पुरुष करतो ते चालतं..अरबाज खानसोबत घेतलेल्या घटस्फोटावर मलायका स्पष्टच म्हणाली, 'माझ्या आनंदासाठी..'
मलायका अरोराने पहिल्यांदाच आपल्या घटस्फोटावर मोकळेपणाने भाष्य केलं.

Malayaka Arora: आठ वर्षांपूर्वी मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा घटस्फोट झाला. अरबाजने दुसरं लग्न करून आयुष्यात पुढचं पाऊल टाकलं. मात्र, मलायका अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर सध्या सिंगल आहे. मलायका अरोराने पहिल्यांदाच आपल्या घटस्फोटावर मोकळेपणाने भाष्य केलं असून, लग्न मोडल्यानंतर आपण अधिक आनंदी असल्याचं तिने स्पष्ट केलं आहे.
काय म्हणाली मलायका?
मलायका आणि अरबाज 2016 मध्ये वेगळे झाले होते, तर 2017 मध्ये त्यांचा घटस्फोट अधिकृतरित्या झाला. मलायका अरबाजपेक्षा वयाने सहा वर्षांनी लहान आहे. घटस्फोटानंतर मलायकाला मोठ्या प्रमाणावर टीकेला सामोरं जावं लागलं. याबाबत इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “मला खूप लोकांचे जजमेंट आणि बॅकलॅश सहन करावे लागले. केवळ बाहेरच्या लोकांचंच नाही, तर कुटुंब आणि काही मित्रांकडूनही. माझ्या आयुष्यातील प्रत्येक निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. पण तरीही मी माझ्या निर्णयावर ठाम राहिले, याचा मला आनंद आहे. मला कोणताही पश्चात्ताप नाही.” असं मलायका म्हणाली.
‘हा निर्णय आवश्यक होता’
मलायकाने पुढे सांगितलं, “पुढे काय होईल, याची मला कल्पना नव्हती. पण आयुष्यात हा निर्णय घेणं माझ्यासाठी गरजेचं आहे, हे मला ठाऊक होतं. माझ्या आनंदासाठी हे पाऊल उचलणं आवश्यक होतं. हे कोणालाही सहज समजत नाही. सगळ्यांना असं वाटतं की मी स्वतःच्या आनंदाला प्राधान्य कसं दिलं? मला एकटी राहण्यात काहीच अडचण नव्हती. जास्तीत जास्त काय झालं असतं? काही काळ काम मिळालं नसतं आणि लोक काहीतरी बोलले असते.”
समाजाच्या दुहेरी भूमिकेवर भाष्य
या मुलाखतीदरम्यान मलायकाने समाजाच्या दुटप्पी भूमिकेवरही भाष्य केलं. ती म्हणाली, “एखादी गोष्ट पुरुष करतो तेव्हा समाज त्याकडे वेगळ्या नजरेने पाहतो, पण तीच गोष्ट महिला करत असेल तर दृष्टिकोन बदलतो. पुरुषांना अनेक मुद्द्यांवर असे प्रश्न विचारले जात नाहीत. मात्र महिला जेंव्हा तसेच निर्णय घेतात, तेव्हा त्यांच्यावर टीकेची झोड उठते. मला वाटतं, काहीतरी वेगळं करून तुम्ही इतरांसाठी एक उदाहरण निर्माण करू शकता.” मलायकाचं हे स्पष्ट वक्तव्य सध्या सोशल मीडियावर आणि मनोरंजनविश्वात चर्चेचा विषय ठरत आहे.























