Rutuja Bagwe Reveals Struggle In Marathi Industry: 'तू हिरोईन मटेरियल नाहीस...', मराठी अभिनेत्रीला तीन महिन्यांतच दाखवलेला मालिकेतून बाहेरचा रस्ता, इतरवेळीही दिसण्यावरुन केलं जायचं ट्रोल...
Rutuja Bagwe Reveals Struggle In Marathi Industry: नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना मराठी अभिनेत्रीनं तिला आलेल्या काही धक्कादायक अनुभवांबाबत खुलासा केला. तू हिरोईन मटेरियल नाहीस, असं तिला तिच्या तोंडावर सांगून मालिकेतून अचानक बाहेर काढण्यात आल्याचंही यावेळी अभिनेत्रीनं सांगितलं.

Rutuja Bagwe Reveals Struggle In Marathi Industry: बॉलिवूडप्रमाणेच (Bollywood News) मराठी इंडस्ट्रीतही (Marathi Industry) नाव कमावण्यासाठी अनेक कलाकार धडपडत असतात. काहीजण मिळेल ते काम करतात, तर काहीजण त्यांना हव्या त्या संधीची वाट पाहतात. अनेकांना फार संघर्ष करावा लागत नाही. मात्र, काहीजण संघर्ष करुन यशाचं सर्वोच्च शिखर गाठतात. अनेकांना वारंवार नकार पचवावा लागतो, तर अनेकांना अगदी सहज हवी तशी, हवी ती भूमिका मिळते. आजवर अनेकांनी आपला स्ट्रगल उघडपणे सांगितला आहे. तसेच, त्यादरम्यान आलेल्या चांगल्या, वाईट अनुभवांबाबतही मोकळेपणानं सांगितलं आहे.
नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवे (Marathi Actress Rutuja Bagwe) हिनंही तिला आलेल्या काही धक्कादायक अनुभवांबाबत खुलासा केला आहे. तू हिरोईन मटेरियल नाहीस, असं तिला तिच्या तोंडावर सांगून मालिकेतून अचानक बाहेर काढण्यात आल्याचंही यावेळी अभिनेत्रीनं सांगितलं. तसेच, एका मालिकेसाठी मुख्य अभिनेत्री म्हणून निवड झालेली, पण त्यावेळीही दिसण्यावरुन ट्रोल करण्यात आल्याचं अभिनेत्रीनं सांगितलं.
ऋतुजा बागवे नेमकं काय म्हणाली?
मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवे हिनं नुकतीच 'आरपार' या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना तिनं तिला मराठी इंडस्ट्रीत आलेल्या स्ट्रगलबाबत सगळं स्पष्ट सांगितलं. तसेच, तिनं तिला एका मालिकेतून अचानक बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला, याबाबतही सांगितलं.
ऋतुजा बागवे म्हणाली की, "मी आधी मालिकांचे खूप ऑडिशन्स देत होते. त्यात मी फायनल व्हायचे, परत नकार मिळायचा. असं अनेकदा झालं. मला प्रश्न पडायचा की, मला नकार का मिळतो? तर मला असं सांगितलं जायचं की, तू हिरोईन मटेरियल वाटत नाहीस, हिरोईनसारखी वैशिष्ट्ये तुझ्यामध्ये नाहीत किंवा काम छान करतेस, पण तू आम्हाला हवी तशी हिरोईन नाहीयेस, असं मला सांगितलं जायचं."
View this post on Instagram
"तू हिरोईन मटेरियल नाहीस..."
"मी विचार केला की, आपण प्रयत्न करत राहायचं. मग मी एक मालिका केली आणि त्या मालिकेतून मला तीन महिन्यांत काढलं. तर मी त्यांना विचारलं की, मला अचानक असं रिप्लेस का केलं? कारण- तुम्ही मला ऑडिशन वगैरे घेऊनच कास्ट केलं होतं. तर मला ते म्हणाले की, आता जी मूळ हिरोईन आहे ती नसणार. तर, त्या पात्राला आम्ही हिरोईन करणार आहोत आणि एक हीरो वगैरेसुद्धा येणार आहे. तुझ्यामध्ये ते हिरोईन फीचर्स नाहीत. तू हिरोईन मटेरियल नाही वाटत, म्हणून चॅनेलचं असं म्हणणं आहे की, तुला रिप्लेस करावं...", असं ऋतुजा बागवेनं सांगितलं.
"मला त्यावेळी खूप वाईट वाटलं. वाटलं की बापरे, असंही असतं. आपण खूप जीव लावून काहीतरी करतो आणि कोणीतरी आपल्याला सहज उचलून बाजूला टाकतं... आपण आपलं नाटकच करावं, माझं नाटक कधी मला विचारत नाही की, तू कशी दिसतेस वगैरे... छान काम करत राहुयात... त्यानंतर मी नाटकांतच रमले...", असं ऋतुजा बागवे म्हणाली.
सुदैवानं मला एक भूमिका मिळाली, तिथेही दिसण्यावरुन मला ट्रोल केलं गेलं : ऋतुजा बागवे
पुढे अभिनेत्री म्हणाली की, "आई मला सांगायची तू नायिका होणार, मला माहीत आहे. त्यानंतर असा एक काळ आला की, जेव्हा आपल्या जवळच्या वाटणाऱ्या, घरगुती वाटणाऱ्या तशा नायिका हव्या होत्या आणि मग सुदैवानं मला एक भूमिका मिळाली. तेव्हाही मला दिसण्यावरून ट्रोल केलं गेलं. पण, ती भूमिका, माझं त्यातलं काम ते दोन-तीन महिन्यांनी आवडू लागलं. त्यामुळे लोकांनी मला स्वीकारलं... नंतर मीसुद्धा प्रयत्न केला की, आणखीन कसं छान दिसता येईल वगैरे आणि मुक्ता बर्वेच्या काही मुलाखती पाहिल्या. तिलासुद्धा या सगळ्याला सामोरं जावं लागलं. तर मी विचार केला की, आपण कोण आहे? आपण तर आता शिकतोय, काम करत राहूयात."
"मध्यंतरी एक रिजेक्शनला सामोरं जावं लागलं तेव्हाही वाईट वाटलेलं. मला वाईट वाटलं; पण मी हरत नाही. मी काम करत राहते. हिंदी मालिकेत काम केल्यानंतर आता मला फरकच पडत नाही. आता मी स्वतःला सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे आता माझं असं म्हणणं असतं की, तुम्हाला आवडत असेल, तर मला कास्ट करा. नसेल आवडत, तर माझी काही हरकत नाही", असं सांगितलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























