Gurucharan Singh : 'तारक मेहता...'चा सोढी 25 दिवसांनी घरी परतला; चौकशीदरम्यान म्हणाला,"दुनियादारी सोडून..."
Gurucharan Singh : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या लोकप्रिय मालिकेतील सोढी अर्थात गुरुचरण सिंह गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होता. पण आता 25 दिवसांनी तो सुखरुप घरी परतला आहे.
Gurucharan Singh Latest Update : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या लोकप्रिय मालिकेत सोढीची भूमिका साकारणारा गुरुचरण सिंह (Gurucharan Singh) 25 दिवसांनी घरी सुखरुप परतला आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता बेपत्ता असल्याचं समोर आलं होतं. अभिनेत्याच्या वडिलांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. गुरुचरण बेपत्ता असल्याने चाहत्यांसह पोलीसदेखील हैराण झाले होते. गुरुचरणचं बरंवाईट तर झालं नसेल ना असाही विचार चाहत्यांच्या मनात येऊन गेला. आपला मुलगा घरी परत यावा यासाठी त्याचे वडीलही प्रार्थना करत होते. अशातच आता 25 दिवसांनी गुरुचरण आपल्या घरी परतला आहे. घरी परतल्यानंतर पोलिसांच्या चौकशीदरम्यान गुरुचरण म्हणाला,"दुनियादारी सोडून धार्मिक यात्रेला गेलो होतो".
गुरुचरण कुठे होता?
गुरुचरण घरी परतल्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीदरम्यान तो कुठे होता असा प्रश्न विचारला. त्यावेळी गुरुचरण म्हणाला,"मी दुनियादारी सोडून धार्मिक यात्रेला गेलो होतो. अनेक दिवस मी अमृतसरमध्ये थांबलो होतो. त्यानंतर लुधियानासारख्या अनेक शहरांमधील गुरुद्वारमध्ये थांबलो. त्यानंतर पुन्हा आपल्या वडिलांकडे जावं, असं मला वाटलं. त्यामुळे मी पुन्हा घरी येण्याचा निर्णय घेतला". गुरुचरणी पोलीस सध्या चौकशी करत आहेत.
वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केलेली
गुरुचरण सिंह 22 एप्रिल 2024 रोजी आपल्या घरुन मुंबईला जाण्यासाठी निघाला होता. पण तो मुंबईत पोहोचला नाही तेव्हा कुटुंबीय आणि मित्र हैराण झाले. त्यानंतर 26 एप्रिल 2024 रोजी गुरुचरणच्या वडिलांनी आपला मुलगा बेपत्ता झाल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी अपहरणाअंतर्गत तक्रार दाखल केली आणि चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान समोर आलं की गुरुचरण 24 एप्रिलपर्यंत दिल्लीतच होता. त्यावेळी त्याचा मोबईल बंद झाला. या चौकशीदरम्यान समोर आलं की, गुरुचरण लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तसेच अभिनेत्याला आर्थिक अडचणींचादेखील सामना करावा लागणार आहे.
'तारक मेहता का उल्टा चष्मा'चा होता भाग
गुरुचरण सिंह 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेत रोशन सिंह सोढीची भूमिका साकारत होता. 2008 ते 2013 पर्यंत तो या मालिकेचा भाग होता. त्यानंतर त्याने या मालिकेला अलविदा केलं. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांच्यासोबत गुरुचरणचे वाद झाले होते. या मालिकेसाठी गुरुचरणला 2020 मध्ये पुन्हा काम करण्यासाठी विचारणा झाली होती. पण वडिलांकडे लक्ष देण्याचं कारण देत त्याने ही मालिका न करण्याचं कळवलं. त्यानंतर छोट्या पडद्यावरील कोणत्याही मालिकेत तो दिसला नाही. स्क्रीन पासून सध्या तो दूर आहे.
संबंधित बातम्या