Indian Musician Shiraz Ali Khan Caught Up In Bangladesh Violence: धुमसणाऱ्या बांग्लादेशात अडकलेला प्रसिद्ध गायक, 'भारतीय' ओळख लपवली, त्यात खान आडनाव..., स्वतःच सांगितला सुटकेचा 'तो' थरार
Indian Musician Shiraz Ali Khan Caught Up In Bangladesh Violence: कोलकात्याचे रहिवासी असलेले आणि बांगलादेशशी कौटुंबिक संबंध असलेले सरोद वादक शिराज अली खान 19 डिसेंबर रोजी ढाका येथील छायानत इथे एका संगीत कार्यक्रमात सादरीकरण करणार होते.

Indian Musician Shiraz Ali Khan Caught Up In Bangladesh Violence: सध्या बांग्लादेश धुमसतंय (Bangladesh Violence), मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुरू आहे. हिंदूंवर सतत हल्ले होत आहेत. गरीबी, उपासमार आणि अव्यवस्थेच्या कचाट्यात सापडलेल्या या देशाचे लोक खूप अस्वस्थ झाले आहेत. दरम्यान, कोलकात्यातील सरोद वादक शिराज अली खान हे देखील अडकलेले. मोठ्या प्रमाणावर उफाळलेला हिंसाचार, देशातील अव्यवस्था यातून त्यांना मोठ्या कष्टानं बाहेर पडावं लागलं.
कोलकात्याचे रहिवासी असलेले आणि बांगलादेशशी कौटुंबिक संबंध असलेले सरोद वादक शिराज अली खान 19 डिसेंबर रोजी ढाका येथील छायानत इथे एका संगीत कार्यक्रमात सादरीकरण करणार होते. पण, कार्यक्रमाच्या काही तास आधी, कट्टरपंथी कार्यकर्ते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर देशभरात अशांतता निर्माण झाली होती. तेव्हा तिथे झालेली जाळपोळ आणि हिंसाचाराच्या कोंडीत ते सापडले. शनिवारी संध्याकाळी शिराज कोलकात्याला पळून जाण्यात यशस्वी झाले, वाटेत त्यांनी आपली भारतीय ओळख लपवली. हा एक निर्णय होता, जो त्यांना घ्यावा लागेल याची त्यांनी कधीच कल्पना केली नव्हती. त्यांचे तबला वादक अजूनही तिथे अडकले आहेत. अपेक्षा आहे की, ते सोमवारी परत भारतात परततील.
नेमकं काय घडलं?
16 डिसेंबर रोजी शिराज ढाका येथे पोहोचले, जिथे त्यांना दुसऱ्या दिवशी बनानी इथे होणाऱ्या जाझ संगीत कार्यक्रमात सादरीकरण करायचं होतं. 19 डिसेंबर रोजी छाया नाट इथे त्यांचा प्रमुख शास्त्रीय संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शिराज यांनी स्पष्ट केलं की, 17-18 लोकांचा छोटासा मेळावा असूनही, बनानीचा अनुभव हृदयस्पर्शी होता. "19 डिसेंबर रोजी सकाळी मला छाया नाटवरील हल्ल्याबद्दल कळलं. मी ज्या इमारतीत सादरीकरण करणार होतो, ती इमारत उद्ध्वस्त झाली आहे, यावर माझा विश्वासच बसत नव्हता. हृदयद्रावक दृश्ये पाहणं असह्य होतं, विशेषतः माझ्यासारख्या संगीत आणि त्याच्या पावित्र्याला सर्वोच्च मानणाऱ्या व्यक्तीसाठी..."
तुटलेल्या, उद्ध्वस्थ झालेल्या वाद्यांचे फोटो पाहून शिराज यांना मोठा धक्का बसला. ते म्हणाला की, "जर माझा पाय चुकून कोणत्याही वाद्याला लागला असेल, तर मी ताबडतोब शिक्षण आणि कलेच्या देवी सरस्वतीची माफी मागतो. संगीत जगताचं आणि देशाचं खूप मोठं नुकसान झालं आहे..."
'ब्राह्मणबारिया' बोलता आल्यामुळे प्राण वाचले
ढाका सोडण्याचा प्रयत्न करत असताना, शिराझला एका चौकीवर थांबवण्यात आलं. त्यानं स्पष्ट केलं की, "मला विचारण्यात आलंय की, माझ्याकडे परकीय चलन आहे का? सुदैवानं, मी ते सांगितलं नाही. पहिल्यांदाच, मी माझी भारतीय ओळख सांगितली नाही. भारतविरोधी भावनांबद्दल जागरूक असल्यानं, मी स्थानिक ब्राह्मणबारिया बोली बोललो... माझी आई ब्राह्मणबारियाची आहे आणि 1968 मध्ये लग्नानंतर ती भारतात स्थायिक झालेली. मी तिच्याकडून ही बोली शिकलोय..."
"लोकांना वाटले की मी भारताचा नाही तर बांगलादेशचा आहे. मला कधीच कल्पना नव्हती की, मला माझी भारतीय ओळख लपवावी लागेल. मी माझा भारतीय पासपोर्ट आणि फोन ड्रायव्हरला दिला, ज्यानं ते गाडीच्या डॅशबोर्डवर ठेवलं. मी ते विमानतळावर परत आणले. जर मी माझी ओळख लपवली नसती तर काय झालं असतं हे मला माहीत नाही. माझी आई अजूनही बांग्लादेशात आहे आणि ती परत येईपर्यंत आम्हाला काळजी आहे... माझे हिंदू सोबती देखील ढाका इथे अडकले आहेत आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी मी त्यांची नावं उघड करणार नाही..."























