Entertainment News Live Updates 12 June: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 12 Jun 2022 09:38 PM
हिंदी सिनेमांना 'सरसेनापती हंबीरराव'ने दिली टक्कर; तिसऱ्या आठवड्यात घोडदौड सुरू

प्रविण तरडेंच्या (Pravin Tarde) 'सरसेनापती हंबीरराव' (Sarsenapati Hambirrao) या सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. हा सिनेमा अनेक बिग बजेट बॉलिवूड सिनेमांना टक्कर देत आहे. रसिक प्रेक्षकांच्या भक्कम पाठिंब्यामुळे या सिनेमाने तिसऱ्या आठवड्यातदेखील यशस्वी घोडदौड केली आहे. 

'जुग जुग जिओ' सिनेमातील 'दुपट्टा' गाणं रिलीज

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan), कियारा आडवाणी (Kiara Advani), नीतू कपूर (Neetu Kapoor) आणि अनिल कपूरच्या (Anil Kapoor) 'जुग जुग जिओ' (Jug Jugg Jeeyo) या सिनेमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत. सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. त्यानंतर  सिनेमातील 'रंगसारी' (Rangisari) हे गाणं रिलीज झाले . या गाण्यात वरुण धवन आणि कियारा आडवाणी रोमॅंटिक अंदाजात दिसले होते. आता सिनेमातील 'दुपट्टा' (Duppata) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 

ब्लॉकबस्टर 'धर्मवीर' आता ओटीटीवर; 17 जूनला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

 'धर्मवीर' (Dharmaveer) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. 13 मे रोजी हा सिनेमा तब्बल चारशेहुन अधिक सिनेमागृहे आणि 10 हजारांहून अधिक शोजसह प्रेक्षकांच्या भेटीस आला. या सिनेमाने सिनेमागृहाबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड अभिमानाने झळकवले होते. आता सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर ब्लॉकबस्टर 'धर्मवीर' ओटीटीप्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

शाहरुख खानच्या 'डंकी'चे शूटिंग पूर्ण; आता लक्ष 'जवान'कडे

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) आगामी 'डंकी' (Dunki) सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. किंग खानचे चाहते त्याच्या आगामी सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. आता शाहरुखने त्याच्या आगामी 'डंकी' सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले आहे. लवकरच तो 'जवान'च्या शूटिंगला सुरुवात करणार असे म्हटले जात आहे. 

प्रेक्षकांच्या भेटीला आला 'इंडियाज लाफ्टर चॅम्पिअन'

 'द कपिल शर्मा' (The Kapil Sharma Show) हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. आता 'इंडियाज लाफ्टर चॅम्पिअन' (India's Laughter Champion) हा कॉमेडी शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 11 जूनपासून या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमाने 'द कपिल शर्मा' (The Kapil Sharma Show) रिप्लेस केले आहे. 'इंडियाज लाफ्टर चॅम्पिअन' या कार्यक्रमात पूरन सिंह (Archana Puran Singh) आणि शेखर सुमन (shekhar Suman) परिक्षकाच्या भूमिकेत आहेत. 

मराठी मालिकांत लगीनघाई; आज नेहा-यश अडकणार लग्नबंधनात

Marathi Serial : मराठी मालिकांमध्ये (Marathi Serial) सध्या लगीनघाईला सुरुवात झाली आहे. खास विवाह विशेष भाग प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazhi Tuzhi Reshimgath), 'बॉस माझी लाडाची' (Boss Majhi Ladachi) आणि 'स्वाभिमान' (Swabhiman) या मालिकेत लगीनघाई सुरू आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आता मनोरंजनाची मेजवानी मिळत आहे. 

Bhool Bhulaiyaa 2 Box Office : बॉक्स ऑफिसवर 'भूल भुलैया 2'चा दबदबा

Bhool Bhulaiyaa 2 : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2) हा सिनेमा तिसऱ्या आठवड्यातदेखील बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. हा सिनेमा लवकरच 175 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

लग्नानंतर अवघ्या एकाच दिवसात विग्नेश शिवनला मागावी लागली माफी!

Vignesh Shivan : दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) आणि निर्माता विग्नेश शिवन (Vignesh Shivan) चेन्नईच्या महाबलीपुरम येथील एका रिसॉर्टमधील एका भव्य समारंभात विवाहबद्ध झाले. या जोडप्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लग्नाच्या एका दिवसानंतर नयनतारा विग्नेश शिवनसोबत आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात पोहोचली. मात्र, नवदाम्पत्य तेथे गेल्यानंतर आता नवा वाद निर्माण झाला आहे. यामुळे विग्नेशला जाहीर माफी मागावी लागली आहे.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, नयनतारा पती विग्नेशसोबत भगवान व्यंकटेश्वराच्या कल्याणोत्सवात सहभागी होण्यासाठी मंदिरात पोहोचली होती. यादरम्यान ही जोडी माडा येथील रस्त्यावर चप्पल घालून फिरताना दिसल्याने येथे वाद निर्माण झाला आहे. मात्र, शिवनने याबाबत माफी मागणारे निवेदन जारी केले आहे.


