'अभिनयापेक्षा जास्त डायपर बदलण्यात पटाईत झालोय...; बाबा झालेल्या विक्की कौशलनं बाळाबाबत सांगितली 'ही' गोष्ट'
बाबा झाल्यानंतर झालेल्या भावनिक बदलांबद्दल बोलताना विक्कीने त्याच्यात झालेल्या भावनिक बदलांना, भावनांना वाट मोकळी करून दिली.

Vickey Kaushal on fatherhood: विक्की कौशल आणि कॅटरीना कैफ 7 नोव्हेंबर 2025 रोजी एका गोंडस मुलाचे पालक झाले. सध्या ही जोडी पॅरेंटहूडचा प्रत्येक क्षण मनापासून एन्जॉय करत आहे. दरम्यान, मुलाच्या जन्मानंतर पहिल्यांदाच विक्की मुंबईबाहेर दिसला. तो दिल्लीत एका कार्यक्रमासाठी गेला होता. याच कार्यक्रमात तो बाबा झाल्यानंतरच्या आयुष्याबद्दल आणि भावनिक बदलांबद्दल मनमोकळेपणाने बोललाय. मी अभिनयापेक्षा आता डायपर बदलण्यात पटाईत झालोय असं विकी म्हणाला. बाळाच्या जन्मानंतर शहराबाहेर पडणं अवघड गेल्याचही तो म्हणाला. (Vickey Kaushal On fatherhood)
शुक्रवारी दिल्लीत पार पडलेल्या NDTV Indian of the Year 2025 सोहळ्यात विक्की कौशलला Actor of the Year या पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्याला हा पुरस्कार ‘छावा’ चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी मिळाला.
‘अभिनयापेक्षा डायपर बदलण्यात जास्त पटाईत’
दिल्लीत कार्यक्रमादरम्यान विक्कीला विचारण्यात आलं की अभिनय आणि डान्समध्ये पारंगत असलेला विक्की आता डायपर बदलण्यातही एक्स्पर्ट झाला आहे का? यावर हसत विक्कीने बोलताना सांगितलं, “मी अभिनयापेक्षा डायपर बदलण्यात जास्त पटाईत आहे. एवढंच मी सांगू शकतो.” बाबा झाल्यानंतर झालेल्या भावनिक बदलांबद्दल बोलताना विक्कीने कबूल केलं की, मुलाच्या जन्मानंतर लगेच शहराबाहेर जाणं सोपं नव्हतं.
विक्की म्हणाला, “पहिल्यांदाच बाबा झाल्यानंतर मी शहराबाहेर आलो आहे आणि ते खूप कठीण आहे. पण एक दिवस जेव्हा माझा मुलगा हे पाहील, तेव्हा त्याला आपल्या वडिलांचा अभिमान वाटेल. बाबा असणं म्हणजे नेमकं काय, हे शब्दांत सांगणं कठीण आहे.”
2021 मध्ये विक्की-कॅटरीनाने केलं लग्न
विक्की आणि कॅटरीनाने 9 डिसेंबर 2021 रोजी राजस्थानमधील सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथे डेस्टिनेशन वेडिंग केले होते. त्यांच्या लग्नाला फक्त कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईक उपस्थित होते. लग्नापर्यंत दोघांनीही आपलं नातं पूर्णपणे गुप्त ठेवलं होतं. लग्नाच्या चार वर्षांनंतर (7 नोव्हेंबर 2025) कटरीना कैफने तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिला. दोघांनीही instagram वर पोस्ट करून ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती.
विक्की कौशलचा आगामी प्रोजेक्ट कोणता?
विक्की कौशलच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, विक्कीची शेवटची रिलीज फिल्म ‘छावा’ ही 2025 मधील भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरली. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या ऐतिहासिक चित्रपटाने जगभरात तब्बल 807 कोटी रुपयांची कमाई केली. आता विक्की संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटात दिसणार असून, यात रणबीर कपूर आणि आलिया भट्टही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तर कॅटरीना शेवटची ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटात दिसली होती.























