Marathi Actress Retired: सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा मालिकाविश्वाला रामराम; अचानक निवृत्ती जाहीर केल्यानं इंडस्ट्रीत खळबळ
Marathi Actress Gargi Phule Retired: ज्या निळुभाऊंनी इंडस्ट्री गाजवली, त्याच निळुभाऊंच्या लेकीनं अचानक असा निर्णय का घेतला? अशा चर्चा सध्या सुरू आहेत.

Marathi Actress Gargi Phule Retired: मराठी चित्रपटसृष्टीतील (Marathi Cinema) एका अभिनेत्रीनं मराठी मालिकाविश्वातून (Marathi Serial World) निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं आहे. अभिनेत्रीच्या या निर्णयानं संपूर्ण मराठी इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे. मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज आणि प्रसिद्ध अभिनेते निळू फुले (Nilu Phule) यांच्या कन्या सुप्रसिद्ध अभिनेत्री गार्गी फुले यांच्या निर्णयानं सर्वांना धक्का दिला आहे. ज्या निळुभाऊंनी इंडस्ट्री गाजवली, त्याच निळुभाऊंच्या लेकीनं अचानक असा निर्णय का घेतला? अशा चर्चा सध्या सुरू आहेत.
मराठी मालिकाविश्वातून निवृत्ती का?
एका मुलाखतीत बोलताना गार्गीनं मराठी मालिकाविश्वातून निवृत्ती घेण्याच्या आपल्या निर्णयाबाबत स्पष्टीकरणं दिलं. गार्गी म्हणाली की, "खरं सांगायचं तर मी, मालिकाविश्वातून स्वेच्छेनं निवृत्ती घेतली आहे. कारण मी मालिकाविश्वात 10 वर्ष काम केलं आहे. माझं कुटुंब पुण्यात आहे. मी 10 वर्षे कुटुंबापासून खूप लांब राहिलेय. खरं सांगायचं तर, कलाकारांसाठी मालिकेचं शेड्युल खूप विचित्र झालं आहे. मालिकेमध्ये काम करण्याची जर तुमच्यात आवड असेल तरच तुम्ही मराठी मालिकाविश्वात काम करावं. बाकीच्या दृष्टीने आरोग्यच्या असो किंवा इतर, तर खूप त्रास होतो."
गार्गी फुले-थत्तेनं आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत, अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. गार्गीनं अनेक मालिकांमधून आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. झी मराठीवरील 'तुला पाहते रे' मालिकेतून गार्गी फुले प्रसिद्धीझोतात आली. मालिकेमध्ये त्यांनी साकारलेली ईशाची आई म्हणजेच, पुष्पा निमकर यांची भूमिका चांगलीच गाजली.
View this post on Instagram
'तुला पाहते रे'नंतर गार्गीनं अनेक मालिका केल्या. 'राजा राणीची गं जोडी', 'सुंदरा मनामध्ये भरली', 'इंद्रायणी', 'थोडं तुझं आणि थोडं माझं' या लोकप्रिय मालिकांमधूनही गार्गीनं आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. गार्गीनं फक्त मराठीच नाहीतर, काही हिंदी मालिकाविश्वामध्येही अभिनय केला आहे. याव्यतिरिक्त 'नवरदेव बीएस्सी ॲग्री' या चित्रपटातही तिनं काम केलं आहे. पण, आता मराठी मालिकाविश्वातून निवृत्ती घेतल्याच्या तिच्या वक्तव्यानं सर्वांनाच धक्का बसला आहे.
दरम्यान, गार्गी फुले अभिनय क्षेत्राव्यतिरिक्त राजकारणातही सक्रिय आहे. याव्यतिरिक्त आता तिनं व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. अभिनेत्री गार्गी आता बिझनेसवुमन झाली असून तिनं स्वतःचं Solitude Holiday नावाचं ट्रॅव्हलिंग अॅप लॉन्च केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
श्रेयस तळपदेसोबत 'पारू'नं शेअर केला स्टेज; म्हणाली, "हा माझ्यासाठी..."























