Kiran Mane on Sharad Pawar : 'पोकळ माज करू पहाणार्या शत्रुच्या छावणीत घुसून....', किरण मानेंची शरद पवारांवर स्तुतीसुमनं अन् सत्ताधाऱ्यांवर बोचरा वार
Kiran Mane on Sharad Pawar : बारामतीत आयोजित करण्यात आलेल्या नमो रोजगार मेळाव्याला शरद पवारांनीही उपस्थिती दर्शवली. यावरील किरण मानेंची पोस्ट सध्या चर्चेत आलीये.
Kiran Mane on Sharad Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या भूकंपानंतर बारामतीत पुन्हा महाराष्ट्राने आज एक वेगळाच सोहळा पाहिला. महायुतीच्या सरकारकडून आयोजित करण्यात आलेल्या महारोजगार मेळाव्याला शरद पवारांनी (Sharad Pawar) देखील हजेरी लावली होती. यावर अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांची एक पोस्ट सध्या बरीच चर्चेत आलीये. या पोस्टमधून किरण माने यांनी विरोधकांवर थेट वार केलाय.
बारामतीतील नमो रोजगार मेळाव्यावरुन बरच राजकारण झालं. कार्यक्रमात राज्यसभेचे खासदार शरद पवार यांचं नाव वगळण्यात आलं होतं. त्यामुळे या नमो रोजगार मेळाव्याची जोरदार चर्चा होती. त्यातच आता किरण माने यांनी या कार्यक्रमावर केलेल्या पोस्टमुळे सोशल मीडियावरही जोरदार चर्चा सुरु असल्याचं पाहायला मिळतंय.
'या स्टेजवर बसलेल्या गावगुंडांची काय दयनीय अवस्था असेल'
किरण माने यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. तसेच यामध्ये त्यांनी शरद पवारांचा व्हिडिओ देखील शेअर केलाय. यामध्ये त्यांनी म्हटलं की, आपल्या हद्दीत येऊन पोकळ माज करू पहाणार्या शत्रुच्या छावणीत घुसून त्याचा धुव्वा कसा उडवायचा... ही जिगरबाज वृत्ती पवारसाहेबांकडूनच शिकावी ! पवारांच्या वयात, या स्टेजवर बसलेल्या गावगुंडांची काय दयनीय अवस्था असेल याची कल्पनाच न केलेली बरी. साहेबांना पाहून जनतेने उत्स्फूर्तपणे केलेला जल्लोष प्रत्येकाच्या नशिबात नाही येत. साहेबांच्या सभेत यातल्या एकानेही अशी अचानक स्टेजवर जायची हिंमत करावी. 'जरांगेंनी दिलेल्या शिव्या बर्या होत्या' असं म्हणायची वेळ येईल.
शरद पवारांवर स्तुतीसुमनं
2019 च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी शरद पवारांनी साताऱ्यात केलेली सभा ही खास ठरली. भर पावसात शरद पवारांनी भाषण केलं आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची बरीच समीकरणं बदलली असं म्हटलं जातं. त्या गोष्टीची आठवण करुन देत किरण माने यांनी म्हटलं की, ही 'चाल' पावसातल्या सभेपेक्षा शंभरपट खतरनाक परीणाम करणार आहे यावेळी बख्खळ आले आन् मायंदाळ गेले गड्याहो... पवारसाहेब हा महाराष्ट्राच्या जनतेच्या काळजातला विषय हाय... थंड घ्या.
किरण माने यांच्या या पोस्टची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. काही महिन्यांपूर्वी किरण माने यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. सध्या किरण माने यांच्या बऱ्याच पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत असतात.
ही बातमी वाचा :