Gautami Patil Car Accident: गौतमी पाटीलच्या ड्रायव्हरनं रिक्षाला उडवलं; पुण्यात घडली अपघाताची घटना
Gautami Patil Car Accident: गौतमी पाटीलच्या कारण रिक्षाला उडवलं असून या भीषम अपघातात रिक्षाचालकासह 3 जण जखमी झाले आहेत.

Gautami Patil Car Accident: आपल्या मादक अदांनी स्टेजवर धुमाकूळ घालणारी सुप्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) आपला डान्स आणि अल्बम्समुळे नेहमीच चर्चेत असते. पण, सध्या ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. गौतमी पाटील (Gautami Patil Car Accident) हिच्या गाडीचा पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ भीषण अपघात झाला. गौतमीच्या ड्रायव्हरने भल्या पहाटे एका रिक्षाला जोराची धडक दिली. या अपघातात रिक्षाचालकासह 3 जण जखमी झाले आहे. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सिंहगड रोड पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
गौतमी पाटीलच्या कार अपघाताचे काही फोटो समोर आले आहेत. फोटोंवरुन अपघाताची भीषणता लक्षात येते. मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी अपघात झाला, त्यावेळी गौतमी पाटील कारमध्ये नव्हती. तिच्या ड्रायव्हरकडून हा अपघात झाल्याची माहिती मिळतेय. गौतमी पाटील हिच्या कारला पहाटेच्या सुमारास अपघात झाला. पुण्यातील मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ ही घटना घडली.
अपघात नेमका घडला कसा?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुण्यातील मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ एका हॉटेलसमोर हा अपघात झाला. हॉटेलच्या समोर एक रिक्षा उभी होती. त्यात रिक्षाचालकासह दोन प्रवासी होते. मागून आलेल्या गौतमी पाटीलच्या भरधाव कारनं उभ्या असलेल्या रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की, यामध्ये रिक्षाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या अपघातात रिक्षाचालकासोबतच रिक्षातील दोन प्रवासीही गंभीर जखमी झाले.
पोलिसांना अपघाताबाबत माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी कार आणि ड्रायव्हर तिथेच होता. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. त्यावेळी ड्रायव्हरनंच ही सुप्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिची कार असल्याचं सांगितलं.























