मराठी संगीतात खूप प्रयोग व्हायला हवेत : गायिका शाल्मली खोलगडे
शाल्मली हे नाव आता भारतासाठी नवं राहिलेलं नाही. तिने हिंदीत फारच लोकप्रिय गाणी दिली. तीनही सप्तकात लीलया फिरणारा आवाज आणि त्याला भारतीय-पाश्चात्य संगीताची तिला असलेली जाण यामुळे शाल्मली इतरांपेक्षा वेगळी उठून दिसली.

मुंबई : मराठी संगीतामध्ये आता बरंच चांगलं काम होऊ लागलं आहे. पण आपण आणखी प्रयोग करायला हवेत. जगभरातलं संगीत ऐकायला हवं. मला असं वाटतं की आपण आपल्या मुळांना खूपच घट्ट धरून ठेवलं आहे. संगीतात ते आवश्यक आहे. पण एकिकडे ते धरुन ठेवताना जगभरात, भारतात नवी काय प्रयोग होतायत. त्यातले मराठीत कसे आणता येतील याकडेही लक्ष द्यायला हवं. संगीतकार म्हणून पहिल्यांदाच मराठी चित्रपटासाठी काम करणारी गायिका शाल्मली खोलगडे एबीपी माझाशी बातचीत केली.
शाल्मली हे नाव आता भारतासाठी नवं राहिलेलं नाही. तिने हिंदीत फारच लोकप्रिय गाणी दिली. तीनही सप्तकात लीलया फिरणारा आवाज आणि त्याला भारतीय-पाश्चात्य संगीताची तिला असलेली जाण यामुळे शाल्मली इतरांपेक्षा वेगळी उठून दिसली. तिने दरम्यानच्या काळात रियालिटी शोमध्ये परीक्षक म्हणूनही उपस्थिती लावली. मराठी गाणीही ती गाऊ लागली. आता ती जून या चित्रपटाला संगीत देते आहे. हिंदीत इतकं काम करुन मराठीत पहिल्यांदा संगीतकार म्हणून पदार्पण का करावं वाटलं, यावर बोलताना शाल्मली म्हणाली, मी हिंदीत गाणी गायले. परदेशात मी संगीत शिकले. पण मी मुळात मराठीच आहे. माझ्या घरी मराठीच बोललं जातं. माझं इंग्रजी चांगलं आहे. तसंच मराठीही चांगलं आहे. मराठीमध्ये सुह्रदने माझ्याकडे हा चित्रपट आणला. हा चित्रपट मी पाहिला आणि त्यानंतर मी हा सिनेमा स्वीकारायचं ठरवलं.
जूनमध्ये असलेल्या गाण्यांमध्ये बाबा हे गाणं तुलनेनं अवघड असल्याचं ती सांगते. ती म्हणाली, बाबा हे गाणं आधी माझ्याकडे लिहून आलं. त्यानंतर मी त्याला संगीत दिलं. ते देताना त्याचे शब्द, त्यातून व्यक्त होणारी भावना यांचा विचार करता मी ते गाणं तयार केलं. इतर गाणीही करणं हा अनुभव होता पण बाबा हे गाणं तुलनेेनं कठीण काम होतं. शाल्मलीनं जून सिनेमाचं संगीत दिलं आहे, तर याचं गीतलेखन जीतेंद्र जोशी याने केलं आहे.
जीतेंद्र जोशी आणि शाल्मली खोलगडे यांनी एबीपी माझाच्या वेबसाईटला दिलेल्या खास मुलाखतीत हा अनुभव शेअर केला आहे. शाल्मली आपल्या नव्या इनिंगबद्दल बोलताना म्हणाली, 'ही गाणी करताना मी एक मनाशी ठरवलं होतं. की मला ही गाणी करताना मला गाण्याची कडवी वेगवेगळ्या चालीत सुरु करायची होती. आपल्याकडे पं. ह्रदयनाथ मंगेशकर किंवा श्रीनिवास खळे अशी गाणी करत होते. एका गाण्यात दोन कडवी असतील तर त्या दोन्ही कडव्यांची सुरूवात पूर्ण वेगळी करुन पुन्हा ती मुखड्यापर्यंत आणायची असंच मला करायचं होतं.त्यासठी मी माझ्या मनात काही गोष्टी ठरवल्या होत्या. त्यातून मी काही वेगळे प्रयोग कसे करता येतील याकडे पाहात होते. आणि जूनचं संगीत तसं दिलं आहे'.























