Siddharth Jadhav : अभिनयातला प्रवास, ट्रोलिंगचा सामना आणि नाटकातला आत्मविश्वास; सिद्धार्थने उलगडली अनेक गुपितं
Majha Katta : अभिनेता सिद्धार्थ जाधवने (Siddharth Jadhav) एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमामध्ये त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत तसेच करिअरबाबत अनेक गोष्टी सांगितल्या.
Majha Katta : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) यावेळी एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा होता. सिद्धार्थला त्याच्या अभिनयातील कामगिरीपेक्षा त्याच्या दिसण्यावरूनच अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला. वेळीच लोकांनी कामाच्या संधीही नाकारल्या. पण, या सगळ्या टिकेला खचून न जाता त्याने अत्यंत धीटाने येणाऱ्या प्रसंगाशी दोन हात केले. यावेळी त्याला त्याच्या कुटुंबीयांनी आणि मित्र-मंडळींनी फार आधार दिल्याचे सिद्धार्थने एबीपी माझाच्या (ABP Majha) 'माझा कट्टा' (Majha Katta) या कार्यक्रमात सांगितलं.
सिद्धार्थने माझा कट्ट्यावर त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केलं. सिद्धार्थचं शालेय जीवन, घरची परिस्थिती तसेच करिअरमधले अनेक खाचखळगे यावर त्याने यावेळी भाष्य केलं. त्याचप्रमाणे, रंग-रूपावरून, कुरुपतेवरून होणाऱ्या टिकेला तो कसा सामोरा गेला हेदेखील सिद्धार्थने यावेळी सांगितलं.
अशा प्रकारे अभिनयाची आवड निर्माण झाली
शिवडीच्या चाळीत राहणारा सिद्धार्थ बालपणीच्या आठवणींबद्दल बोलताना म्हणाला, खरंतर लहानपणापासूनच पोलीस व्हायचं स्वप्न होतं. मात्र, कालांतराने ते स्वप्न मागे पडत गेलं. दादरच्या सरस्वती हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलेल्या सिद्धार्थने वयाच्या 10 व्या वर्षी अभिनयाचे धडे गिरवले. त्यावेळी 'चांभार चौकशा' नावाचं त्याने पहिलं बालनाट्य केलं. आणि तेव्हापासून त्याचा अभिनय विश्वातला प्रवास सुरु झाला.
नाटकाने आत्मविश्वास दिला :
सिद्धार्थच्या अभिनय क्षेत्राची सुरुवात नाटकांपासून झाली. त्यानंतर त्याने अनेक एकांकिका, नाटक, सिनेमे केले. इतकंच नव्हे तर त्याने हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप पाडली. मात्र, सिद्धार्थची ओढ मराठीत नाटकांत जास्त राहिली. 'जागो मोहन प्यारे' आणि 'गेला उडत' हे त्याचं नाटक प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस आलं.
महेश मांजरेकरांचा मोलाचा सल्ला :
आपल्या चित्रपटसृष्टीतील (Filmy Career) कारकिर्दीविषयी बोलताना सिद्धार्थने केदार शिंदे (Kedar Shinde) , पंढरीनाथ कांबळे, देवेंद्र पेम, महेश मांजरेकर, रोहित शेट्टी यांचे आभार मानले. या सगळ्यांचा सिद्धार्थच्या यशात मोलाचा वाटा आहे असं त्याने सांगितलं. त्याचप्रमाणे अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्याविषयी बोलताना सिद्धार्थ म्हणाला, "महेश सरांनी मला आयुष्यात खूप मोलाचा सल्ला दिला तो म्हणजे, "तू फक्त काम कर, कॅमेरा तुला कॅच करेल..कधीही कॅमेऱ्यासाठी काम करू नकोस." महेश मांजरेकरांचा हा मोलाचा सल्ला नेहमीच लक्षात राहतो असं सिद्धार्थ यावेळी म्हणाला.