क्राईम पेट्रोल फेम अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला; दोनदा चाकूनं वार अन् डोक्यात लोखंडी रॉडनं प्रहार
Raghav Tiwari Attacked: राघवच्या डोक्यावर दोनदा वार करण्यात आले. त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली असून तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं.
Raghav Tiwari Attacked: बॉलिवूड चित्रपट, वेब सिरीज (Web Series) आणि क्राईम पेट्रोल (Crime Petrol) सारख्या शोमध्ये काम करणारा बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) राघव तिवारी (Raghav Tiwari) याच्यावर शनिवारी जीवघेणा हल्ला झाला. मुंबईतील वर्सोवा येथे त्याच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात राघव जखमी झाला. आरोपी मोहम्मद जैद परवेझ शेख याच्याविरुद्ध वर्सोवा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 118 (1) आणि 352 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
शॉपिंग करुन घरी परतत होता अभिनेता
अभिनेता राघव तिवारीनं सांगितलं की, घटनेच्या वेळी तो त्याच्या मित्रासोबत खरेदी करून घरी परतत होता. रस्ता ओलांडत असताना त्याची दुचाकीला धडक बसली. राघवनं सांगितलं की, ही त्याची चूक होती, म्हणून त्यानं लगेच माफी मागितली आणि पुढे जाऊ लागला. मात्र आरोपी दुचाकीस्वारानं त्याला शिवीगाळ सुरू केली. राघवनं याचं कारण विचारलं असता आरोपीनं दुचाकीवरून खाली उतरून रागाच्या भरात त्याच्यावर दोन वेळा चाकूनं हल्ला केला. राघवनं हल्ल्यातून कसंतरी स्वतःला वाचवलं. यानंतर आरोपीनं त्याला लाथ मारली, त्यामुळे तो खाली पडला.
View this post on Instagram
राघवच्या डोक्यात लोखंडी रॉडनं दोन वेळा वार
राघवनं सांगितलं की, आरोपींनी दुचाकीच्या ट्रंकमधून दारूची बाटली आणि लोखंडी रॉड काढला. संरक्षणासाठी राघवनं रस्त्यावर पडलेलं लाकूड उचललं आणि आरोपीच्या हाताला मारलं, त्यामुळे बाटली खाली पडली. यानंतर आरोपींनी राघवच्या डोक्यात लोखंडी रॉडनं दोन वार केले, त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. राघवच्या मित्रांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेलं, तिथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. उपचारानंतर राघव तिवारीनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्त करत राघव म्हणाला की, आरोपींना अजूनही अटक करण्यात आलेली नसून ते मोकळे फिरत आहेत. आरोपी त्याच्या इमारतीच्या खाली फिरत असल्याचंही त्यानं सांगितलं. राघवनं आपल्याला किंवा त्याच्या कुटुंबाला काही झालं तर त्याची जबाबदारी पोलिसांवर असेल, असंही म्हटलं आहे.