'काही लोकांमुळं संपूर्ण इंडस्ट्रीला खराब म्हणणं चुकीचं', हेमा मालिनींकडून जया बच्चन यांची पाठराखण
बॉलिवूडमध्ये ड्रग्जचं वाढतं प्रमाण याबाबत रवी किशन यांनी चिंता व्यक्त केली होती. यानंतर जया बच्चन यांनी त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला होता.यावर अभिनेत्री आणि मथुरेच्या खासदार हेमा मालिनी यांनी जया बच्चन यांची पाठराखण केली आहे.
नवी दिल्ली : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गोरखपूरचे खासदार अभिनेते रवी किशन यांनी लोकसभेत सोमवारी ड्रग्ज संदर्भात भाष्य केलं होतं. बॉलिवूडमध्ये ड्रग्जचं वाढतं प्रमाण याबाबत रवी किशन यांनी चिंता व्यक्त केली होती. यानंतर समाजवादी पार्टीच्या राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत 'बॉलिवूडला बदनाम' केलं जात असल्याचा आरोप केला. त्यांनी कुणाचंही नाव न घेता काही लोकांनी मनोरंजन क्षेत्राला बदनाम केलं असल्याचं म्हटलं होतं. यावर अभिनेत्री आणि मथुरेच्या खासदार हेमा मालिनी यांनी जया बच्चन यांची पाठराखण केली आहे.
हेमा मालिनी यांनी म्हटलं आहे की, फक्त बॉलिवूड इंडस्ट्रीमधील ड्रग्ज वापरावरच का चर्चा होत आहे. त्या म्हणाल्या की, अजूनही अनेक इंडस्ट्रीज आहेत जिथं ड्रग्जचा उपयोग होतो, जगभरात याचा उपयोग होतो. त्यांनी म्हटलं की, आपल्या इंडस्ट्रीमध्ये असं होतही असेल मात्र याचा अर्थ असा नाही की संपूर्ण इंडस्ट्री खराब आहे. ज्या पद्धतीनं लोक बॉलिवूडवर आरोप करत आहेत, ते चुकीचं असल्याचं त्या म्हणाल्या.
रवी किशन काय म्हणाले होते ?
रवी किशन यांनी लोकसभेत सोमवारी ड्रग्ज संदर्भात भाष्य केलं होतं. बॉलिवूडमध्ये ड्रग्जचं वाढतं प्रमाण याबाबत रवी किशन यांनी चिंता व्यक्त केली. सरकारने ड्रग्जचं सेवन करणाऱ्या आणि त्याची तस्करी करणाऱ्यांवर बंदी घालावी, अशी मागणी करताना रवी किशन यांनी एनसीबीचं कौतुकही केलं. “भारतीय सिने जगतात ड्रग्ज घेणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे. या प्रकरणी काही जणांना अटकही केली आहे. एनसीबीही चांगल्या प्रकारे आपलं कर्तव्य पार पाडत आहे” या शब्दात रवी किशन यांनी एनसीबीचं कौतुक केलं होतं.
काय म्हणाल्या होत्या जया बच्चन खासदार रवी किशन यांनी संसदेत देश आणि बॉलिवूडमधील ड्रग्जच्या वाढता वापर आणि तस्करीचा मुद्दा मांडला होता. यावर जया बच्चन यांनी संसदेत बोलताना हल्लाबोल केला होता. त्या म्हणाल्या होत्या की की, 'चित्रपटसृष्टीत काम करणारे लोकसभेचे एक सदस्य काल इंडस्ट्रीविरोधात बोलत होते. हे अत्यंत लज्जास्पद आहे. मी कोणाचंही नाव घेत नाहीये. ते स्वतःही याच इंडस्ट्रीत काम करतात. 'जो लोग जिस थाली में खाते हैं, उसी में छेद करते है.' ही चुकीची गोष्ट आहे. मला आता सांगावं लागत आहे की, इंडस्ट्रीला सरकारच्या सुरक्षेची आणि समर्थनाची गरज आहे.'
'अभिषेक अचानक फासावर लटकल्याचं दिसून आलं तर?'; कंगना रनौतचा जया बच्चन यांच्यावर पलटवार
कंगनाचे ट्वीट यावर कंगनानं देखील ट्वीट केलं होते. तिनं म्हटलं की, “जयाजी, जर माझ्या जागी तुमची मुलगी श्वेतासोबत किशोरवयात मारहाण, ड्रग्ज देणे आणि विनयभंग झाला असता तर तुम्हीही असेच म्हणाला असता का? अभिषेकने सतत गुंडगिरी आणि छळवणूक झाल्याबद्दल तक्रार केली असती, आणि एक दिवस तो लटकलेल्या अवस्थेत आढळला असता, तर आपण असेच बोलला असता काय?” असा सवाल कंगनानं केला आहे.