Mahesh Tilekar On Marathi Film Industry: 'मराठी चित्रपटसृष्टीतील महानटानं माझ्याकडे 5 लाख मागितले'; महेश टिळेकरांनी सांगितलेला 'तो' किस्सा सचिन पिळगावकरांबाबत?
Mahesh Tilekar On Marathi Film Industry: महेश टिळेकर यांनी सांगितलेला किस्सा व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी व्हिडीओवर मोठ्या प्रमाणावर कमेंट करायला सुरुवात केली आहे. नेटकऱ्यांनी कमेंट करत ती व्यक्ती सचिन पिळगावकर असू शकते, असं म्हटलं आहे.

Mahesh Tilekar On Marathi Film Industry: महेश टिळेकर (Mahesh Tilekar) म्हणजे, मराठी सिनेसृष्टीतलं मोठं नाव. अनेक मराठी सिनेमांचं लेखन, दिग्दर्शन आणि निर्मीती महेश टिळेकरांनी केली. महेश टिळेकरांनी सुरू केलेला 'मराठी तारका' शो विशेष गाजला. पण, मराठी इंडस्ट्रीतलं दिग्गज व्यक्तीमत्व असूनही महेश टिळेकर यांना अनेक कलाकारांबाबत आलेल्या वाईट अनुभवांचा उल्लेख केला. तसेच, त्यांनी इंडस्ट्रीतला महानट असा उल्लेख करुन एका पुरूष नटाबाबतचा किस्सा सांगितला.
महेश टिळेकर यांनी नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी आयोजित केलेल्या मराठी तारे-तारकांच्या शोचा उल्लेख केला. कोणत्याही कलाकारानं या कार्यक्रमासाठी मानधन घेतलेलं नसतानाही, एका दिग्गज मराठी कलाकारानं घेतलेलं मानधन आणि ठेवलेल्या अटी-शर्थींबाबत सांगितलं. तसेच, त्यांनी या दिग्गज मराठी कलाकाराचा उल्लेख 'मराठी इंडस्ट्रीमधील महानट' असा केला. आता नेटकरी हा नट कोण? याचे अंदाज बांधत आहेत. काहींनी तो नट म्हणजे, महागुरू सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) असल्याचंही म्हटलं आहे.
मराठी इंडस्ट्रीमधील महानटानं माझ्याकडे कार्यक्रमाला येण्यासाठी 5 लाख मागितले : महेश टिळेकर
प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक महेश टिळेकर म्हणाले की, " "मराठी सिनेसृष्टीला 75 वर्ष पूर्ण झाली त्या निमित्ताने 20 पुरुष कलाकार आणि 20 स्त्री कलाकार होते. त्यात निळू फुले, कुलदीप पवारांपासून अनेक दिग्गज कलाकार सहभागी झाले होते. त्यात जयाप्रदासुद्धा येणार होत्या. वर्षा उसगावकर यांच्याबरोबर डान्स करण्यासाठी मी मराठी इंडस्ट्रीमधील महानटाला विचारलं, तेव्हा त्याने माझ्याकडे पाच लाख रुपये मानधन मागितलं. ही गोष्ट 2005-06 ची असेल. त्यावेळी पाच लाखाची किंमत किती होती विचार करा. यासोबत त्यांनी बऱ्याच अटी घातल्या. मी वर्षासोबत डान्स करणार नाही, मी माझ्या पत्नीबरोबरच डान्स करणार वगैरे वगैरे. त्यामुळे मी त्यांना नकार दिला..."
महेश टिळेकर यांनी लोकमत फिल्मीच्या मुलाखतीत बोलताना मराठी सिनेसृष्टी आणि त्यातील कलाकारांच्या डिमांड्स, ते इतरांना देत असलेली वागणूक यावर भाष्य केलं. तसेच, त्यांनी इंडस्ट्रीत त्यांना आलेले अनुभवही सांगितले. त्यांनी मुलाखतीत केलेल्या गौप्यस्फोटाचे व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहेत. महेश टिळेकरांनी मुलाखतीत बोलताना सगळं सांगून टिका केली असली, तरीसुद्धा त्यांनी कुणाचंही नाव घेतलेलं नाही, त्यांनी नाव न घेता अनेक खळबळजनक दावे केले आहेत.
दरम्यान, महेश टिळेकर यांनी सांगितलेला किस्सा व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी व्हिडीओवर मोठ्या प्रमाणावर कमेंट करायला सुरुवात केली आहे. नेटकऱ्यांनी कमेंट करत, ज्या व्यक्तीबाबत महेश टिळेकरांनी सांगितलं आहे, ती व्यक्ती सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) असू शकते, असं म्हटलं आहे. तसेच, टिळेकरांनी सचिन पिळगावकरांचं नाव न घेता, अनुलेखानं टोमणा मारला, असंही अनेकांचं मत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























