Javed Akhtar On Asim Munir : हिंदूंना शिव्या का देताय? जावेद अख्तर पाकिस्तानी लष्करप्रमुखावर भडकले, म्हणाले...
Javed Akhtar: जावेद अख्तर यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना असंवेदनशील म्हणत तुम्ही कारगिल युद्धादरम्यान तुमच्या सैनिकांचे मृतदेह घेण्यासही नकार दिला होता, असे म्हटले आहे.

Javed Akhtar On Asim Munir: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा (Pahalgam Terror Attack) बदला घेताना भारतीय सैन्य दलांनी पाकिस्तान आणि पीओकेमध्ये घुसून अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाची परिस्थिती कायम आहे. या पार्श्वभूमीवर बॉलिवूडचे प्रसिद्ध लेखक आणि गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर (Asim Munir) यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. तसेच, पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या काही दिवस आधी जनरल मुनीर यांनी केलेल्या टिप्पण्यांबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
असीम मुनीर यांनी नेमकं काय म्हटलं होतं?
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या दहशतवादी तळांवर लक्ष्य करून ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. चार दिवसांच्या भीषण लढाईनंतर 10 मे रोजी दोन्ही देश शस्त्रसंधीला तयार झाले. यादरम्यान असीम मुनीर यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. "आपल्या पूर्वजांचा असा विश्वास होता की, आपण हिंदूंपेक्षा जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये वेगळे आहोत. आपला धर्म वेगळा आहे, आपले रीतिरिवाज वेगळे आहेत, आपली परंपरा वेगळी आहे, आपली विचारसरणी वेगळी आहे आणि आपली महत्त्वाकांक्षा देखील वेगळी आहे," असे त्यांनी म्हटले होते.
जावेद अख्तर व्यक्त केली नाराजी
वकील आणि नेते कपिल सिब्बल यांच्यासोबत दिलेल्या एका मुलाखतीत, जावेद अख्तर यांनी असीम मुनीर यांनी केलेल्या विधानांची टीका करत त्यांना 'असंवेदनशील' असे म्हटले. ते म्हणाले की, "कोणताही देश एकसंध नसतो. कोणत्याही देशातील सर्व नागरिक एकसारखे असू शकत नाहीत. जर एखाद्या देशाचे सरकार वाईट असेल, तर त्याचा सर्वात पहिला परिणाम तिथल्या नागरिकांवरच होतो. आपला संघर्ष केवळ सरकार, लष्कर आणि अतिरेक्यांशी असावा, आपली संपूर्ण सहानुभूती त्या निष्पाप लोकांशी असावी जे या सगळ्यांमुळे त्रस्त आहेत," असे जावेद अख्तर म्हणाले.
हिंदूंना शिव्या का देत आहात?
जावेद अख्तर पुढे म्हणाले की, “मी यूट्यूबवर त्यांचं (पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांचं) भाषण पाहिलं. तो माणूस किती असंवेदनशील वाटत होता. हो, जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही वाईट आहोत, तर भारतीयांवर टीका करा, पण तुम्ही हिंदूंना शिव्या का देत आहात? त्यांना हे जाणवत नाही का की पाकिस्तानमध्येही हिंदू लोकसंख्या आहे? तुम्हाला तुमच्या स्वतःच्या लोकांचा सन्मान करायचा नाही का? तुम्ही कसल्या प्रकारचे माणूस आहात? काय बोलत आहात तुम्ही? तुम्हाला काही समज आहे की नाही?,” असा संताप त्यांनी यावेळी व्यक्त केला.
अनेक अरब देशांनी पाकिस्तानच्या नागरिकांसाठी व्हिसावर घातली बंदी
जावेद अख्तर पुढे म्हणाले की, "त्यांच्या क्षेपणास्त्रांपैकी एका क्षेपणास्त्राचे नाव ‘अब्दाली’ आहे. अब्दालीने तर मुसलमानांवरच हल्ला केला होता. तो तुमचा हिरो कसा? तुमच्या मातीत जन्मलेल्यांचं काय? तुम्हाला इतिहासाचं ज्ञान आहे का? प्रश्न हा आहे की, त्यांचा इतिहास आणि भूगोल एकमेकांशी जुळत नाही. जे समुदाय ते आपले म्हणवतात, त्यांना त्यांच्याशी काहीही देणंघेणं नाही. अनेक अरब देशांनी आता पाकिस्तानच्या नागरिकांना व्हिसा देण्यावर बंदी घातली आहे. ही अवस्था अशी आहे की, जणू दिल्लीच्या रस्त्यांवर एखादा मुलगा म्हणतोय की ‘मी शाहरुख खानला ओळखतो’, पण शाहरुख खानलाच माहिती नाही की हा मुलगा कोण आहे. पाकिस्तानची स्थिती आज अशीच आहे, असेही त्यांनी म्हटले.
पाकिस्तानी लष्कर स्वतःच्या लोकांचाही सन्मान करत नाही
अख्तर यांनी पाकिस्तानी लष्कर त्यांच्या स्वतःच्या सैनिकांचाही सन्मान करत नाही, असे म्हणत एक किस्सा देखील सांगितला आहे. ते म्हणाले, "एक सत्य जे पाकिस्तानने स्वीकारायला हवं, ते म्हणजे जेव्हा आमचा एखादा सैनिक शहीद होतो, तेव्हा आपण त्याला सलाम करतो. पण जेव्हा कारगिलमध्ये पाकिस्तानी सैनिक मारले गेले, तेव्हा पाकिस्तानने त्यांच्या मृतदेहांवरही हक्क सांगितला नाही. भारतीयांनीच त्यांचे योग्य अंतिम संस्कार केले. आपल्या वरिष्ठ दर्जाच्या एका अधिकाऱ्याने त्या पाकिस्तानी शहीद सैनिकांचे फोटो घेतले, एक अल्बम तयार केला आणि तो पाकिस्तानकडे सुपूर्द केला. मात्र पाकिस्तानने तो स्वीकारण्यास देखील नकार दिला. नंतर त्यांनी तो अल्बम अनौपचारिकरीत्या स्वीकारला, असे त्यांनी यावेळी सांगितले.
आणखी वाचा