वाचा संपूर्ण बातमी 

कमल हासनच्या ‘विक्रम’चा बॉक्स ऑफिसवर डंका, चित्रपटाने पार केला 250 कोटींचा टप्पा!

Vikram BO Collection : सुपरस्टार कमल हासनचा 'विक्रम' (Vikram) कमाईच्या बाबतीत अनेक मोठे रेकॉर्ड तोडण्यासाठी सज्ज झाला आहे. 'विक्रम'ने पहिल्या आठवड्यातच जगभरात 250 कोटींचा टप्पा पार केला आहे. हा चित्रपट आता हळूहळू 300 कोटींच्या दिशेने वाटचाल करत आहे. एकट्या तामिळनाडूमध्ये या चित्रपटाने 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. कमल हासनचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.


'पुष्पा', 'केजीएफ 2' आणि 'आरआरआर' नंतर आता कमल हसनचा 'विक्रम' चाहत्यांचे जबरदस्त मनोरंजन करत आहे. 'विक्रम'च्या माध्यमातून कमल हसन दीर्घ काळानंतर मोठ्या पडद्यावर परतला आहे. या चित्रपटासोबत अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित बिग बजेट चित्रपट सम्राट पृथ्वीराज प्रदर्शित झाला. अशा परिस्थितीत विक्रम बॉक्स ऑफिसवर कशी कामगिरी करेल? हा प्रश्न बहुतेक चाहत्यांच्या मनात होता.


वाचा संपूर्ण बातमी

श्वेता तिवारीच्या लेकीची मोठी झेप, सलमान खानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’मध्ये पलकची एन्ट्री!

Salman Khan, Palak Tiwari : सलमान खानच्या (Salman Khan) आगामी 'कभी ईद, कभी दिवाली' या चित्रपटाचे नाव बदलून 'भाईजान' असे करण्यात आले आहे. 'भाईजान' चित्रपट रिलीज आधीच प्रचंड चर्चेत आहे. आधी नाव बदलल्यामुळे, तर आता या चित्रपटात अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीच्या (Palak Tiwari) एन्ट्रीची बातमी समोर आल्यानंतर हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकतेच निर्मात्यांनी चित्रपटाचे शीर्षक 'कभी ईद कभी दिवाळी' वरून 'भाईजान' असे बदलले आहे. मात्र, याची अधिकृत घोषणा झालेली नाही.


श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी हिची सलमान खानच्या 'भाईजान' चित्रपटात एन्ट्री झाल्याची बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून तिच्यावर अभिनंदनाच वर्षाव होत आहे. श्वेता शिवारीच्या फॅन फॉलोइंगची यादी तशी मोठी आहे. यामुळेच आजकाल पलक तिवारी सर्वत्र चर्चेत आहे. पलक तिच्या आईप्रमाणे इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे.


वाचा संपूर्ण बातमी

‘एकाच भूमिकेसाठी मी आणि सलमान स्पर्धा करत होतो, पण...’; अभिनेता दीपक तिजोरीने व्यक्त केली मनातील खदखद!

Salman Khan, Deepak Tijori : 90च्या दशकात अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका करून प्रसिद्धी मिळवलेला अभिनेता दीपक तिजोरी (Deepak Tijori) आता दिग्दर्शक बनला आहे. दीपक तिजोरी अनेक मोठ्या चित्रपटांचा भाग बनला होता. तसेच, त्याने अनेक मोठ्या कलाकारांसोबत स्क्रीन देखील शेअर केली आहे. दीपक तिजोरी 80 आणि 90च्या दशकातील अनेक सुपरहिट चित्रपटांचा भाग बनला होता. ‘आशिकी’, ‘खिलाडी’, ‘जो जीता वही सिकंदर’, कभी हा कभी ना’ अशा अनेक चित्रपटांमध्ये तो झळकला होता. या सगळ्यात तो आणखी एका मोठ्या चित्रपटाचा भाग बनू शकला असता. मात्र, ती भूमिका त्याच्या ऐवजी बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या (Salman Khan) पदरात पडली.


कदाचित या चित्रपटामुळे दीपक तिजोरीच्या करिअरला एक मोठं वळण मिळालं असतं. मात्र, हा चित्रपट सलमानच्या वाट्याला गेला. या चित्रपटाचे नाव होते ‘मैने प्यार किया’. सलमान खान याला अभिनेता म्हणून प्रसिद्धी मिळवून देण्यात या चित्रपटाचा मोठा वाटा आहे.


वाचा संपूर्ण बातमी

साऊथची प्रसिद्ध डिझायनर प्रत्युषा गारिमेलाचा संशयास्पद मृत्यू, बाथरूममध्ये आढळला मृतदेह

Prathyusha Garimella : टॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध फॅशन डिझायनर प्रत्युषा गारिमेला (Prathyusha Garimella) शनिवारी (11 जून) तिच्या तेलंगणातील बंजारा हिल्स येथील अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 35 वर्षीय फॅशन डिझायनर प्रत्युषा गारिमेला ही बंजारा हिल्समध्ये राहत होती. शनिवारी दुपारी सुरक्षा तपासणीला तिच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने तिच्या सुरक्षा रक्षकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. तेव्हा, बाथरूममध्ये डिझायनर प्रत्युषाचा मृतदेह आढळून आला.


