Short Film : सुवर्णसंधी! एखाद्याचे आयुष्य बदलवणारा 'प्लॅनेट मराठी शॉर्ट फिल्म फेस्टिवल'
Short Film : 'प्लॅनेट मराठी'च्या वतीने शॅार्ट फिल्म्सच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
Planet Marathi Short Film : 'प्लॅनेट मराठी'ने जगभरातील मराठी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्याची जबाबदारी अगदी समर्थपणे पेलली असून नवनवीन चित्रपट, वेबसीरिज, मनोरंजनात्मक कार्यक्रम यांचा खजिना 'प्लॅनेट मराठी' कडे उपलब्ध आहे. या खजिन्यात अधिक भर होण्याच्या दृष्टीने 'प्लॅनेट मराठी' एक नवीन उपक्रम घेऊन येत आहे. उत्तम आणि नवीन आशय प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा, यासाठी 'प्लॅनेट मराठी शॉर्ट फिल्म फेस्टिवल'(पीएमएसएफएफ) या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
एक योग्य संधी एखाद्याचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते. हीच सुवर्णसंधी 'प्लॅनेट मराठी शॉर्ट फिल्म फेस्टिवल' या स्पर्धेच्या माध्यमातून 'प्लॅनेट मराठी' चित्रपट क्षेत्रात काहीतरी करू पाहणाऱ्या प्रत्येकाला देत आहे. संजय जाधव, मृणाल कुलकर्णी, किरण यज्ञोपावित, निखिल महाजन, सर्वेश परब हे या स्पर्धेचे परीक्षक असून जगभरातून कोणालाही या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. शॉर्ट फिल्म मराठी भाषेत असण्याबरोबरच त्याला इंग्रजी सब टायटल असणे बंधनकारक असणार आहे.
या स्पर्धेसाठी प्रवेशमूल्य नसून एका पेक्षा जास्त शॉर्ट फिल्म स्पर्धेसाठी पाठवता येणार आहेत परंतु या स्पर्धेसाठी प्रत्येक शॉर्ट फिल्मची नोंद वेगवेगळी असणे आवश्यक आहेत. फेब्रुवारी २०२२ मध्ये या स्पर्धेचे विजेते जाहीर करण्यात येणार आहेत. प्रथम विजेत्यास पाच लाख, द्वितीय विजेत्यास तीन लाख आणि तृतीय विजेत्यास दोन लाख रुपये बक्षिस मिळणार आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात या स्पर्धेसाठीच्या शॉर्ट फिल्म्स स्वीकारण्यात येणार आहेत.
'प्लॅनेट मराठी शॉर्ट फिल्म फेस्टिवल'(पीएमएसएफएफ) या स्पर्धेविषयी 'प्लॅनेट मराठी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणाले,"मराठी चित्रपटसृष्टीला अधिक समृद्ध करण्यासाठी प्रतिभावान तरुणांना योग्य व्यासपीठ आणि संधी मिळणे महत्वाचे आहे. त्यासाठीच आमचा हा प्रयत्न आहे. मला आशा आहे या स्पर्धेमुळे अनेक नवीन तंत्रज्ञ, कलाकार, दिग्दर्शक आपल्या मराठी चित्रपट सृष्टीला मिळतील. आजकाल अनेक शॉर्ट फिल्म स्पर्धांचे आयोजन होत असते परंतु (पीएमएसएफएफ) ही स्पर्धा सर्वार्थाने वेगळी असून महत्वाचे म्हणजे चित्रपट क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या दिग्गज परीक्षकांसमोर स्पर्धकांना आपली शॉर्ट फिल्म सादर करण्याची संधी मिळणार आहे".
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येथे करा एन्ट्री
https://plt.mt/short
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha