TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.
TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -
'बिग बॉस मराठी'चा विजेता शिव ठाकरे आता गाजवणार भाईजानचा 'बिग बॉस'
'बिग बॉस' हा छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय वादग्रस्त कार्यक्रम आहे. भाईजानचा बिग बॉस सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक आहेत. त्यामुळे या पर्वात कोणते स्पर्धक सहभागी होणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. युट्यूबर अब्दु राजिकनंतर आता आणखी एक नाव समोर आलं आहे. 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता अर्थात मराठमोळा शिव ठाकरे 'बिग बॉस 16' या प्रेक्षकांच्या लाडक्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे.
बिग बींच्या वाढदिवशी चाहत्यांना मिळणार मनोरंजनाची पर्वणी
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन 11 ऑक्टोबर 2022 रोजी त्यांचा 80 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. 1969 पासून 2022 पर्यंत बिग बींनी अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांत काम केलं आहे. त्यामुळे त्यांचा 80 वा वाढदिवस नक्कीच खास असणार आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त खास चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेता 'गोष्ट एका पैठणीची' सिनेमागृहात होणार प्रदर्शित
'68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' सोहळा नुकताच पार पडला असून यात 'गोष्ट एका पैठणीची' या मराठी सिनेमाने बाजी मारली आहे. 'सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार या सिनेमाला मिळाला आहे. आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.
आशा पारेख 'दादासाहेब फाळके पुरस्कारा'ने सन्मानित
'68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' सोहळ्यात अभिनेत्री आशा पारेख यांना 'दादासाहेब फाळके पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. "सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल मला हा पुरस्कार दिल्याबद्दल मी सगळ्यांची आभारी, अशा शब्दांत आशा पारेख यांनी आपल्या भावना व्यक्त केला.
रिचाच्या हातावर रंगली अलीच्या नावाची मेहंदी
बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अली फजल गेल्या काही दिवसांपासून लग्नाच्या चर्चांमुळे चर्चेत आहेत. आता त्यांच्या लग्नासोहळ्याला सुरुवात झाली आहे. सध्या सोशल मीडियावर रिचा आणि अलीचे प्री-वेडिंग कार्यक्रमाचे फोटो व्हायरल होत आहेत.
नवरात्रीच्या माहोलात रंग भरण्यासाठी ‘दया बेन’ गोकुळधाममध्ये परतणार
दया ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या दिशा वकानीने 2015मध्येच ‘तारक मेहता...’चा निरोप घेतला होता. ती या शोमधील प्रसिद्ध पात्रांपैकी एक होती. तिने आपल्या अभिनय क्षमता, मजेदार संवाद आणि गरबा नृत्याने प्रेक्षकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले होते. मात्र, आता दिशा वाकानी शोमध्ये परतणार असून, ती पुन्हा दया बेनच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
‘मराठी बिग बॉस’च्या प्रोमोवर प्रेक्षक नाराज!
‘बिग बॉस मराठी सीझन 4’चे दोन प्रोमो शेअर करण्यात आले आहेत. यात 2 महिला स्पर्धक मंचावर धमाकेदार नृत्य करताना दिसत आहेत. यातून त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नसले तरी, प्रेक्षकांनी अंदाज बांधण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या प्रोमोमध्ये स्पर्धक म्हणून सामील होणाऱ्या अभिनेत्री अतिशय तोकडे कपडे परिधान करून हिंदी गाण्यांवर नृत्य करताना दिसत आहेत. हे पाहून आता मराठी प्रेक्षक आणि चाहते मात्र चिडले आहेत. त्यांनी या प्रोमोवर कमेंट करत मेकर्सना धारेवर धरले आहे.
प्रभासच्या ‘आदिपुरुष’ पहिलं पोस्टर रिलीज
साऊथचा सुपरस्टार प्रभासच्या बहुप्रतीक्षित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचे पहिले अधिकृत पोस्टर आज रिलीज करण्यात आले आहे. साऊथ सुपरस्टार प्रभासच्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात सैफ अली खान आणि प्रभासचा जबरदस्त लूक पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये प्रभास भगवान श्री रामाप्रमाणे धनुष्यबाण लक्ष्य साधताना दिसत आहे. या पोस्टरवर त्याचा तपस्वी लूक पाहायला मिळाला आहे.
राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर अजय देवगणची पहिली प्रतिक्रिया
राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर व्हिडीओ शेअर करत अजयने लिहिलं आहे,"काय काय जिंकलो हे मोजत नाही. तर कृतज्ञता व्यक्त करत आहे. तुम्हा सर्व चाहत्यांचं प्रेम खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळेच माझा आनंद तुमच्यासोबत शेअर करतो आहे. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून पुरस्कार स्वीकारताना नक्कीच अभिमान वाटत आहे".
सलमान खानचा बॉडी डबल सागर पांडेचं निधन
बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा बॉडी डबल सागर पांडेचं निधन झालं आहे. जीममध्ये व्यायाम करत असाताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचं निधन झालं आहे. वयाच्या 50 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला.