Marathi Movie Updates Gabh Movie : फिल्म फेस्टिवल्स गाजवणारा रांगड्या मातीतला ‘गाभ’ प्रदर्शित होणार; महत्त्वाच्या विषयावर करणार भाष्य
Marathi Movie Updates Gabh Movie : ‘गाभ'हा मराठी चित्रपट आता प्रदर्शनास सज्ज झाला आहे. या चित्रपटातून प्राणी आणि मानवाच्या भावबंधावर भाष्य करण्यात आले आहे
Marathi Movie Updates Gabh Movie : मराठी सिनेसृष्टीत कथा, आशय केंद्रस्थानी राहिला आहे. सर्वसामान्यांच्या जगण्याचा वेध घेणाऱ्या मराठी चित्रपटांना नेहमीच चांगला प्रतिसाद मिळत आला आहे. वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवांतून नावाजला गेलेला ‘गाभ' (Gabh Marathi Movie) हा मराठी चित्रपट आता प्रदर्शनास सज्ज झाला आहे. या चित्रपटातून प्राणी आणि मानवाच्या भावबंधावर भाष्य करण्यात आले आहे. हा चित्रपट 21 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. अभिनेता कैलास वाघमारे याची महत्त्वाची भूमिका आहे.
गाभ कोणत्या विषयावर करणार भाष्य?
समाजातील वास्तव मांडणारे सिनेमे मनोरंजनासोबतच कटू सत्य सादर करण्याचंही काम करीत असतात. मनुष्य आणि प्राणी यांना केंद्रस्थानी ठेवून ‘गाभ’ चित्रपटाची कथा मांडली आहे. ही कथा एका मानसिकतेचं प्रतिनिधित्व करते. या मानसिकतेचं प्रतिनिधित्व करणारी भूमिका अभिनेता कैलास वाघमारे याने आपल्या ‘दादू’ या पात्रातून साकारली आहे.स्वत:च्या म्हशीसाठी एका रेड्याचा शोध घेताना माणूस म्हणून होणारा बदल आणि त्या बदलाची कथा हळव्या प्रेमाच्या माध्यमातून दाखवणारा गावच्या रांगड्या मातीतला ‘गाभ’ चित्रपट आहे.
‘गाभ’ चित्रपटाची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन अनुप जत्राटकर यांचे आहे. सुमन नारायण गोटुरे आणि मंगेश नारायण गोटुरे या्ंनी चित्रपटाची निर्माती केली आहे.
View this post on Instagram
चित्रपटात कोणते कलाकार?
‘गाभ’ चित्रपटात कैलास वाघमारे, सायली बांदकर, विकास पाटील, उमेश बोळके, वसुंधरा पोखरणकर, श्रद्धा पवार, चंद्रशेखर जनवाडे यांच्या भूमिका आहेत. छायाचित्रण वीरधवल पाटील यांचे तर संकलन रविंद्र चांदेकर यांचे आहे. गीते आणि संगीत, आणि साउंड डिझाइनची जबाबदारी चंद्रशेखर जनवाडे यांनी सांभाळली आहे. पार्श्वसंगीत रविंद्र चांदेकर यांचे आहे. आनंद शिंदे, प्रसन्नजीत कोसंबी, सावनी रविंद्र यांच्या आवाजात गीते स्वरबद्ध करण्यात आली आहेत.