Sumi Marathi Movie: तीन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘सुमी’ चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला; चित्रपट ओटीटीवर होणार रिलीज
'सुमी' (Sumi) 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022 मध्ये 'सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट' ठरला असून या चित्रपटातील आकांक्षा पिंगळे व दिव्येश इंदुलकर 'सर्वोत्कृष्ट बाल कलाकार' या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
Sumi Marathi Movie: अक्षय विलास बर्दापूरकर (Akshay Bardapurkar) आणि प्लॅनेट मराठी प्रस्तुत हर्षल कामत एंटरटेनमेंट व गोल्डन माउस प्रॉडक्शन निर्मित 'सुमी' (Sumi) या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. पोस्टरमध्ये आनंदी, मनमुराद हसणारी 'सुमी' (Sumi) दिसतेय. एका महत्वाकांक्षी, ध्येयनिष्ठ मुलीची कहाणी असलेल्या या चित्रपटाला राष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात आले आहे. 'सुमी' 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022 मध्ये 'सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट' ठरला असून या चित्रपटातील आकांक्षा पिंगळे व दिव्येश इंदुलकर 'सर्वोत्कृष्ट बाल कलाकार' या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. 'सुमी'मध्ये स्मिता तांबे, नितीन भजन यांच्याही प्रमुख भूमिका असून अजय गोगावले यांनी या चित्रपटात गाणं गायले असून संगीतकार रोहन-रोहन यांनी या गाण्यांना संगीतबद्ध केले आहे. 'सुमी' लवकरचं प्लॅनेट मराठी ओटीटीच्या (Planet Marathi Ott) माध्यमातून सर्वांच्या भेटीला येणार आहे.
प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, "सुमी सारख्या विलक्षण, प्रायोगिक कथा असलेला चित्रपट जागतिक व्यासपीठास पात्र आहे. प्रेक्षकांना वेगवेगळे आशय देऊन मनोरंजन करणे आमचं कर्तव्य आहे. ‘सुमी’ची ही गोड कहाणी सर्वांनाच आवडेल. 'सुमी' लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रेक्षकांना भेटायला येणार आहे."
दिग्दर्शक अमोल गोळे म्हणतात, "सुमी चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार विजेता ठरला आणि आता या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद बघून आनंद होतोय. प्लॅनेट मराठीच्या साथीने आम्ही 'सुमी'ला तुमच्या भेटीला घेऊन येत आहोत. एक ध्येयवेडी मुलगी म्हणजे ‘सुमी’. तुमच्या आमच्यातलीच ध्येयाचा ध्यास पूर्ण करणारी ‘सुमी’ लवकरच आपल्या भेटीला येणार आहे.’’
अक्षय विलास बर्दापूरकर आणि प्लॅनेट मराठी प्रस्तुत हर्षल कामत एंटरटेनमेंट व गोल्डन माउस प्रोडक्शन निर्मित 'सुमी' या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल वसंत गोळे यांनी केले आहे. हर्षल कामत, स्वाती एस. शर्मा, मिहिर कुमार शर्मा हे निर्माते असून अंजली आनंद पांचाळ, जयादित्य गिरी, जयंत येवले व सोनाली जयंत हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची मूळ कथा - पटकथा संजीव झा यांची आहे. प्रसाद नामजोशी यांनी या चित्रपटाचे संवाद आणि गीत प्रसाद नामजोशी यांचे आहेत.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
Jitendra Joshi : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर येणार जितेंद्र जोशी; धमाल स्किटने पिकणार हशा