Govinda : भुजबळांच्या रडावर असलेल्या सुहास कांदेंसाठी सुपरस्टार गोविंदा मैदानात! रोखठोक भाषणाने व्यासपीठ गाजवलं
Govinda : संपूर्ण राज्याचं लक्ष असलेल्या नांदगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुहास कांदे यांच्या प्रचारासाठी गोविंदा मैदानात उतरला आहे.
Govinda Speech : विधानसभा निवडणुकांचं (Maharashtra Assembly Election 2024) बिगुल वाजल्यापासून महाराष्ट्रातले बरेच मतदारसंघ हे संभ्रमात आणि वादाच्या भोवऱ्यात होते. त्यातीलच नाशिकमधील नांदगाव हा मतदारसंघ होता. या मतदारसंघातून समीर भुजबळ यांच्या उमेदवारीसाठी आग्रह होता. पण ही जागा शिंदे गटाच्या वाट्याला गेली आणि इथे महायुतीचे सुहास कांदे (Suhas Kande) हे उमेदवार आहेत. त्यांच्याच प्रचारासाठी सुपरस्टार गोविंदा (Govinda) देखील मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं.
गोविंदा सुहास कांदेंच्या प्रचारासाठी नाशिकमध्ये पोहचला. तसेच त्याच्या भाषणाने कार्यकर्त्यांमध्येही जल्लोष झाल्याचं पाहायला मिळालं. गोविंदासोबत सुहास कांदे यांची पत्नी अंजुम कांदे देखील प्रचारात सहभागी झाल्या होत्या. मनमाड शहरातील एकात्मता चौकातून या रॅलीला सुरुवात झाली.त्यानंतर शहरातील आंबेडकर चौक, फुले चौक आदी मध्यवर्ती भागातून ही रॅली काढण्यात येवून बस स्थानकाजवळ सांगता करण्यात आली.रॅलीत महायुतीचे पदाधिकारी, शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते..
'शिवसेना राज्यात मोठी आहे, देशातही व्हावी'
गोविंदाने त्याच्या भाषणात बोलताना म्हटलं की, महायुतीच्या नेत्यांनी महिला सबलीकरणाचं धोरण अवलंबवलं आहे. महाराष्ट्रातील विकासात्मक जो बदल दिसतोय तो बदल महायुती सरकारमुळे झाला आहे. देशात आणि राज्यात विविध विकासात्मक धोरणं राबवण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना आता राज्यात मोठी झालीये तीच देशातही मोठी व्हावी.. सुहास कांदे यांना शुभेच्छा..
गोविंदाने काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केल्याच्या मुद्द्यावर बोलताना गोविंदाने म्हटलं की, 'मी 15 वर्षे बाहेर होतो. बाळासाहेब ठाकरे यांचे आणि वडिलांचे चांगले संबंध होते. मला बघण्यासाठी ते घरी आले होते. तेव्हापासून माझे शिवसेनेशी संबंध आहे. सिनेमात येण्याआधीपासूनचे हे संबंध आहेत.' पुढे त्याने म्हटलं की, बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा घेऊन एकनाथ शिंदे पुढे निघाले आहेत. ते देशासाठी चांगलंय. या विचारधारेशी एकनाथ शिंदे जुळलेले आहे. मी त्यांच्यासोबत आहे यात मला आनंद आहे. आतापर्यंतचे सर्व कलाकार हे महाराष्ट्रातून पुढे आले आहेत.