Marathi Actor Help Maharashtra Flood Farmers: शेतकरी अन् पूरग्रस्तांसाठी मराठी कलाकार एकवटले, खाद्यपदार्थ अन् औषधांची जमवाजमव, चाहत्यांना कळकळीचं आवाहन
Marathi Actor Help Maharashtra Flood Farmers: पूरग्रस्तांना मदत पोहोचवण्यासाठी अभिनेता श्रेयस राजे, प्रसाद दाणी, ऋतुराज फडके यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी अनेकांना आवाहनही केलं आहे.

Marathi Actor Help Maharashtra Flood Farmers: गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यावर वरुणराजा अवकृपा झाल्यासारखा कोसळतोय. त्यामुळे महाराष्ट्रात सोलापूर, बीड, धाराशिव अशा बऱ्याच ठिकाणी भयंकर पूरपरिस्थिती उद्भवली आहे. या पुरामुळे जनजीवन प्रचंड प्रमाणावर विस्कळीत झालं आहे. अशातच, मराठवाड्यातील सर्वसामान्यांसाठी, बळीराजासाठी अवघ्या राज्यातून मदतीचा ओघ पाहायला मिळत आहे. अशातच आता कलाकार मंडळीही एकवटली आहे. मराठी कलाकारांनी पूरग्रस्त भागात मदत पोहोचवण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. पूरग्रस्तांना मदत पोहोचवण्यासाठी अभिनेता श्रेयस राजे, प्रसाद दाणी, ऋतुराज फडके यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी अनेकांना आवाहनही केलं आहे.
श्रेयस राजे, प्रसाद दाणी , ऋतुराज फडके यांच्या वतीनं कलाकारांना आवाहन केलं जात आहे. आपल्या महाराष्ट्रात सोलापूर, बीड, धाराशिव अशा बऱ्याच ठिकाणी भयंकर पूरपरिस्थिती उद्भवली आहे हे आपण सगळेच जाणून आहोत. ह्या पुरामुळे जनजीवन प्रचंड प्रमाणावर विस्कळीत झालं आहे. तिकडच्या स्थानिक लोकांचे संसार अक्षरशः वाहून गेले आहेत. तिकडची जनता खूप त्रस्त आहे. त्यांना आपल्या मदतीची प्रचंड गरज आहे. प्रशासन त्यांना योग्य ती मदत पोचवण्याचा प्रयत्न करतच आहे. पण महाराष्ट्राचे नागरिक म्हणून आपल्या बांधवांना संकटातून बाहेर काढण्यासाठी मदतीचा हात देणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे असं आम्ही मानतो. आम्ही काही कलाकार मंडळींनी मिळून 'अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कल्याण शाखेच्या'च्या सहकार्यानं मदतकार्य उभं करण्याचा प्रयत्न केला आहे. येत्या 2 ऑक्टोबरपर्यंत मदत गोळा करण्याचं काम सुरू असणार आहे. तरी, ज्यांना मदत करायची इच्छा आहे त्यांनी पुरग्रस्तांसाठी आंथरायच्या आणि पांघरायच्या चादरी, सुके अन्नपदार्थ (फरसाण, चिवडा), बिस्किट पुडे, आंघोळीचे साबण, काही रोजच्या गरजेची औषधे आणि अशा अनेक गरजेच्या गोष्टींचे पॅकेट करून आचार्य अत्रे रंगमंदिर कल्याण येथे सायंकाळी 4 ते रात्री 10 या वेळेत पोचवण्याचा प्रयत्न करावा. ह्या व्यतिरिक्त काही वेगळी मदत किंवा आर्थिक मदत करायची असेल तर तुम्ही माझ्या प्रोफाईलला डायरेक्ट मेसेज करू शकता, असं आवाहन केलं जात आहे.
View this post on Instagram
अभिनेता श्रेयस राजे यानं स्वतःच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवरुन एक व्हिडीओ शेअर करुन आवाहन केलं आहे. श्रेयस राजे म्हणाला की, "आपल्या सगळ्यांनाच माहितीये की आपल्या महाराष्ट्रात सोलापूर, बीड, धाराशिव या ठिकाणी भयंकर पूर आलेला आहे. जनजीवन अक्षरश: विस्कळीत झालं आहे. लोकांचे संसार वाहून गेले आहेत. शेतकरी बांधव हवालदिल झालाय. या सगळ्या परिस्थितीत तिथल्या लोकांना आता आपल्या मदतीची प्रचंड गरज आहे. त्यामुळेच आम्ही काही कलाकार मिळून अखिल भारतीय नाट्यपरिषद कल्याण शाखेच्या मदतीने एक मदतकार्य करण्याचा प्रयत्न करत आहोत. खरं तर 25 सप्टेंबरपासूनच हे मदतकार्य सुरू झालं आहे. आणि मदत गोळा करण्याची मुदत ही 30 सप्टेंबरपर्यंत आहे. आता दोनच दिवस राहिलेत त्यामुळे हा व्हिडीओ करतोय. जेणेकरून हा व्हिडीओ सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि मदतीचा ओघ आणखी वाढेल".
आपल्या एका मदतीमुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाना उभं राहण्यास बळ मिळेल : श्रेयस राजे
"तिथल्या लोकांना अत्यंत मुलभूत गरजा भागवण्याची गरज आहे. त्यांना चादरी, सुके खाद्य पदार्थ, औषधे यांची गरज आहे. ही मदत आचार्य अत्रे रंगमंदीर कल्याण येथे संध्याकाळी 4 ते 8 या वेळेत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आत्तापर्यंत बऱ्याच लोकांनी मदत केली आहे. तुम्ही कल्याणमध्ये राहत नसाल तर तुम्ही आम्हाला शक्य तितकी आर्थिक मदत करू शकता. त्यातून आम्ही त्यांना लागणाऱ्या उपयोगी वस्तू विकत घेऊ. 30 सप्टेंबरनंतर या सगळ्या गोष्टी आम्ही धाराशिव, बीड या ठिकाणांमध्ये वाटणार आहोत. त्या सगळ्यांना आता आपल्या आधाराची खूप जास्त गरज आहे. हा व्हिडीओ शक्य तितका शेअर करा. जेणेकरून आपण खूप जास्त मदत करू शकू. आपल्या एका मदतीमुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाना उभं राहण्यास बळ मिळेल", असं म्हणत अभिनेता श्रेयस राजेनं चाहत्यांना आवाहन केलं आहे.
























