूढ, भावनिक आणि दैवी वळण घेणारा प्रवास अनुभवण्यासाठी पाहायला विसरू नका ‘आई तुळजाभवानी’, सोम ते शनि, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर.























