एक्स्प्लोर
Advertisement
अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक, फेरमतमोजणीत सुशांत शेलार विजयी
प्रतिष्ठेची लढाई ठरलेल्या निवडणुकीच्या फेरमतमोजणीत चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष अभिनेते विजय पाटकर यांचा 16 मतांनी पराभव करून सुशांत शेलार विजय झाले.
कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या 26 एप्रिल 2016 रोजी झालेल्या निवडणुकीची आज तब्बल अडीच वर्षांनंतर फेरमतमोजणी झाली. या फेरमतमोजणीत अभिनेते सुशांत शेलार हे विजयी झाले आहेत. प्रतिष्ठेची लढाई ठरलेल्या निवडणुकीच्या फेरमतमोजणीत चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष अभिनेते विजय पाटकर यांचा 16 मतांनी पराभव करून सुशांत शेलार विजय झाले.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक 26 एप्रिल 2016 रोजी झाली होती. या निवडणुकीत सर्वाधिक मते मिळल्याने अभिनेते गटातून विजय पाटकर यांना विजयी घोषित करण्यात आलं. यावेळी झालेल्या मतमोजणी प्रक्रियेला अभिनेते सुशांत शेलार यांनी आक्षेप घेतला. तसेच तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे फेर मतमोजणी घ्यावी अशी मागणी देखील केली होती. मात्र तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही मागणी फेटाळून लावत अभिनेते विजय पाटकर विजयी झाल्याचं सांगितलं आणि तसा निर्णयही घोषित केला.
या निर्णयाविरोधात अभिनेते सुशांत शेलार यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. शेलार यांनी वेळोवेळी न्यायालयात आपलं म्हणणं सादर करत आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत दाद मागितली. तब्बल अडीच वर्षांनंतर एप्रिल 2016 मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीची फेरमतमोजणी घेण्याचे आदेश धर्मादाय आयुक्तांना देण्यात आले.
कोल्हापूरच्या धर्मादाय आयुक्तांनी न्यायालयाच्या आदेशानुसार आज (सोमवार) फेरमतमोजणी घेतली. सकाळी 11 वाजल्यापासून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कोल्हापूर कार्यालयात ही मतमोजणी सुरू होती. सायंकाळी पाच वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी संपूर्ण मतमोजणी झाल्यानंतर अभिनेते सुशांत शेलार यांना 591 मत पडल्याचं सांगितलं, तर अभिनेता विजय पाटकर यांना 575 मत मिळाल्याचं जाहीर केलं. सर्वाधिक मतं सुशांत शेलार यांना असल्याने सुशांत शेलार 16 मतांनी विजयी झाल्याचं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केलं.
''अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या फेर मतमोजणीत माझा झालेला पराभव मला मान्य आहे. मी चित्रपट महामंडळात यापूर्वीही चांगलं काम करत होतो आणि भविष्यातही चांगलं करण्याचा विश्वास आहे. संचालक म्हणून आम्ही काम करत होतो, आता सभासद म्हणून मी काम करेन. आजची ही प्रक्रिया पूर्ण पारदर्शी झाली आहे,'' अशी प्रतिक्रिया विजय पाटकर यांनी दिली.
''एप्रिल 2016 मध्ये झालेल्या अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला मी आक्षेप नोंदवला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आज झालेल्या फेरमतमोजणीमुळे 16 मतांनी विजय झाला आहे. अडीच वर्षांचा कालावधी मिळत असला तरी जास्तीत जास्त चांगलं काम करण्याचा मी प्रयत्न करेन. हा अडीच वर्षांचा कालावधी मला विजय पाटकर यांच्यामुळेच मिळाला आहे,'' अशी प्रतिक्रिया सुशांत शेलार यांनी दिली.
या विजयानंतर चित्रपट महामंडळाच्या कार्यालयात सुशांत शेलार यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्यासह चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष, सचिव, पदाधिकारी आणि महामंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement