Rajinikanth : "दारू पिणं ही माझी सर्वात मोठी चूक"; रजनीकांतचं वक्तव्य चर्चेत
Rajinikanth : रजनीकांत यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात दारू पिणं ही माझी मोठी चूक, असं वक्तव्य केलं आहे.
Rajinikanth : जगभरात लोकप्रिय असलेल्या 'थलायवा' रजनीकांत (Rajinikanth) सध्या चर्चेत आहेत. नुकतेच चेन्नईमध्ये त्यांच्या आगामी 'जेलर' (Jailer) या सिनेमाच्या ऑडिओ लॉन्चचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान अभिनेत्याने वैयक्तिक आयुष्यासंबंधित अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर केल्या. दारूच्या व्यसनाबद्दलही त्यांनी भाष्य केलं. दारू पिणं ही माझी चूक असं वक्तव्य रजनीकांत यांनी केलं आहे.
दारूचं व्यसन नसतं तर मी समाजासाठी काम केलं असतं : रजनीकांत
रजनीकांत म्हणाले,"मला दारूचं व्यसन नसतं तर मी समाजासाठी आणखी चांगलं काम केलं असतं. करिअरकडे लक्ष दिलं असतं. दारू पिणं ही माझ्या आयुष्यातील मोठी चूक आहे. दारूचं व्यसन नसतं तर मी समाजसेवा केली असती. दारू पूर्णपणे सोडा असं नाही. पण नियमित मद्यपान करू नका. दारू तुमचा आनंद आणि आरोग्य खराब करू शकते". रजनीकांत यांनी चाहत्यांना नियमित मद्यपान न करण्याचा सल्ला दिला आहे.
रजनीकांत यांनी व्यसनाबद्दल याआधीदेखील भाष्य केलं आहे. तामिळ नाटकाच्या एका कार्यक्रमादरम्यान ते म्हणाले होते,"अभिनेता होण्याआधी मी कंडक्टर होतो तेव्हा दररोज दारू प्यायचो. खूप सिगारेट ओढायचो. दिवसभर मांसाहार करायचो. त्यावेळी शाकाहारी मंडळींचा मला राग येत असे. पण मला वाटतं दारू, सिगारेट आणि अती मांसाहार या तीन गोष्टींचं जे सेवन करतात ते वयाच्या साठीनंतर निरोगी आयुष्य जगू शकत नाहीत".
रजनीकांतचा 'जेलर' कधी होणार प्रदर्शित (Jailer Released Date)
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतच्या आगामी 'जेलर' या बहुचर्चित सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. येत्या 10 ऑगस्टला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेल्सन दिलीप कुमारने या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात रजनीकांतने मुथुवेल पांडियनची भूमिका साकारली आहे. रजनीकांतसह या सिनेमात तमन्ना भाटिया, शिवा राजकुमार, जॅकी श्रॉफ, मोहनलाल आणि योगी बाबू हे कलाकारही मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. सन पिक्चर्सच्या कलानिथी मारन यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. रजनीकांतचा 'लाल सलाम' हा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.
रजनीकांत यांनी धुम्रपानाचा प्रचार ऑनस्क्रीन थांबवला
रजनीकांत 2019 मध्ये आलेल्या 'पेट्टा' या सिनेमात सिगारेट ओढताना दिसत आहेत. पण पुढे ते असंही म्हणत आहेत की,"सिगारेट ओढणं आरोग्यासाठी चांगलं नाही. मी हे माझ्या अनुभवातून सांगत आहे. तसेच 2018 मध्ये आलेल्या 'काला' या सिनेमातील एका गाण्यात ते दारू पिताना दिसत आहे. मात्र सिनेमात ते आपल्या बेफिकीरपणे वागण्याला दारुला दोष देतात. त्यांच्या या सवयीमुळे सिनेमात त्यांच्या पत्नीचा मृत्यू होतो. एकंदरीतच रजनीकांत यांनी ऑनस्क्रीन धुम्रपानाचा प्रचार करणं थांबवलं आहे.
संबंधित बातम्या