पोलीस घटनास्थळी पोहोचून तपास करत असताना, त्यांना तिच्या खोलीतून कार्बन मोनॉक्साईडची बाटली सापडली. त्यामुळे प्रत्युषाने कार्बन मोनॉक्साईडचा वापर करून आपलं आयुष्य संपवल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्युषाच्या बाथरूममध्ये कोळसा होता, याद्वारेच कदाचित तिने वाफ घेतली होती. तिने आत्महत्या केली, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच नेमकं कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. तत्पूर्वी पोलिसांनी संशयास्पद मृत्यूची नोंद केली आहे. तिच्या मृत्यूची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली आहे.


वाचा संपूर्ण बातमी

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


जस्टिन बीबरची भयंकर आजाराशी झुंज! भारतातील दौरा रद्द होणार


आपल्या ‘बेबी’ गाण्याने सर्वांना वेड लावणारा गायक जस्टिन बीबर सध्या एका गंभीर आजाराशी झुंज देतो आहे. जस्टिन बीबर जगातील प्रसिद्ध पॉप गायकांपैकी एक आहे. अलीकडेच, गायकाने त्याच्या ‘जस्टिस’ या अल्बमच्या प्रमोशनसाठी जगातील अनेक देशांचा दौरा करण्याची घोषणा केली होती. मात्र, आता जस्टिनने काही दिवसांसाठी आपला दौरा पुढे ढकलला आहे. ही बातमी कळताच जगभरात पसरलेल्या त्याच्या चाहत्यांची निराशा झाली. मात्र, त्याने एक व्हिडीओ शेअर करत यामागचे कारण देखील सांगितले आहे. यातच त्याने आपल्या आजाराचा खुलासा केला आहे. या व्हिडीओमध्ये, जस्टिनने त्याच्या चेहऱ्याला अर्धा चेहरा अर्धांगवायू झाला असल्याचे सांगितले आहे.


एका मैत्रीची अनोखी गोष्ट, ‘रूप नगर के चीते’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!


कोणत्याही शब्दांच्या चौकटीत न मावणारं नातं म्हणजे ‘मैत्री’. रक्ताच्या नात्याच्या बंधापेक्षा मैत्रीच्या नात्याचे बंध अधिक घट्ट असतात. मैत्री ... ती तशी कोणाबरोबरही होते, अनेकदा आपल्याही नकळत. त्याला वय, भाषा, धर्म, वर्ण कशाचीही मर्यादा नसते. अशाच एका मैत्रीची अनोखी गोष्ट एका मराठी चित्रपटातून लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. नाव आहे ... 'रूप नगर के चीते'!  नाव जरी हिंदी असलं, तरी चित्रपट मात्र मराठी आहे. येत्या 16 सप्टेंबरला 'रूप नगर के चीते' आपल्या भेटीला येतील.


'विक्रम वेधा'चे शूटिंग पूर्ण, हृतिक रोशनने शेअर केला सैफ अली खानसोबतचा खास फोटो!


बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनचा आगामी चित्रपट 'विक्रम वेधा' या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. आर माधवन आणि विजय सेतुपती यांच्या 'विक्रम वेधा'च्या हिंदी रिमेकची घोषणा झाल्यापासून लोक त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याच वेळी, आता हा चित्रपट 30 सप्टेंबर 2021 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याची चर्चा सुरु आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. याबाबत माहिती देताना अभिनेता हृतिक रोशनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.


गोला नाही तर लक्ष्य, मुलाच्या नावाचा भारती सिंहने केला खुलासा


विनोदवीर भारती सिंह नेहमीच तिच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकत असते. भारती आणि हर्ष लिंबाचिया यांच्या घरी काही दिवसांपूर्वी नव्या पाहुण्याचे आगमन झाले. त्यांना 3 एप्रिल रोजी पुत्रप्राप्ती झाली. अद्याप भारतीने तिच्या मुलाचा चेहरा चाहत्यांना दाखवला नसला तरी मुलाच्या नावाचा खुलासा केला आहे. छोट्या पडद्यावरील विनोदवीर भारती सिंह तिच्या मुलाला प्रेमाने 'गोला' अशी हाक मारते. पण ‘ई-टाइम्स’च्या वृत्तानुसार भारतीने तिच्या मुलाचे नाव लक्ष्य असे ठेवले आहे.


दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या अडचणीत वाढ


अल्लू अर्जुनच्या अडचणीत वाढ झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, एका शैक्षणिक संस्थेला पाठिंबा दिल्याने अल्लू अर्जुनच्या अडचणीत वाढ झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते कोठा उपेंद्र रेड्डी यांनी दावा केला की, दिशाभूल करणाऱ्या जाहीरातीत अल्लू अर्जुनने काम केले आहे. त्यामुळे दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.