Kedar Shinde Aaipan Bhari Deva : केदार शिंदे सांगणार प्रत्येक घरातल्या आईपणाची गोष्ट; ‘आईपण भारी देवा’ चित्रपटाची घोषणा
Kedar Shinde Aaipan Bhari Deva : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत केदार शिंदे यांनी 'आईपण भारी देवा' या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.
Kedar Shinde Aaipan Bhari Deva : महिलांच्या भावविश्वाची गोष्ट रुपेरी पडद्यावर सांगितल्यानंतर आता दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत केदार शिंदे यांनी 'आईपण भारी देवा' (Aaipan Bhari Deva) या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात केदार शिंदे आईचे भावविश्व मांडणार असल्याचे म्हटले जात आहे.
केदार शिंदे यांचा 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट मागील वर्षी झळकला होता. सहा बहिणींभोवती या चित्रपटाची कथा गुंफण्यात आली आहे. या चित्रपटात महिलांचे भावविश्व, त्यांच्या अडचणी, परिस्थितीनुरुप करावी लागणार मनाच्या विरोधातील तडजोडी यांचे चित्रण दाखवण्यात आले. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला चांगले यश मिळाले. त्यानंतर केदार शिंदे यांच्या नव्या कलाकृतीकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते.
केदार शिंदे यांनी केली घोषणा
केदार शिंदे यांनी आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर केदार शिंदे यांनी चित्रपटाच्या घोषणेचे पोस्टर लाँच केले. या फोटोसोबत त्यांनी कॅप्शनही दिले आहे. प्रत्येक घरातल्या बाईपणाच्या भारी गोष्टीनंतर दिग्दर्शक केदार शिंदे आणि जिओ स्टुडिओज घेऊन येत आहेत. प्रत्येक घरातल्या आईपणाची भारी गोष्ट ‘आईपण भारी देवा’ अशी कॅप्शन केदार शिंदे यांनी दिली.
View this post on Instagram
‘आईपण भारी देवा’ चित्रपटाचे दिग्दर्शन हे केदार शिंदे करणार आहे. तर, निर्मिती ज्योती देशपांडे, बेला शिंदे यांनी केली आहे. अजित भुरे हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तर, चित्रपटाचे लेखन वैशाली नाईक आणि ओमकार मंगेश दत्त यांनी केले आहे.
दरम्यान, दिग्दर्शक असलेले केदार शिंदे यांनी काही महिन्यांपूर्वी 'कलर्स मराठी'च्या प्रोग्रामिंग हेडची जबाबदारी स्वीकारली आहे. कलर्स मराठी वाहिनीवर आता नवीन मालिका सुरू होणार आहे. टीआरपीच्या शर्यतीत वाहिनी काहीशी मागे आहे.त्यामुळे वाहिनीला पुन्हा एकदा अव्वल स्थानी आणण्यासाठी शिंदे यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.