Majha Katta : व्हायचं होतं डॉक्टर, झाल्या अॅक्टर! दिग्गज अभिनेत्री रोहिणी हट्टंगडींच्या आयुष्याचा प्रवास 'माझा कट्टा'वर
Majha Katta : अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी त्यांच्या आयुष्याच्या प्रवासाविषयी माझा कट्टावर भाष्य केलं आहे. तसेच यावेळी त्यांनी त्यांच्या करिअरमधील मजेशीर किस्से देखील सांगितले.
Majha Katta : रोहिणी ताईंच (Rohini Hattangadi) नाव घेतलं की पटकन नजरेसमोर येते गांधी सिनेमातली कस्तुरबा, सारांश मधली पार्वती प्रधान,अग्निपथमधली विजय दिनानाथ चौहानची आई सुहासिनी, मुन्नाभाई एमबीबीएसमधली संजय दत्तची आई किंवा मग छोट्या पडद्यावरची आशालता देशमुख आणि आईआजी. रोहिणीताईंनी साकारलेल्या भूमिका आणि त्यांच्या करिअर चा ग्राफ कुणालाही हेवा वाटावा असाच राहिलाय. त्यांच्या या प्रवासाविषयी रोहणीताईंनी 'माझा कट्टा'वर (Majha Katta) आठवणी सांगितल्या आहेत.
ब्रिटीश अॅकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन- बाफ्टा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय अभिनेत्री आहे. आपल्या वाट्याला आलेला रोल छोटा आहे की मोठा, त्याची लांबी रुंदी किती यापेक्षा आपल्या अभिनयातून तो प्रेक्षकांना कसा आवडेल, कसा लक्षात राहील याचा प्रामाणिक प्रयत्न रोहिणी ताईंनी नेहमीच केला. त्यामुळेच भूमिका खमक्या सासूची असो, भावुक आईची किंवा प्रेमळ आज्जीची रोहिणी हट्टगंडीनी आपल्या प्रत्येक भूमिकेत प्रेक्षकांना गुंतवून ठेवलं.
मला डॉक्टर व्हायचं होतं - रोहिणी हट्टंगडी
लहानपणापासून मला अभिनयाची आवड होती. पण मला डॉक्टर व्हायचं होतं. तशी मी तयारी देखील करत होते. पण त्यावेळी माझे वडिल मेडिकलसाठी मला बाहेर पाठवायला तयार नव्हते. त्यामुळे मी पुण्यातच बीएसी करत होते. तेव्हा मी विविध कलामंचामध्ये नाटकामध्ये काम करायला लागले होते, असा अनुभव रोहिणीताईंनी माझा कट्टावर सांगितला.
रोहिणीताईंना गांधी हा सिनेमा कसा मिळाला?
मी कस्तुरबाचा रोल का केला असा माझ्या मनात कधीच आलं नाही. त्याच्यासाठी माझी व्यवस्थित स्क्रिन टेस्ट झाली होती. माझ्यासाठी हे आकाशातून पडल्यासारखं झालं. माझी स्क्रिन टेस्ट झाल्यानंतरच माझी या भूमिकेसाठी निवड झाली. या भूमिकेसाठी स्मिता पाटील या देखील होत्या. अशा प्रकारे मला गांधी हा सिनेमा मिळाला
बासू भट्टाचार्यांनी काढली होती रोहिणीताईंची समजूत
रोहिणीताईंना त्यांच्या कारकिर्दीत बऱ्यापैकी आईच्या भूमिकेत सर्वांनी पाहिलं. यावर बोलताना रोहिणीताईंनी म्हटलं की, मी बासू भट्टाचार्यांना म्हटलं की, मला सगळे म्हातारीचा रोल देतात. तेव्हा मला बासू भट्टाचार्य म्हणाले होते की, रोहीणी तू चांगलं करतेय पण मोठ्या माणसांची भूमिका कोण करणार, त्यासाठी विश्वास कोणावर ठेवणार, त्यासाठी तू त्यांना योग्य वाटतेय, हा अनुभव रोहिणीताईंनी माझा कट्टावर सांगितला.
मला मराठीतून जास्त ऑफर्सच आल्या नाहीत
मला मराठी सिनेसृष्टीतून जास्त ऑफर्स आल्या नाहीत. आजच्या दिवसालाही मी मराठीत 10 पेक्षा जास्त सिनेमे केले नाहीयेत. कारण तश्या भूमिकाच आल्या नाहीत. कोल्हापूरला जेव्हा मला जीवनगौरव दिला होता, तेव्हा मी राजदत्त यांना म्हटलं होतं, की मराठीत मला अजूनही रोल मिळत नाहीये. तेव्हा त्यांनी म्हटलं की, तुम्हाला कोणता रोल द्यावा हे अजूनही समजत नाहीये.